डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे भाष्यकार प्रा अविनाश डोळस
प्रा. अविनाश डोळस सर यांचं घर म्हणजे अनेकांच्या मार्गदर्शनाच हक्काचं ठिकाण ... अनेक विषयांचं त्यांनी नेमकेपणानं केलेलं विश्लेषण समाधान करून जात असे... या गप्पांचा फड पूर्वी त्यांच्या छावणीतील घरी जमत असे नंतर सरांनी नंदनवन कॉलनीत बांगला बांधला अन गप्पांचा फड मग येथे रंगू लागला ...प्रा अविनाश डोळस यांचा आज जन्म दिवस ... 11 डिसेंबर 1950 रोजी त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील आंबे येथे झाला ...
प्रा. अविनाश डोळस यांनी
जातीय, धार्मिक अभिनिवेश टोक गाठत असताना वंचित, वंचित , बहुजनांच्या हक्कांची जाणीव सवर्णामध्ये करून देणारी समन्वयवादी भूमिका घेत उपेक्षितांच्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन त्यांचा ठाव घेण्याचं काम सातत्यानं केलं ... डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर त्यांची नितांत निष्ठा होती ... याच विचारांची सोबत करत उपेक्षितांच्या चळवळीला आकार देण्याचं काम ते करत असत ... सामाजिक चळवळीला डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या विचारांची विताकद देताना ती चळवळ कार्यप्रवण करण्यासाठी समविचारी चळवळीतील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कसे जात येईल याचाही विचार त्यांनी केलेला असे ... यांच्या वर्षभरापूर्वी झालेल्या निधनाने समन्वयाचा हा दुवा निखळला आहे , असं मत चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं , समविचारी साहित्यिक , लेखकांचं झालं आहे ... मराठी भाषेचे प्राध्यापक म्हणून काम करणारे प्रा.अविनाश डोळस यांच्या व्यक्तिमत्त्वातील समन्वयाच्या भूमिकेला तोड नव्हती... विविध विषयांची वैचारिक मांडणीत वस्तुनिष्ठ करण्याची शैली एकमेव द्वितीय होती ... म्हणून वैचारिक भूमीका आणि व्यवहारात कोणतीही तडजोड न करता चळवळीला दिशा देणाऱ्या कार्यकर्त्यां विचरवंताच गेल्या वर्षी झालेलं निधन चटका लावून जाणारं ठरलं ...
प्रा.अविनाश डोळस सर मराठीचे प्राध्यापक असल्यानं त्यामुळे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक इंग्रजी ग्रंथ मराठीत आणण्यासाठी मोठे कष्ट घेतले... डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रकाशन समितीमध्ये काम करताना त्यांनी अनुवादाच्या कामाला मोठी गती दिली... अलीकडेच डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘जनता’ या वृत्तपत्राचे पुन्हा प्रकाशन करण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले ... महाडच्या सत्याग्रहानंतर झालेल्या न्यायालयीन प्रक्रियेची कागदपत्रे मिळवली ... या प्रकरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी न्यायालयात बाजू मांडली होती ...या कागदपत्रांच्या भाषांतराचे कामही त्यांनी हाती घेतले होते... बहुजन आणि वंचिताच्या चळवळीला कसा आकार दिला जावा याचा विचार करताना प्रा.आविनाश डोळस यांनी या चळवळीसाठी लागणारे साहित्य मराठीत उपलब्ध झाले पाहिजे यासाठी मोठी मेहनत घेतली... हे काम करताना भाषा नेमकी वापरली पाहिजे यावर अधिक केंद्रित केले ...
अनेक विचारांच्या मंचावर अविनाश डोळस यांची उपस्थिती असे... बहुजनांच्या वेदना, हळवी बाजू किंवा हक्काची जाणीव , याची मांडणी करताना वक्ते कधी कडवट होतात हे त्यांनाही कळत नाहीत. पण प्रा. डोळस जेव्हा शोषितांची बाजू मांडत, तेव्हा त्यांच्या मताशी बहुतांशी श्रोते सहमत होत असत ... त्यांच्या लिखाणातही एक शास्त्रीय संशोधनाची वृत्ती दिसून येते ... ‘महासंगर’, ‘मराठी दलित कथा’, ‘स्त्री मुक्ती चळवळ एक अवलोकन’, ‘आंबेडकरांचे काल आणि आज’, ‘डॉ. आंबेडकरांचे धर्मातर’, ‘असा एक पाणवठा’, ‘ब्राह्मण समाजाकडून माझ्या अपेक्षा’ आदी अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले.... त्यांचा नाटय़शास्त्रावरही अभ्यास होता.... नाट्यशास्त्रातील पदविकाही त्यांनी प्राप्त केली होती ... नाशिक येथील प्रसिद्ध शाहू महाराज वसतिगृहात राहून शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या प्रा अविणध डोळस यांनी महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थपन केलेल्या पीपल्स सोसायटीच्या नागसेनवन परिसरातील मिलिंद मध्ये कला शाखेची पदवी आणि नंतर एम ए ही पदवी मिळवली ... त्यानंतर याच मिलिंद महाविद्यालयात त्यांनी 34 वर्षे विद्यार्थी घडवण्याचं काम केलं ... विविध विषयांवर शोधनिबंध लिहिणारे प्रा. डोळस अंतर्यामी कार्यकर्तेपण जपणारे होते...कारण त्यांचं बालपण ज्या नाशिक शहरात गेलं तेथे अनेक सामाजिक चळवळी त्यांनी जवळून पहिल्या होत्या ... सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांचं जगणं जवळून अनुभवलं होतं ... डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्यक्ष चळवळीत काम केलेल्यांचे अनुभव ऐकले होते ... म्हणून त्यांना चळवळीबरोबरच त्या चळवळींना वैचारिक बेस लागतो हे माहीत होतं ... हा वैचारिक बेस ते महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांत शोधत आणि त्या विचारांचा त्या चळवळीसाठी वापर करत ... कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या आंबेडकरी चळवळीतील योगदानावर त्यांची निष्ठा होती ... म्हणून ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे एक प्रकारे भाष्यकार होते , असं म्हटलं तर वावगं ठरू नये ...प्रा अविनाश डोळस सर आपल्या खास अशा भाषण शैलीन श्रोत्यांना आपलंसं करून घेत ...अल्प शिक्षित श्रोत्यांसही उमजेल आणि विचरवंतचही समाधान होईल अशा शैलीत ते विषयाच्या खोलात जाऊन नेमकं विश्लेषण करत असत ...वक्ता म्हणून ही त्यांची नोंद घेणं खूप आवश्यक आहे ...
निवडणुकांच्या राजकारणात असूनही त्यातील एकही वाईट बाब त्यांनी स्वीकारली नव्हती. राजकीय कार्यकर्ते त्यांच्यापासून अंतर राखूनच राहायचे. विचाराची लढाई विचारांनी कशी लढावी याचे मर्म जाणून असणारा प्राध्यापक अशी त्यांची ओळख होती... त्यांचा आज जन्म दिन त्यांना विनम्र अभिवादन ...!!!

Comments
Post a Comment