शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ
सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्यां आणि शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचा आज जयंती . दि. १७ मार्च १९१० रोजी पुणे येथे त्यांचा जन्म झाला. वयाच्या तेराव्या वर्षी वैधव्य येऊन सुद्धा तत्कालिन सामाजिक रूढींचे बंधन झुगारून त्यांनी शिक्षण घेतले. तथापि , महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात सुरू केलेल्या मुलीच्या शैक्षणिक कार्याला गती मिळत गेल्याचं हे एक उत्तम उदाहरण म्हणजे अनुताई होत्या .अनुताई शिक्षिका म्हणून कार्यरत असतानाच त्यांना ताराबाई मोडक भेटल्या आणि त्यांनी बोर्डी (ठाणे) येथे आदिवासींसाठी असलेल्या ग्राम बाल शिक्षण केंद्रात प्रवेश केला. तेथे १९४७ ते ९२ अशी ४७ वर्षे त्यांनी निरपेक्ष वृत्तीने आदिवासी आणि ग्रामशिक्षणाचे कार्य चालवले. पुढे कोसबाडच्या नूतन बाल शिक्षण केंद्राच्या चालक, राष्ट्रीय शिक्षण अनुसंधान आणि प्रशिक्षण मंडळाच्या कार्यकरिणी सदस्य, अखिल भारतीय पूर्व प्राथमिक शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. आदिवासींच्या शिक्षणासाठी अनेक संस्था स्थापन करून आयुष्य वेचणा-या या अनुताईंना आदर्श शिक्षिका, दलितमित्र, आदर्श माता, फाय फाऊंडेशन, सावित्रीबाई फुले, बाल कल्याण राष्ट्रीय पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांबरोबरच ‘पद्मश्री’ ने सन्मानित केले गेले. त्यांचे शिक्षणविषयक ग्रंथ इंग्रजी, हिंदी, गुजराथीतून अनुवादित झाले. प्रबोधनासाठी वाहिलेल्या ‘शिक्षणपत्रिका’ आणि स्त्रीजागृतीसाठी असलेल्या ‘सावित्री’ मासिकाच्या त्या संपादक होत्या. बोर्डी येथेच दि. २७ सप्टेंबर १९९२ रोजी त्यांचे निधन झाले.
Comments
Post a Comment