बाबासाहेबांचा मराठवाड्याशी असलेला स्नेहबंध
बाबासाहेबांचा मराठवाड्याशी असलेला स्नेहबंध
- यशवंत भंडारे
हैदराबाद संस्थानातील अस्पृश्य समाज हिंदू आणि मुसलमान या दोन्ही धर्मियांकडून नाडला गेला होता. सबंध देशात ब्रिटिश कालावधीत समाज सुधारणेचे वारे वाहत असताना हैदराबाद संस्थानात मात्र समाज सुधारणेची थोडी झुळूकही येत नव्हती. छोटे छोटे प्रयत्न होत होते. पण ते सबंध हैदराबाद संस्थानात नव्हते. बाबासाहेबांनी या प्रदेशातील जातवास्तव अनुभवल्यानंतर त्यांनी हैदराबाद संस्थानासह मराठवाड्यात लक्ष घालण्यास सुरुवात केली. मिलिंद महाविद्यालयाच्या स्थापनेद्वारे त्यांनी मराठवाड्याला लळा लावला. दोन परिषदा घेऊन सर्वार्थानं संपूर्ण परिवर्तनाला चालना दिली. त्याचा वेध घेणारा हा लेख बाबासाहेबांच्या जयंतीमिनित्त देत आहोत...
आधुनिक महाराष्ट्राची वैचारिक जडणघडण महात्मा जोतिराव फुले, राजर्षि शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक, कृतिशील कार्यातून व बांधिलकीतून झाली. सत्यशोधक आणि आंबेडकरी चळवळीनं आधुनिक महाराष्ट्रामध्ये सामाजिक, धार्मिक आणि राजकीय जागृती घडवून आणली आहे. ब्रिटिश राजवटीच्या काळात झालेल्या या चळवळींनी तत्कालीन समाजामध्ये आधुनिक विचार आणि दृष्टिकोन रुजवण्याची मोठी कामगिरी केली आहे. देशातील धर्मातील जन्माधिष्ठित जातवास्तव माणसाला प्रतिष्ठा, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता आणि समता नाकारणारे होते. हिंदू धर्मियांबरोबर येथील मुस्लिम धर्मियांनीही हिंदू जात-वर्णव्यवस्थेच्या मुळाशी असलेल्या व्यवस्थेप्रमाणे येथील अस्पृश्यांना वागणूक दिली. नव्हे, तर हिंदू धर्मियांप्रमाणेच वागवले. देशातील आणि महराष्ट्रातील हिंदू समाज सुधारकांनी अस्पृश्यांबाबत अस्पृश्योद्धाराची भूमिका घेतली. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मात्र याबाबत ‘अस्पृश्योद्धार’ ऐवजी ‘स्वोद्धार’ या भूमिकेचा अंगिकार करून स्वतंत्रपणे अस्पृश्यांमध्ये नवी अस्मिता जागृतीचे काम ब्रिटिश भारतात नि महराष्ट्रात 1919 पासून सुरू केलं होतं.
बाबासाहेबांच्या कार्याची सुरुवात:
अमेरिकेतून उच्च शिक्षण पूर्ण करून बाबासाहेब 21 ऑगस्ट 1917 रोजी भारतात परतले. अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून 27 जानेवारी 1919 रोजी बाबासाहेबांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट 1919 बाबत साऊथबरो मताधिकार समितीसमोर साक्ष देऊन अस्पृश्यांच्या हक्काच्या लढ्याला गतिमान केले. त्यांनी अस्पृश्यांना मतदानाचा हक्क तर मागितलाच, त्याचबरोबर स्वतंत्र मतदारसंघ आणि विधिमंडळात नऊ सदस्य नेमणे आदींबाबत पन्नास पानांचे निवेदन सादर केले. याचबरोबर ब्रिटिश सरकारकडे विविध मागण्यांचे निवेदनही पाठवले. हीच बाबासाहेबांच्या सार्वजनिक जीवनातील अस्पृश्यांच्या आत्मसन्मानाच्या, अस्मितेच्या चळवळीची सुरुवात होती. त्याला गती मिळाली ती 21 व 22 मार्च 1920 रोजी कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथील दक्षिण महाराष्ट्र अस्पृश्य परिषदेपासून. या परिषदेचे अध्यक्ष बाबासाहेब होते, तर छत्रपती शाहू महाराज आवर्जुन उपस्थित होते.
दौलताबाद येथील अपमानास्पद वागणूक :
बाबासाहेबांचे नेतृत्व नि कार्य ब्रिटिश भारतात मोठ्या प्रमाणात विस्तारत असताना हैदराबाद संस्थानातील अस्पृश्यांच्या प्रश्नांची खरी जाणीव त्यांना 28 ऑक्टोबर 1934 रोजी त्यांनी आपल्या सहकार्यांसोबत दौलताबाद किल्ल्यास भेट दिली तेव्हा झाली. सर्वजण प्रवासामुळे थकले होते. थोडे ताजेतवाने व्हावे म्हणून बाबासाहेब आणि त्यांच्या सहकार्यांनी किल्ल्यासमोरील हौदावर हातपाय धुतले. तितक्यात एक दाढीधारी मुस्लिम गृहस्थ बाबासाहेबांकडे धावत आला नि ‘धेडांनी हौद बाटविला’ म्हणून आरडाओरड करू लागला. त्याच्या या ओरडण्याने तेथे मोठ्या प्रमाणात तरुण-वयस्क मुस्लिम गोळा झाले. तेही शिव्या देऊ लागले. ‘धेडं फारच माजलेत, स्वतःची पायरी विसरलेत’ असा एकच गिल्ला त्यांनी केला. बाबासाहेबांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुसलमानांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण एक गृहस्थ मात्र सारखा ‘प्रत्येकानं आपल्या धर्माला चिटकून राहिले पाहिजे, आपल्या पायरीने वागले पाहिजे’ असे म्हणत होता, तेव्हा बाबासाहेबांनी त्यास खडसावले नि म्हणाले, ‘हेच तुमच्या धर्माने तुम्हांला शिकवले आहे काय? एखादा अस्पृश्य उद्या मुसलमान झाला तरी तुम्ही त्याला हौदातील पाणी घेण्यास पायबंद कराल काय?’ बाबासाहेबांचे हे वक्तव्य ऐकून उपस्थित मुसलमान शांत झाले; परंतु या प्रसंगाचा बाबासाहेबांच्या मनावरही खोलवर परिणाम झाला. हैदराबाद संस्थानातील अस्पृश्यांना हिंदूंबरोबरच मुसलमानांचाही जातीय त्रास सहन करावा लागतो, याची जाणीवही त्यांना झाली. हैदराबाद संस्थानातील जातीयता नि अस्पृश्यता घालवण्यासाठी प्रबोधन करण्याची, जनजागृतीची खूप गरज आहे, असे त्यांना वाटू लागले.
बाबासाहेबपूर्व अस्पृश्यांची स्थिती :
याच पार्श्वभूमीवर हैदराबाद संस्थानातील अस्पृश्यांच्या चळचळीची त्यातही या संस्थानातील मराठी भाषिक अस्पृश्यांच्या प्रश्नांवर काम करणार्या नेतृत्वाचीही वानवा होती. संघटनाही निर्माण झाल्या नव्हत्या. हैदराबाद संस्थानात एक तर संघटन, राजकीय पक्ष, चळवळींना पोषक असे वातावरण नव्हते. निजामाची एकाधिकारशाही असल्याने अनेक गोष्टींवर येथे निर्बंध होते. त्यात सभा घेण्यासही अटकाव होता. तरीही ज्या काही राष्ट्रीय, धार्मिक, सामाजिक चळवळी येथे काम करीत होत्या, त्यांच्या कार्यक्रमात येथील अस्पृश्यांच्या, वंचितांच्या समाजप्रबोधनाचा विषयच नव्हता. उलटपक्षी हिंदू आणि मुसलमान या दोन्ही धर्मसमूहांकडून त्यांच्यावर अन्यायच होत होता. त्यामुळे कुणाकडे दाद मागावी असे नेतृत्व नि संघटन नव्हते. आर्य समाजाची चळवळ येथे होती. पण तिच्याही काही मर्यादा होत्या. त्यामुळे त्यात काही अस्पृश्य समाजाचे लोक काम करत असले, तरी त्यांच्या सामाजिक प्रगतीसाठी फारसे प्रयत्न झालेले दिसून येत नाहीत. विशेष म्हणजे, या संस्थानात अस्पृश्यांना वगळून सामाजिक आणि राजकीय चळवळ पुढे सरकत होती. येथील अस्पृश्य समाज सामाजिक विषमता, राजकीय नेतृत्वाचा अभाव आणि धार्मिक बंधनांनी जखडला गेला होता; परंतु येथील अस्पृश्यांच्या मनामनात असंतोषाची आग धगधगत होती. राखेखालील निखार्यांना पेटण्यासाठी जशी हवा देण्याची गरज असते, तसे कुणी तरी फुंकर घालणारे नेतृत्व हवे होते. परिस्थिती निर्माण होताच येथील उपेक्षित समाज संघटित होत गेला. त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आगमनापूर्वी सुरुवात झाली होती. पण त्यास विचारांची ठोस बैठक नसल्याने कॅप्टन नसलेल्या जहाजाप्रमाणे त्यांची अवस्था झाली होती.
बाबासाहेबांच्या नेतृत्वाचा स्वीकार :
दुसर्या गोलमेज परिषदेमध्ये 1932 मध्ये अस्पृश्यांचे खरे नेते महात्मा गांधी, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर असा एक वाद निर्माण झाला होता. म. गांधींनी अस्पृश्यांचा पुढारी मीच असल्याचे या परिषदेत सांगितले होते, तर बाबासाहेबांना अस्पृश्यांचे पुढारी म्हणून या परिषदेस ब्रिटिशांनी बोलावले होेते. त्यामुळे भारतातील अस्पृश्यांनी ब्रिटिश सरकारला तारा पाठवून ‘आंबेडकर हेच आमचे नेते आहेत’ असे कळविले होते. देशभरातील अस्पृश्यांनी लाखो तारा पाठवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाठिंबा तर दिलाच, त्याचबरोबर देशभरात बैठका, सभा, परिषदा घेऊनही आपला पाठिंबा जाहीर केला. अशाच बैठका 1932 मध्ये अस्पृश्य कार्यकर्त्यांनी औरंगाबाद (आताचे छ. संभाजीनगर), नांदेड आणि बीड येथे घेतल्या. यासाठी 16 सप्टेंबर 1932 रोजी औरंगाबाद शहरातील उस्मानपुर्यात एक बैठक घेण्यात आली. रामनाथबाबा यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला होता. या बैठकीत बाबासाहेब आंबेडकर हेच आमचे खरे नेते आहेत, असा ठराव तर घेतलाच त्याचबरोबर बाबासाहेबांच्या फोटोची मिरवणूकही त्यांनी काढली होती. या ठरावाची आणि मिरवणुकीची माहिती ‘जनता’च्या अंकात 1932 मध्ये प्रसिद्ध झाली होती.
मराठवाड्यातील पहिले मार्गदर्शन :
वर लिहिल्याप्रमाणे बाबासाहेब 27 डिसेंबर 1934 रोजी वेरुळची बुद्ध लेणी, दौलताबादचा किल्ला, औरंगाबाद बुद्ध लेणी पाहण्यासाठी औरंगाबादला आले. वेरुळ, दौलताबादला जाण्यासाठी औरंगाबाद येथूनच जावे लागत असे. बाबासाहेब औरंगाबाद येथे आल्याचे कळताच येथील अस्पृश्य कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यांना पाहण्यासाठी शहरातील शेकडो लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. पैठण गेट येथील काशिनाथ कांबळे यांच्या पुढाकाराने त्यांच्या वस्तीत बाबासाहेबांची सभा घेण्याचेही निश्चित झाले; परंतु निजामाच्या पोलिसांनी या सभेला परवानगी दिली नाही. बाबासाहेबांनी सभेऐवजी बैठक घेऊन समाजबांधवांना मार्गदर्शन केले. यावेळी शहरातील बापन्नपुर्यांतील अस्पृश्य समाज उपस्थित होता.
बैठकीनंतर काशिनाथ कांबळे यांच्या घरीच बाबासाहेबांनी जेवण केले. ज्वारीची गरमागरम भाकरी, वरण आणि तोंडी लावायला बोंबलाची चटणी गोधनबाईंनी केली होती. त्यानंतर त्याच दिवशी दुपारनंतर उस्मानपुर्यातील ‘मन्सूर यारजंग देवडीत’ आताच्या भीमपुरा येथे 2 डिसेंबर 1932 रोजी बाबासाहेबांनी एक बैठक घेतली होती. त्याच ठिकाणी आता बुद्ध विहार आहे. ही बैठक किसनराव वाघमारे यांच्या घरी झाली होती. या बैठकीस भाऊसाहेब मोरे, काशिनाथ कांबळे, दादाराव काळे, मोहनराव जोगदंड, पोचान्ना मुत्याळ, संभाजी वाघमारे, गोविंद वाघमारे, धनाजी जोगदंड, किराडपुर्यातील इंगळे, किलेअर्कचे वामराव कांबळे आदी उपस्थित होते.
औरंगाबाद येथील बैठकीनंतर बाबासाहेबांची रात्री थांबण्याची व्यवस्था ‘चौरसमधील सराय (गेस्ट हाऊस)’ येथे केली होती.
दुसर्या दिवशी म्हणजे 28 डिसेंबर 1934 रोजी बाबासाहेबांनी उस्मानपुर्यातील शिरापुरीच्या नाल्यावर चिंचेच्या झाडाखाली (माधवराव घोरपडे यांच्या शेेतात) बावन्नपुर्यातील सर्व जातपंचायत प्रमुखांना आणि अस्पृश्य बांधवांना मार्गदर्शन केले. याच बैठकीत मक्रणपूरला परिषद घेण्याचे संकेत देण्यात आले, असे म्हटले जाते. पण यास अधिकृत दुजोरा मिळत नाही.
माळीवाडा, दौलताबादला स्वागत :
शिरापुरीच्या बैठकीनंतर बाबासाहेब आणि त्यांच्या सोबतचे कार्यकर्ते दौलताबाद आणि वेरुळकडे रवाना झाले. वाटेत माळीवाडा येथे समाजबांधवांनी बाबासाहेबांचे स्वागत केले. यात चोखोबा साठे, विठ्ठल साठे, दादाराव काळे, मोहनराव जोगदंड, शामराव पुंजाजी केदारे, कासोडा येथील बाबुराव जाधव आणि दौलताबाद येथील गायकवाड परिवारातील सदस्यांचा समावेश होता. बाबासाहेबांनी आपल्या सहलीचा कार्यक्रम जाहीर केला नव्हता. पण माळीवाडा, दौलताबाद, वेरुळ येथील समाजबांधवांनी बाबासाहेबांच्या येण्याची पूर्वकल्पना दिली होती. त्यामुळे “दौलताबादच्या वेशीजवळ आमचे लोक जमले होते आणि आमच्या आगमनाची वाट पाहत उभे होते. आमच्या लोकांनी मागणी केली, की आम्ही खाली उतरावे. प्रथम चहा-फराळ करावा नि नंतरच किल्ला पहाण्यासाठी जावे. आम्ही त्यांच्या सूचनेला मान्यता दिली नाही. आम्हाला चहाची जरूरी होती; पण किल्ला पाहण्यासाठी पुरेसा वेळ हवा होता. म्हणून किल्ला पाहून परतताना चहा घेऊ, असे आमच्या लोकांना आम्ही सांगितले.” असे बाबासाहेबांनी सांगितले आहे. बाबासाहेबांना दौलताबादचा किल्ला पाहण्यासाठीही कष्ट घ्यावे लागले. त्यांना किल्ल्यात प्रवेश मिळेल की नाही असे वाटत असताना सुपरिटेडेंटने परवानगी तर दिली. पण किल्ल्यातील कोणत्याही स्वरूपातील पाण्यास स्पर्श करण्यास मनाई करण्यात आली. तसेच त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी एक कर्मचारीही सोबत पाठवला. वेरुळची बुद्ध लेणी पाहून बाबासाहेबांनी ही सहल आटोपती घेतली. तेथून औरंगाबादची बुद्ध लेणी पाहून बाबासाहेब 30 डिसेंबर 1934 रोजी सायंकाळी मुंबईत पोहचले.
बाबासाहेबांचे विचार रुजण्यास सुरुवात :
मराठवाड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्ण अस्पृश्यांच्या चवळवळीचे स्वरूप केवळ जनजागृती आणि थोड्या फार समाज सुधारणांच्या मर्यादेत अडकले होते. अस्पृश्यांच्या या चळवळीला 1934 नंतर बाबासाहेबांच्या विचारांचं कोंदण मिळताच तिनं हळूहळू आक्रमकतेनं काम करण्यास सुरुवात केली. आता ती अंतर्गत सामाजिक सुधारणा, पारंपरिक, जातीय गुलामगिरीची कामं फेकून देण्याबरोबरच राजकीय हक्काची भाषा बोलू लागली. नाशिक येथील काळाराम मंदिराचा सत्याग्रह, येवला येथील अस्पृश्यांची परिषद, मनमाड-सिकंदराबाद रेल्वे लाईनच्या कामावरील बहुजन, अस्पृश्यांच्या संपर्कातून बाबासाहेबांच्या चळवळीबरोबरच त्यांच्या कामांची, विचारांची माहिती संस्थानातील मराठी भाषिक अस्पृश्यांना होऊ लागली. त्या काळात मराठवाड्यात दलितानंदसारख्या आंबेडकरी कवी-जलसाकारांच्या गीतानं समाज प्रबोधनाबरोबरच विचारांचीही पेरणी केली. त्यामुळं कसदार जमीन तयार होऊन आंबेडकरी विचारांचं पीक जोमानं बहरू लागलं. हैदराबाद संस्थानातील अनेक अस्पृश्य नेत्यांनीही बाबासाहेबांचं नेतृत्व मान्य करून त्यांच्या विचारांबरहुकूम नि मार्गदर्शनाखाली काम करण्यास सुरुवात केली होती. त्यात बी.एस. व्यंकटराव या संस्थानातील बड्या अस्पृश्य नेत्याचा समावेश होता. ते तर आंबेडकरमय झाले होते. नंतर त्यांना हैदराबाद संस्थानातील प्रतिआंबेडकर किंवा हैदराबादी आंबेडकर म्हणून संबोधले जाऊ लागले. त्यांचा तसा गौरव खुद्द डॉ. बाबासाहेबांनी मुंबईतील एका सभेतही केला होता. यानंतर संस्थानातील अस्पृश्यांचे प्रमुख नेते पी.आर. व्यंकटस्वामी, अरिग्ये रामस्वामी, जे.एच. सुबय्या आदीही आंबेडकरमय झाले होते. त्यामुळं हे सर्व नेते मराठवाड्यातील अस्पृश्य पुढार्यांसोबत येवल्याच्या परिषदेला उपस्थित राहिले.
राखीव मजदूर संघास हिंदूंचा विरोध :
हैदराबाद राज्याच्या विधिमंडळात अस्पृश्यांना दहा जागा देण्यात याव्यात याबाबत हैदराबादला 23 मे 1937 रोजी बेठक झाली. या बैठकीत स्वतंत्र मजूर पक्षाचे आमदार आर.आर. भोळे यांना बाबासाहेबांनी पाठविले होते; परंतु या मागणीस हिंदूंनी कडाडून विरोध केला. संस्थानातील हिंदू स्टँडिंग कमिटीने अस्पृश्यांच्या मागणीची कुणकुण लागताच 14 मे 1937 रोजी निजाम सरकारकडे ‘अस्पृश्यांच्या मोठ्या लोकसंख्येचा विचार करता त्यांचे हितरक्षण होणे आवश्यक आहे. पण त्यांचे स्वतंत्र मतदारसंघ करून किंवा त्यांना खास राखीव जागा ठेऊन हिंदू धर्मात कलह माजवू नये,’ असे निवेदन दिले. ब्रिटिश भारतातील अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघांना जसा म. गांधींनी विरोध केला तसाच हा प्रकार होता. बाबासाहेबांनी निजामाकडे यासाठी पाठपुरावाही केला. पण लोकशाहीचे अधिकार देण्यासाठी निजाम गादीवर बसलाच नव्हता. त्यामुळे त्याचा विचारही झाला नाही.
अस्पृश्यांच्या परिषदांचा विचार :
जागृतीचे वारे मराठवाड्यातील अस्पृश्यांमध्ये जोमाने वाहू लागले होते. नव्याने शिकलेले तरुण कार्यकर्ते कामाला लागले होते. त्यांनी अस्पृश्यांमध्ये सामाजिक परिवर्तनाबरोबरच शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय स्वरूपातील विचार गावोगावी जाऊन सांगण्यास सुरुवात केली. बाबासाहेबांच्या ‘बहिष्कृत भारत’चे अंक मागवून, नंतर ‘जनता’चे अंक मागवून त्याचे सामूहिक वाचन होऊ लागले. यातूनच अस्पृश्यांच्या हक्क आणि प्रबोधनासाठी मराठवाड्यात बाबासाहेबांच्या उपस्थितीत परिषदा, सभा घेण्याचा विचार पुढे आला; परंतु निजामाच्या संस्थानात अशा सभा-परिषदांना परवानगी मिळत नसल्याने मराठवाड्यास लागून असलेल्या गावांत अशा परिषदा घेण्याचा विचार पुढे आला. त्यातूनच औरंगाबाद जिल्ह्यातील आताच्या कन्नड तालुक्यातील नि तत्कालीन चाळीसगाव तालुक्यातील मक्रणपूर आणि आताच्या उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील नि तत्कालीन सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तडवळे (ढोकी) येथे अशा दोन परिषदा घेण्यात आल्या.
मक्रणपूर परिषदेत घुमला जयभीमचा नारा :
मराठवाड्यातील आंबेडकरी चळवळीची खर्या अर्थानं सुरुवात झाली ती मक्रणपूर परिषदेपासून. असंही म्हणता येईल, मक्रणपूर परिषदेपासून अस्पृश्योद्धाराच्या मानवतावादी लढ्याला बाबासाहेबांच्या विचारांची पार्श्वभूमी प्राप्त झाली. त्यांच्या चळवळीला नेमकी दिशा मिळाली. आपले नेमके शत्रू कोण, मित्र कोण याचीही जाणीव झाली. ही परिषद 30 डिसेंबर 1938 रोजी घेण्यात आली. बी.एस. मोरे अर्थात भाऊसाहेब मोरे यांच्या पुढाकारामुळेच हे शक्य झालं. खानदेशातील हरिभाऊ पाटसकर यांना बाबासाहेबांनी डिसेंबरअखेरीस चाळीसगावला येण्याचं मान्य केलं होतं. हीच संधी साधून भाऊसाहेब मोरे यांनी बाबासाहेबांची भेट घेऊन मराठवाड्यातील अस्पृश्यांच्या परिषदेसाठी येण्याची विनंती केली. ही परिषद हैदराबाद संस्थानातील कन्नड तालुक्यात घेण्याचेही निश्चित झाले होते. पण निजाम सरकारने या परिषदेला संस्थानात परवानगी नाकारल्याने ही परिषद कन्नडजवळच्या; पण ब्रिटिश भारताताल्या मक्रणपूर येथे घेण्याचा निर्णय झाला. या परिषदेस औरंगाबाद जिल्हा अस्पृश्य परिषद असे संबोधण्यात आले. (बाबासाहेबांच्या काळातील कोणत्याही उपक्रमांना दलित असा शब्द वापरला गेला नव्हता. बहुतेक ठिकाणी तो अस्पृश्यांच्या सभा, परिषदा असाच वापरला गेला आहे.) ही परिषद मक्रणपूरच्या आंबराईत झाली. आता या गावाला ‘भीमपुरा’ म्हणतात. या परिषदेचे मुख्य संयोजक अर्थातच भाऊसाहेब मोरे होते, तर स्वागताध्यक्ष चाळीसगावचे आमदार श्यामराव जाधव होते. परिषदेच्या संयोजन समितीत भिकाजी काशिनाथ थोरात, शिवराम बाळा मोरे आदी होते. भाऊराव गायकवाड, दौलतराव जाधव, प्रभाकर सोहम, जिवाप्पा ऐदाळे आदींसह मराठवाड्याच्या सर्वच भागातून कार्यकर्ते, पुढारी, समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. निजामाच्या पोलिसांनी या परिषदेला अस्पृश्यांनी जाऊ नये म्हणून अनेक ठिकाणी आडवले. पण समाजाने आडवाटा, जंगले आणि डोंगरदर्या तुडवत आपल्या लाडक्या नेत्याला पाहण्यासाठी, त्यांचे विचार समजून घेण्यासाठी उपस्थिती लावली. या परिषदेसाठी धुळ्याचे पुंजाजीराव लळिंगकर यांच्या नेतृत्वाखालील स्काऊट आणि समता सैनिक सैन्यदलाला मुद्दाम निमंत्रित करण्यात आले होते. ब्रिटिश पोलिस बंदोबस्तास होते. प्रास्ताविक भाषणात भाऊसाहेब मोरे यांनी ‘जयभीम’च्या नार्याने सुरुवात केली. हीच घोषणा पुढे अस्पृश्यांनी अभिवादनासाठी रुढ केली. येथूनच जयभीम हा स्वाभिमानाचा, मुक्तीचा, संघर्षाचा आणि अस्मितेचा, समतेच्या संगराचा मूलमंत्र झाला. स्वागताध्यक्ष जाधव यांनी मराठवाड्यातील अस्पृश्यांच्या अडचणी सांगितल्या.
मनाचा ठाव घेणारे बाबासाहेबांचे भाषण :
या परिषदेतील बाबासाहेबांचे भाषण मनाचा ठाव घेणारे होते. ते म्हणाले, “तुमच्यावर अनंत बंधने आहेत. तुम्हाला तोंड उघडण्यास सक्त मनाई आहे. तुम्ही निवडणुका लढवू शकत नाही. आम्ही ब्रिटिश भारतात आहोत म्हणून आम्हाला गर्व्हरपर्यंत जाता येते; परंतु तुम्ही तुमचे दुःख कोणाला सांगणार? तथापि, तुम्ही आमच्या रक्ताचे आहात. तेव्हा मी तुमची दुःखे नाहीशी करण्याचा प्रयत्न करीन. मी ब्रिटिश भारतातील मुसलमान बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रसंगी सहाय्य करतो. जेवढे म्हणून दंगे मुंबईत झाले, त्यातील दंगलग्रस्त मुसलमानांस मदत केली. अस्पृश्यांप्रमाणे मुसलमानही अल्पसंख्यांक आहेत. त्या दृष्टीने निजाम सरकारने व मुसलमानाने आम्हास मदत करावी,” असे आवाहन बाबासाहेबांनी केले. या परिषदेचा फार मोठा प्रभाव अस्पृश्यांवर जागृतीच्या अनुषंगाने पडला. समाजाने मृत जनावरांचे मांस खाणे सोडून दिले. स्वच्छतेकडे लक्ष पुरविले, शिक्षणाचेही महत्त्व वाढू लागले.
तडवळेची दुसरी परिषद :
मक्रणपूरनंतर मराठवाड्यात दुसरी परिषद तडवळे (ढोकी) जिल्हा धाराशिव (उस्मानाबाद) येथे 22 व 23 फेब्रुवारी 1941 रोजी झाली. ही प्रामुख्यानं महार-मांग परिषद होती. 22 फेब्रुवारी रोजी परिषदेचे उद्घाटन, तर 23 फेब्रुवारी रोजी खुले अधिवेशन, असे या परिषदेचे स्वरूप होते. सोलापूरचे आमदार जिवाप्पा ऐदाळे यांनी 8 फेब्रुवारी 1941 रोजी मुंबईत राजगृहावर जाऊन बाबासाहेबांची भेट घेऊन तारीख मागितली होती आणि बाबासाहेबांनी 22 व 23 फेब्रुवारी या तारखा निश्चित केल्या होत्या. बाबासाहेबांची तारीख मिळताच कार्यकर्त्यांनी वायूवेगानं या परिषदेची माहिती पॉम्पलेट्स, पत्रके मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात वाटली होती. ऐदाळे यांनी बाबासाहेबांना कुर्डुवाडीमार्गे येण्याची तार केली होती. मुंबईहून निघून बाबासाहेब 22 फेब्रुवारीच्या सकाळीच कुर्डुवाडीस येऊन पोहोचले होते. त्यांच्या स्वागतास ऐदाळे, तोरणे मास्तर, भगवान भिवाजी भालेराव उपस्थित होते. तेथून बाबासाहेब कळंब रोड तथा तडवळे येथे 11 वाजता मिनी गेज रेल्वेने (छोटी रेल्वे) दाखल झाले. वाटेत जागोजागी बाबासाहेबांचे स्वागत करण्यात आल्याने कळंब रोड येथे ही रेल्वे पोहचण्यास विलंब झाला होता. ही रेल्वे महार-मांग अनुयायांनी तुडुंब भरली होती. आत जागा मिळाली नसल्यानं लोकांनी रेल्वेच्या वरच्या टपावर बसूनही प्रवास केला, तर काहींनी जीव धोक्यात घालून दोन डब्यांच्यामध्ये उभे राहूनही प्रवास केला होता. रेल्वेला लोंबकळणारे किती तरी होते, त्यांचीही गणती नव्हती.
बाबासाहेबांसोबत बार्शीचे नगराध्यक्ष भातनकर, जयशंकर मिलचे शंकरराव झाडबुके, शांताराम उपशाम गुरूजी होते. रेल्वेस्टेशन ते भीमनगर अशी गावच्या मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली होती. एकावन्न बैलांचा सुशोभित रथ तयार करण्यात आला होता. बाबासाहेबांचे पुष्पहार घालून भव्य स्वरूपात स्वागत करण्यात आले. समता सैनिक दलाच्या सैनिकांनी त्यांना मानवंदना दिली. रथापुढे लेझीम पथक, तुतार्या, हलग्या आणि बॅण्ड पथक होते. तेरखेडा येथून आणलेले फटाके हवेत उडवले जात होते. लाठ्या-काठ्या, दांडपट्टा खेळला जात होता. हे सगळेच नेत्रदीपक दृष्य होते. काठ्या हातात घेऊन समता सैनिक दलाने संरक्षक कडे तयार केले होते. बाबासाहेबांच्या केसालाही धक्का लागणार नाही याची डोळ्यात तेल घालून खबरदारी घेण्यात आली. विशेष म्हणजे, बाबासाहेबांचे स्वागत अस्पृश्यांबरोबरच उच्च जातीतील लोकांनीही केले होते. प्रत्येक घरासमोर सडा टाकून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. ही मिरवणूक सभामंडपात पोहचण्यास तीन तास लागले होते. पंधरा फूट लांब, बारा फूट रुंद आणि चार फूट उंच स्टेज तयार करण्यात आले होते. पुढे भव्य असा सभामंडप उभा करण्यात आला होता.
तडवळेच्या शाळेत बाबासाहेबांचा मुक्काम :
बाबासाहेबांची रात्री थांबण्याची व्यवस्था तडवळे येथील शाळेच्या एका खोलीत करण्यात आली होती. ही खोली आता संरक्षित करण्यात आली आहे. या शाळेच्या जागेवर बाबासाहेबांचे भव्य स्मारक करण्यात येणार आहे. लेखकाने या जागेस भेट देऊन पाहणी केली आहे. तेथे बाबासाहेबांसोबतचा कार्यकर्त्यांचा ग्रुप फोटो जपून ठेवला आहे. इतरही काही फोटो आहेत. रात्री या शाळेत अंधार होऊ नये म्हणून दहा गॅसबत्या भाड्यानं आणल्या होत्या. सायंकाळी जेवण झाल्यानंतर बाबासाहेबांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. समाजबांधवांनीही बाबासाहेबांच्या उशिरापर्यंत भेटी घेतल्या. बाबासाहेबांनी काही वेळ वाचनही केलं. रात्रभर समता सैनिक दलाने बाबासाहेबांच्या सुरक्षेसाठी खडा पहारा दिला होता. दुसर्या दिवशी 23 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा-साडेअकरा वाजता कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. समाजावर होणार्या अन्याय-अत्याचाराच्या, जुलमाच्या, दुःखाच्या गोष्टी अनेकांनी त्यांच्या कानावर घातल्या. काहींनी निवेदनेही दिली. ही बैठक तासभर चालली. अन्याय-अत्याचाराच्या कहाण्या ऐकून बाबासाहेब खूप अस्वस्थ झाले, तसेच संतप्तही झाले; ते उद्गारले, “तुम्ही एवढा अत्याचार का सहन करता? तुम्ही नामर्द आहात का? हातात बांगड्या भरल्या आहेत का? एखाद्या मुंगीच्या अंगावर चुकून पाय पडला तर ती कडाडून चावा घेते; तुम्ही तर बलशाली बलदंड माणसे आहात. निमूटपणे सहन का करता? खाली शेपटी घालून का बसता? आतापर्यंत जे झाले ते झाले, याच्यापुढे तुमच्यावर होणार्या अत्याचाराचा प्रतिकार करा. मी तुमच्या पाठीशी आहे. अशा गोष्टी घडल्यास त्या तुम्ही मुंबईस घेऊन या. मी त्यांचे बघून घेईन! एकीने वागा, म्हणजे तुम्हाला तुमच्यावर होणार्या अन्याय-अत्याचाराचा प्रतिकार करता येईल.” बाबासाहेबांच्या या मार्गदर्शनाचा कार्यकर्त्यांच्या मनावर चांगलाच परिणाम झाला. नंतर बाबासाहेबांसोबत कार्यकर्त्यांचा आणि सन्मित्र संघाच्या पदाधिकार्यांचा फोटो काढण्यात आला. या परिषदेचे फोटो काढण्यासाठी बार्शीचे फोटोग्राफर पराते यांना बोलावण्यात आले होते.
मुख्य परिषदेच्या स्टेजवर बाबासाहेबांसोबत हरिभाऊ तोरणे, जिवाप्पा ऐदाळे, देवीदासराव मारूतीराव कदम, गावातील प्रतिष्ठितांपैकी शंकरराव निंबाळकर, श्रीमंत पाटील, शंकरराव दडपे, बाबुराव देशपांडे, बापूसाहेब देशपांडे (वकील), शंकर ढवळे, गणेशलाल डाळे आदी होते. भगवान भालेराव यांनी या परिषदेचे अध्यक्षस्थान बाबासाहेबांनी स्वीकारावे, अशी विनंती केली, त्यास वाशी ता. भूम (आता तालुका वाशी) येथील नामदेव लिंबाजी भोसले यांनी अनुमोदन दिले. शाहीर अर्जुन भालेराव यांच्या स्वागत गीतानंतर तुळजापूरचे देवीदासराव कदम यांनी स्वागताचे भाषण केले. त्यानंतर हरिभारऊ तोरणे, जिवाप्पा ऐदळे आणि उपशाम गुरूजी यांची भाषणे झाली.
परिषदेतील बाबासाहेबांचा संदेश :
बाबासाहेबांनी सविस्तर भाषण केले. त्यातही त्यांनी समाज बांधवांना उद्देशून सांगितले, “ जातीची परंपरागत कामे करणे म्हणजे, गुलामगिरी स्वतःवर लादून घेण्यासारखे आहे. ही परंपरागत कामे सोडून दिली पाहिजेत. सुशिक्षितांनी आपल्या अडाणी, अशिक्षित बांधवांना हे पटवून दिलं पाहिजे. ज्या ज्या मार्गानं तुम्हाला जे शक्य होईल, त्या त्या मार्गानं समाज जागृत केला पाहिजे. या लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून भारतात लाखो एकर गायरान पडीक जमिनी आहेत, त्या अस्पृश्यांना कसायला दिल्या पाहिजेत. वतनदार महार,मांगांसबंधी कैफियत राज्यपालांकडे मांडून तिची सोडवणूक मी करेन. ज्यांच्यावर चॅप्टर केसेस केलेल्या असतील, त्यादेखील काढून घेण्याचा मी प्रयत्न करीन. आपली मुलं कशाही परिस्थितीत शिकवली पाहिजेत. शिक्षणानेच आपल्या समाजाचा उद्धार होणार आहे.”
बाबासाहेब त्यावेळच्या अनेक ज्वलंत विषयांवर बोलले. महार-मांग समाजाने एकत्र राहिले पाहिजे, भेदाभेद सोडला पाहिजे. आपली एकी दाखवून दिली पाहिजे. एकमेकांच्या दुःखात, सुखात सहभागी झाले पाहिजे, असेही सांगितले. अत्यंत शांततेत प्रचंड जनसमुदाय बाबासाहेबांचे भाषण शांतचित्ताने जीवाचे कान करून ऐकत होता.
बैलगाडीची जपवणूक :
बाबासाहेबांचे हे भाषण कितीतरी वेळ पुढे चालू रहावे, ते कधी संपू नये असेच सर्वांना वाटत होते. या परिषदेच्या यशस्वीतेसाठी समाजबांधवांनी मोठ्या प्रमाणात वर्गणी दिली. या कार्यक्रमात बाबासाहेबांना दहा हजार रुपयांची थैली देऊन त्यांचा सत्कारही करण्यात आला. परिषदेनंतर महार-मांग समाजाचे एकत्रित सहभोजनही घडवून आणण्यात आले. ही मोठी क्रांती होती. एकाएका मातंग बांधवास हाताला धरून महार बांधवांनी पंगतीला बसविले आणि मांडीला मांडी लावून सहभोजनाचा आनंद घेतला. विशेष म्हणजे, क्रूर परंपरेचा पहिल्यांदा बीमोडही केला. दुपारी चार वाजता बाबासाहेब मोटारीने बार्शीला गेले. तिथे बार्शी नगर परिषदेने त्यांना मानपत्र देऊन त्यांचा सन्मान केला. विशेष म्हणजे, राजुरी (यमाईचे) गावचे संभाजी नागोराव इंगळे हे स्वतःची बैलगाडी घेऊन तडवळे रेल्वे स्टेशनवर आले होेते. त्यांच्या वंशजांनी ही बैलगाडी अद्यापही जपून ठेवली आहे.
समाज सुधारणेच्या कामाला गती :
तडवळे येथील महार-मांग वतनदार परिषद यशस्वी करण्याचे संपूर्ण श्रेय सोलापूर जिल्ह्यातील आणि हैदराबाद संस्थानातील मराठवाड्यातील महार-मांग कार्यकर्त्यांना द्यावे लागेल. बाबासाहेबांनी दोन दिवस थांबून संपूर्ण वेळ देऊन समाजातील लोकांना, पुढार्यांना आणि कार्यकर्त्यांना जे अनमोल मार्गदर्शन केलं, त्यांच्यासोबत चर्चा केल्या त्यांची गार्हाणी ऐकून घेतली. त्यांचा हुरूप वाढवला, त्यांच्यात उमेद जागृत केली. त्यांना मी तुमच्यासोबत आहे, तुम्ही लढायला शिका, संघर्ष करण्यासाठी एक व्हा, आपल्या मुलांना कोणत्याही परिस्थितीत शिकवा, जातीय परंपरेची कामे सोडून आत्मविश्वास वाढवा, अस्मिता जपा, स्वाभिमान वाढवा, तुम्ही बलदंड माणसं आहात. त्यामुळं तुमच्यात क्रांती करण्याची ताकद आहे, तिचा वापर करा असा संदेश तर दिलाच त्याचबरोबर मानसिक, वैचारिक असं बळही दिलं. त्यामुळं बाबासाहेबांच्या क्रांतिकारक विचारानं आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या सान्निध्यात महार-मांग तसेच इतरही सर्वच समाज भारावून गेले. ही परिवर्तनाची जादू केवळ तडवळे परिसरातील अस्पृश्यांवरच झाली नाही, तर ती सर्वदूर मराठवाडा नि मराठवाड्याच्या सीमाभागातील ब्रिटिश भारतातील लोकांवरही झाला. समाज सुधारणेच्या कामाला गती मिळाली.
(लेखक सामाजिक व माध्यम विषयाचे तज्ज्ञ आहेत.)
Comments
Post a Comment