संवेदनशील व कणखर राष्ट्रपती के आर नारायणन

 संवेदनशील व कणखर राष्ट्रपती,  के आर नारायणन


दिवंगत राष्ट्रपती के .आर . नारायणन हे देशाच्या एकूण राष्ट्रपतीत उच्च शिक्षित आणि तितकेच विद्वान , परराष्ट्र विषयातील तज्ज्ञ , विचारवंत राष्ट्रपती होते ... त्यांच्या स्वभावात नि वागणुकीत प्रचंड नम्रता पण तितकीच कणखरपणा होता ... भारतीय संविधान नि त्यातील मूल्यांवर त्यांची केवळ श्रद्धा नव्हती तर ती मूल्य प्रत्यक्षात कृतीत आणणाऱ्या पैकी ते एक राष्ट्रपती होते... भारतरत्न , सावधानकार , विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केवळ श्रद्धा नव्हती तर ते त्यांचे खरेखुरे #आयडॉल  होते ...  आदर्श होते ... प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन मिळवणाऱ्या काही विद्यार्थ्यांपैकी ते एक होते ...परदेशात उच्च शिक्षण घेऊन देशाची सेवा करणाऱ्यापैकी ते एक होते ... 


केरळमधील उझवूर येथे 27 ऑक्टोबर 1920 रोजी जन्म  झालेल्या  नारायणन यांचं 

नवी दिल्ली येथे 9 नोव्हेंबर 2005 रोजी निर्वाण झालं ...आज त्यांची #पुण्यतिथी ...त्यांना #विनम्रअभिवादन....


भारताचे दहावे राष्ट्रपती राहिलेले  कोचिरील रामन नारायणन उर्फ के. आर. नारायणन यांची खरी जन्म तारीख  4 फेब्रुवारी 1921 पण  कागदोपत्री ती तारीख चुकून 27 ऑक्टोंबर 1920 अशी नोंदवली गेली ... केरळमधील उझवूर या लहान खेड्यात एका अस्पृश्य कुटूंबात त्यांचा जन्म झाला ... बालपण अत्यंत हलाकीत गेलं ... त्यामुळं  दररोज १५ मैल पायी चालत जावून त्यांनी आपलं  प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं ... 


इंग्रजी विषयात पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी पत्रकारीतेचं  शिक्षण घेवून 'हिंदू' या दैनिकात वार्ताहर म्हणूनही काही काळ काम केलं होतं ...  1944 -- 45  च्या दरम्यान द हिंदूचा वार्ताहर म्हणून महात्मा गांधी यांची  भेट घेण्याचाही संधीही त्यांना लाभली  आणि गांधीजींच्या विचारानं ते बरेच  भारावून गेले नि  अंतर्बाह्य गांधीवादी बनले...  


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रेरणा घेवून त्यांनी 'London School of Economics' या शिक्षणसंस्थेत शिक्षण घेवून तेथून त्यांनी अर्थशास्त्राची पदवी प्रसिद्ध अर्थतज्ञ  प्रो. हेराल्ड लास्की यांच्या मार्गदर्शनाखाली संपादन केली ... याच शिक्षण संस्थेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही  अर्थशास्त्राची पदवी  संपादन करून डॉक्टरेट मिळवली होती...


इंग्लंडमधील वास्तव्यात व्ही.के. कृष्णन मेनन हे त्यांचे सहकारी होते...  त्यांच्या सोबत इंडिया लिगमध्येही त्यांनी सहभाग घेतला ... तेथील शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रो.लास्की यांनी नेहरूंना नारायणन यांची शिफारस करणारे पत्र लिहीले होते  ... भारतात परतल्यावर त्यांनी नेहरूंची भेट घेतली आणि नेहरूंच्या विचारांनीही  ते खूप प्रभावित झाले...  नेहरूंनी त्यांची नियुक्ती स्वत:च्या खात्यातील परराष्ट्रसेवेत केली...  टोकियो, लंडन, बँकॉंक, हनोई येथे त्यांनी भारतीय राजदूत म्हणून काम पहिले-... त्यांचे कार्य पाहून नेहरूंनी १९५५ मध्ये त्यांचा गौरव The Best Diplomat of the Country असा केला होता...


ब्रह्मदेशात राजदूत म्हणून कार्यरत असताना त्यांची ओळख 'मा तिंत तित' या तरूणीशी झाली ... या ओळखीचं रुपांतर प्रेमात होवून नंतर त्यांचं   " मा तित तींत "  यांच्याशी विवाहात रूपांतर झालं ... भारतीयन परंपरे प्रमाण  तींत या  'उषा नारायणन' म्हणून ओळखल्या जावू लागल्या...  अमेरिकन दुतावासात त्यांनी 1980 ते 1984  दरम्यान काम  केलं ... भारतात परतल्यानंतर त्यांची  जवाहर नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नेमणूक करण्यात आली ... तेथेही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता  ... 


इंदिरा गांधी यांच्या विनंतीवरून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि  1984  मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत ते ओट्टपालम या केरळमधील मतदारसंघाचे पहिल्यांदा संसद सदस्य झाले...त्यांनी  केंद्रीय मंत्री मंडळात मंत्रीपदही भुषविलं...  त्यानंतर 1989 आणि 1992 मधेही  ते पुन्हा संसद सदस्य म्हणून निवडून आले ... त्याच वर्षी म्हणजे 1992 मध्ये त्यांची शंकर दयाळ शर्मा यांच्या राष्ट्रपती पदाच्या काळात  उपराष्ट्रपती म्हणून नियुक्त झाली   ... तर पुढे 1997 मध्ये टि.एन. शेषन यांचा पराभव करून ते राष्ट्रपती झाले... 


जेंव्हा नारायणन राष्ट्रपती पदी निवडून आले त्या वर्षी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल हे होते ... हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचं सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं ...  पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल  यांनी 15 ऑगस्ट 1997 रोजीच्या  भाषणात   “स्वातंत्र्याच्या स्वर्णमहोत्सवी वर्षात गांधीजींचं  स्वप्न पूर्ण झालं , कारण अस्पृश्य  कुटूंबातील के.आर. नारायणन राष्ट्रपती झाले आहेत ... " असं मत व्यक्त केलं होतं...


के.आर. नारायणन हे राष्ट्रपतीपदावर विराजमान होणारे जन्मानं अस्पृश्य असणारे पहिले भारतीय नागरीक असले तरीही ते समस्त भारतीयांचे नेते आहेत ,  अशीच त्यांची प्रतिमा होती ... त्यातच त्यांचे मोठेपण होतं ... राष्ट्रपती पदावर असताना त्यांनी आतापर्यंत केवळ स्टॅम्पड  राष्ट्रपती म्हणून काम केलं नाही तर आपल्या कमानी स्वतः ची स्वतंत्र  ओळख निर्माण केली ... राष्ट्रपती पदाची समारंभाचं  मानद पद म्हणून असलेली ओळख  त्यांनी  पुसून टाकण्याचा यशस्वी प्रयत्न केला...  यापूर्वीचे राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करणं  टाळत असतं , मात्र नारायणन यांनी 1998  च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करून, मतदान न करण्याची प्रथा मोडीत काढली ...


नारायणन यांचं व्यक्तिमत्व प्रसंगी अतिशय कठोर आणि तेवढेच संवेदनशील असं  होतं ...  त्यांनी राष्ट्रपती पदाच्या काळात त थेटपणे 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पडण्याच्या घटनेबद्दल त्यांनी टिप्पणी करून, ती घटना लांच्छनास्पद होती आणि त्यानंतरची परिस्थिती ही गांधीजींच्या हत्येनंतरच्या स्थितीसारखी विषन्न असल्याचं  स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं होतं ... भारतीय प्रजासत्ताकच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात घटना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या  "शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा" हा संदेश समस्त भारतीयांसाठी आवश्यक  असल्याचं  प्रतिपादन करून, त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती ...   


अटल बिहारी वाजपेयी  सरकारच्या घटना पुनर्विलोकन आयोग स्थापन करण्याच्या घटनेचा 26 जानेवारी 2000 च्या देशाला उद्देशून केलेल्या भाषणात घेतला होता ... केंद्र सरकारने लिहून दिलेली स्क्रिप्ट न वाचता राष्ट्रपती हे स्वतंत्र विचारांचे नि तटस्थ विचरांचेही असू शकतात हे दाखवून देत त्यांनी  त्यांचा कणखरपणाही दाखवून दिला  ...


विशेष म्हणजे त्यांनी दोन वेळा लोकसभा बरखास्त केली ... एकदा इंद्रकुमार गुजराल यांनी राजीनामा दिल्यावर आणि त्यानंतर एआयडीएमकेनं अटल बिहारी वाजपेयी सरकारचा पाठींबा काढून घेतल्यावर ...  नारायणन यांनी इतरही अनेक निर्णय स्वतंत्रपणे  घेतले... कारगिल युद्धाबाबत राज्यसभेत चर्चा करण्यास सरकारनं तयारी दर्शवावी असा सल्ला त्यांना पंतप्रधान वाजपेयींना दिला होता...  कारण 1962 च्या युद्धाच्या वेळी वाजपेयींनी असाच आग्रह नेहरूंसमोर केला होता आणि नेहरूंनी तो मान्य करून राज्यसभेत त्यावर चर्चा केली होती ... यावेळी तो संदर्भ खूप महत्वाचा होता...


त्यांच्या कारकिर्दीतील दोन खूप महत्वपूर्ण निर्णय म्हणजे, 1998 मध्ये  राज्यपाल सुंदरसिंग भंडारी यांनी शिफारस करूनही त्यांनी उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू केली नाही...  सर्वात महत्वपूर्ण निर्णय म्हणजे, 2000 मध्ये  गोधरा दंगली बद्दलचा ...  परिस्थिती योग्य पद्धतीने न हाताळल्याबद्दल त्यांनी स्वत:च्याच सरकारवर टीका केली...  एवढेच नव्हेतर दंगली रोखण्यासाठी गुजरातला लष्कर पाठविण्याची शिफारसही त्यांनी केली होती...  


देशातील आदीवासी, दलित यांच्यासाठी अनेक महत्वपूर्ण  योजना त्यांनी जाहीर करून सरकारवर नैतिक दबाव निर्माण केला ... या कामातून त्यांनी स्वत:ची ओळख नेहमीच 'घटनेच्या चौकटीत कार्य करणारा सक्रीय राष्ट्रपती' अशी निर्माण केली होती ... राष्ट्रपती त्यांना असणारे अधिकार वापरून सरकारवर दबाव निर्माण करू शकतो, हे के.आर. नारायणन यांनी दाखवून दिलं होतं ...म्हणून ते कायम आठवणीत राहणारे राष्ट्रपती ठरले ... 


त्यांच्या पुण्यतिथी निमित्त पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन ... 


* के .आर . नारायणन यांनी लिहिली  काही ग्रंथ असे ... 

1 ) Reflection on Democracy , Freedom and Development  

2) Images and Insights 

3) Nehru and his Vision 

4 ) India and America -- Essays in Understanding 

5) In the  name of the People   


                                    #यशवंतभंडारे , 

                                    औरंगाबाद , 

                                     दि .9 नोव्हेंबर 2022  

 


                              *****



Comments

Popular posts from this blog

बाबासाहेबांचा मराठवाड्याशी असलेला स्नेहबंध

संवेदनशील मनाचे गझल सम्राट सुरेश भट

प्रबुद्ध भारत हे नाव का स्वीकारले ?