डॉ रावसाहेब कसबे

 प्रसिद्ध विचारवंत प्रा .डॉ . रावसाहेब कसबे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 


प्रज्ञावन्त विरवंत : #डॉरावसाहेबकसबे


प्रज्ञावंत विचारवंत नि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा .डॉ. रावसाहेब कसबे सर यांचा जन्म औरंगपूर ( ता.अकोले जि.अहमदनगर )12 नोव्हेंबर 1944 येथे झाला... त्यांच्या  वडिलांचे नाव  राणोजी तर  आईचं दगडाबाई ... वडील गावातील एक प्रतिष्ठित अलेले राणोजी हे गवंडी काम करतं ...  त्यांना गावातील  अस्पृश्य नि स्पृश्य वस्तीतील स्त्री-पुरुष त्यांना मान देतं असतं ... 


ते गावातील वादात  निवाडे करत असतं ... गावातील  तंटे सोडवतही त्यांच्या शब्दास मान होता ...  परिणामी गावातील सर्व जाती -- धर्मांचे  लोक त्यांचा आदर करतं ... हे  सगळं असलं तरी अस्पृश्यतेचा मनःस्ताप  राणोजी यांना सहन करावा लागला ... तंटे , वादविवादात जो समाज त्यांच्या शब्दाचा सन्मान करायचा तोच समाज  त्यांना दुरूनच पाणी देत असे ... वेगळ्या ताटात ,वेगळे जेवण वाढत असे ...


इतर अस्पृश्य  कुटुंबाप्रमाण राणोजी यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत गरिबीची होती ... रावसाहेब कसबे  यांनी मॅट्रिक (एसएससी) होताच  कुटूंबास आर्थिक आधार व्हावा म्हणून  नोकरीसाठी धडपड सुरू केली ...  काही दिवस त्यांनी संगमनेर  येथील सिद्धार्थ विद्यालयात   शिक्षकाची नोकरीही  केली ... संगमनेर महाविद्यालयातून ते पदवीधर झाले  आणि औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एमए साठी प्रवेश घेतला ... याच कालावधीत त्यांचे भाचे पद्मश्री दया पवार यांच्या शिफारसीमुळं  मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालयात त्यांना नोकरी मिळाली ... 


नोकरी करत  ते  एमए चा अभ्यास करू लागले...  याच दरम्यान 1965 मध्ये अहमदनगरला बौद्ध साहित्य संमेलन झालं ...  या संमेलनाचे घनश्याम तळवटकर हे  अध्यक्ष होते तर  कुसुमाग्रज उद्घाटक होते ... विशेष म्हणजे डॉ.  रावसाहेब कसबे हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते ... या संमेलनात डॉ .कसबे  यांचं भाषण  अतिशय प्रभावी झालं ... त्यांच्या या  भाषणाचं खूप  कौतुक झालं ... विशेष म्हणजे  त्यावेळ ते केवळ  पंचवीस वर्षांचे होते ...


डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाड  विद्यापीठातून ते 1972 मध्ये  गुणानुक्रमे प्रथम आले नि एमए होताच संगमनेर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले ... पुढे 1987 मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठातून पीएचडी केलं ... निवृत्त होईपर्यंत संगमनेर  इथेच प्रपाठक, प्राध्यापक अशी पदे त्यांनी सांभाळली...  निवृत्तीनंतर पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ.आंबेडकर अध्यासन केंद्राचे प्रमुख प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते ...


डॉ . बाबासाहेब आंबेडकर आणि कार्ल मार्क्स यांच्या विचारांचा प्रभाव असलेल्या डॉ.  रावसाहेब कसबे यांना विद्यार्थीदशेपासूनच  वाचन, लेखन, व्याख्यान यांत रुची होती ... सखोल आणि  चतुरस्र वाचन, चिंतन; चिकित्सक प्रवृत्ती; इंग्रजी, मराठी, संस्कृत, पाली या भाषांचं  उत्तम जाण असल्यामुळं  त्यांनी अनेक समृद्ध ग्रंथांचं लेखन केलं ...  


सार्‍या महाराष्ट्राबरोबरच देशात एक प्रज्ञावंत विचारवंत म्हणून त्यांचा लौकिक आहे ... त्यांचा पहिला ग्रंथ #झोत 1978 मध्ये प्रकाशीत झाला नि ते या ग्रंथामुळं त्यांना चंगलाच लौकिक मिळवून दिला ... तर काही लोकांसाठी हा ग्रंथ टीकेचा विषय ठरला  तितकाच विरोध ही केला तर   काहींनी या ग्रंथाचं भरभरून स्वागत केलं ... तथापि ,  हा ग्रंथ आजही  मौलिक समजला जातो ... झोत  नंतर त्यांचा "डॉ.आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना ( 1978 ), आंबेडकर आणि मार्क्स (1985 ) , आंबेडकरवाद - तत्त्व आणि व्यवहार (1989) ,  हिंदू मुस्लिम प्रश्‍न आणि सावरकरांचा हिंदू राष्ट्रवाद (1973 ) , मानव आणि धर्मचिंतन (1996 ),भक्ती आणि धम्म , देशीवाद : समाज आणि साहित्य ,  धर्म ग्रंथ आणि मानवी जीवन प्रवाह , गांधी -- पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा ... हे त्यांचे ग्रंथ मोठं विचार धन होय ... याशिवाय त्यांनी आणि डॉ यशवंत मनोहर यांनी मिळून " रेषेपलीकडील -- लक्ष्मण  "  हे लक्ष्मण माने यांच्यावरील आणि " सम्यक परिवर्तन " हे दोन ग्रंथ संपादित केले आहेत ... 


मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेऊन त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे ...  डॉ.रावसाहेब कसबे यांच्यावर  डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा खूप मोठा वैचारिक प्रभाव आहे ...  ती त्यांची निष्ठाही आहे...   विशेष म्हणजे  ते  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आंधळे भक्त नाहीत, तर डोळस चिंतक आहेत ,असं म्हणता येईल ...  रावसाहेब कसबे यांच्या  विचारांचे परिशीलन करताना डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांच्या  विधानाची प्रचिती येते... डॉ रावसाहेब कसबे हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे  व्यक्तिपूजक नाही तर त्यांच्या   विचारांचे साक्षपी विश्श्लेषक आहेत ...  त्यांच्या जवळपास सर्वच ग्रंथांतून  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या  विचारांची नव्यानं  चिंतानात्मक परिशीलन करून साक्षेपी विश्लेषण केलं आहे ... 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा राष्ट्रवाद, त्यांची समतावादी मूल्ये, त्यांच्या संकल्पनेतील लोकशाही, भारतीय समाजव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीचे भवितव्य, लोकशाही समाजवाद, राज्य समाजवादी अर्थव्यवस्था, धर्मांतर, त्यांच्या आंदोलनांचे संदर्भ, सामाजिक आणि राजकीय चळवळींची बांधणी तसेच  या सर्वांतून त्यांनी फुंकलेलं  मानवमुक्तीचं रणशिंग अशा अनेकानेक संदर्भांची दखल घेत बदलत्या काळानुरूप आंबेडकरी  विचारांच्या तत्त्वांची नि व्यवहारीक मांडणी करत या विचारांना कृतिशील होण्यासाठी प्रोत्साहन देतं ... 


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनीही धर्म आणि  धम्म या दोन्ही संकल्पना भिन्न असल्याचं स्पष्ट केलं होतं ... पण रावसाहेब कसबे धर्म आणि धम्म यांचे अर्थ नव्यनं स्पष्ट करतातच त्याशिवाय त्यांचे अर्थ  समजावून सांगतानाच  समाज परिवर्तनाच्या अंगण धम्माचं महत्व वेगळं कसं आहे , हेही ते प्रतिपादन करतात...  राजकीय क्रांतीसाठी, सामाजिक आणि  धार्मिक क्रांती किती महत्त्वाची असते, हे आंबेडकरी विचारांच्या अनुषंगानं डॉ. रावसाहेब कसबे यांनी अत्यंत प्रभावीपणानं आणि  संयमशीलपणे मांडलं आहे ... डॉ .रावसाहेब  कसबे हे गेली साडेतीन तपं दलित चळवळीचेच नव्हे तर, एकूणच परिवर्तनवादी चळवळीचे दिशादर्शक राहिले आहेत...


भारतीय संविधानाची समीक्षा आजपर्यंत अनेकांनी केली आहे ...  आपापल्या ताकदीप्रमाणे नि  मानसिकतेनुसार हे विश्लेषण केलं गेलं आहे  ...  डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार म्हणून तर अनेकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील  श्रद्धेपोटी अनेकांनी संविधानाचं आंधळेपणानं काही बाबतीत समर्थनही केलं आहे ... डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छे असूनही संविधानातील काही बाबी त्यांना  ठेवाव्या लागल्या , याचं भान या विश्लेषकांनी ठेवलं नाही ,असं वाटतं ... तथापि , संविधानाची निर्मिती होत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सातत्यानं होणार्‍या कोंडीकडं  मात्र अनेकांनी लक्ष दिलं नाही... या जाणिवेतूनच डॉ.रावसाहेब कसबे यांनी घटनेची डोळस चिकित्सा केली आणि 'बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी लोकशाही आणि सध्याच्या संविधानाने  उभा केलेला लोकशाहीचा राजकीय सांगाडा हे एक नव्हेत' असे ठामपणे सांगितलं आहे  ... " बाबासाहेबांना अभिप्रेत असणार्‍या लोकशाही राज्यघटनेत समाजवादी अर्थव्यवस्थेचा समावेश तर असावाच परंतु देशाची अर्थव्यवस्था कोणत्याही एका वर्गाच्या हातात जाणार नाही, त्याच्या तरतुदीही तीत असाव्यात " ,  असं आग्रही प्रतिपादन डॉ. रावसाहेब कसबे करतात ...


हिंदू --  मुस्लिम मूलतत्त्ववादी हे समाजात दुहीचे बीज कसे पेरत आहेत, त्याची परखड चिकित्सा डॉ  रावसाहेब कसबे यांनी केली आहे ... याबाबतीत त्यांच्यावर परिणामी कठोर टीकाही झाली आहे ...  त्या टीकेस त्यांनी शांतपणे उत्तरं  दिली आहेत ... लोकशाही  आणि  समाजवादी मूल्यांवर निष्ठा असणार्‍या सर्व विचारवंतांनी हिंदू राष्ट्रवादाचं आक्रमक रूप पाहून त्यास आव्हान देण्यासाठी सुसंघटित झालं पाहिजे, अशी डॉ.  रावसाहेब कसबे यांची विचारसरणी आहे...


डॉ. रावसाहेब कसबे  यांचं व्यक्तिमत्त्व धीरगंभीर आणि अत्यंत संयमशील आहे...  आक्रस्ताळेपणाचा नि  नाहक बडेजावाचा त्यात मागमूसही नसतो ... अनेक आंबेडकरी विचारवंत मार्क्स नाकारतात ... तथापि , डॉ  रावसाहेब कसबे यांनी मात्र  मार्क्सवाद आणि  आंबेडकरवाद  या दोन्ही  विचारांतील साम्यस्थळं शोधून ते एकमेकांना कसे पूरक आहेत ,अशी मांडणी केली ...  प्रगतीच्या दिशेनं जाणार्‍या समाजवादी भारताला कार्ल मार्क्स नाकारून चालणार नाही... तसा तो प्रत्यक्ष बाबासाहेबांनीही  नाकारला नव्हता ... अशा स्थितीत मानवमुक्तीचा पर्याय ठरलेल्या या विचारात समन्वयाची किमया डॉ रावसाहेब कसबे यांनी साधली आहे ... त्यांना  “ तुम्हांला मार्क्सवादी म्हणायचे की आंबेडकरवादी की समाजवादी? ” असा प्रश्न त्यांना विचारला जातो ,या प्रश्नाला ते  शांतपणे उत्तर देताना म्हणत  , “ कोणीही माणूस पूर्णपणे मार्क्सवादी, आंबेडकरवादी किंवा समाजवादी असण्याची सूतराम शक्यता नाही ... तुम्ही फक्त मला डॉ रावसाहेब कसबे , या नावानं संबोधा ” ...


डॉ. रावसाहेब कसबे  यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे .. त्यात आदर्श शिक्षक पुरस्कार (1991 ), नाशिकच्या युगांतर प्रतिष्ठान  जीवन गौरव पुरस्कार (1999 ), पुणे येथील सत्यशोधक दिनकरराव जवळकर पुरस्कार (2000 ), पुणे येथील ना.मे. लोखंडे पुरस्कार (2000 ), नवी दिल्ली येथील दलित साहित्य अकादमीचा  पुरस्कार ,  सुगावा पुरस्कार (2014 ), कै. धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता  पुरस्कार ( 2016 ) , गदिमा प्रतिष्टानचा स्नेहबंध पुरस्कार ( 2011 ) , औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयातर्फे दिला जाणारा मिलिंद समता पुरस्कार ( 2014 ) ,आदी पुरस्कारही आहेत ...  नाशिक येथील पाचव्या अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ( 22014 ) ,पाचव्या सम्यक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ( 2015 ) पद त्यांनी भूषविलं आहे ... त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 

                             #यशवंतभंडारे ,                      

                             औरंगाबाद , 

                             दि .12 नोव्हेंबर 2022 .

#वाढदिवसानिमित्त...

 

                          *****

Comments

Popular posts from this blog

बाबासाहेबांचा मराठवाड्याशी असलेला स्नेहबंध

संवेदनशील मनाचे गझल सम्राट सुरेश भट

प्रबुद्ध भारत हे नाव का स्वीकारले ?