महान पराक्रमी मल्हारराव होळकर ...!!!

आज मल्हारराव होळकर यांची जयंती. हा योद्धा त्याच्या कर्तुत्वाने मराठा साम्राज्यातील एक महत्वाचा सरदार बनला. पेशवाई ज्यांनी आपल्या भक्कम हातांवर तोलून धरली त्या होळकर आणि शिंदे घराण्यापैकी होळकर घराण्याची स्थापना करणारे हे मूळ पुरुष होतं . मल्हारराव होळकर हे अटकेपार झेंडा रोवाण्यापासून ते पानिपतच्या निर्णायक लढाई पर्यंत मराठा साम्राज्यासाठी लढत राहिले. एक महत्वाची व्यक्ती म्हणून इतिहास त्यांना कधीही विसरणार नाही.
आज मल्हारराव होळकर यांची जयंती .१६ मार्च १६९३ रोजी मल्हाररावांचा जन्म झाला. त्याचं गाव पुणे जवळचं ‘होळ’. या गावावरून त्यांना होळकर हे नाव मिळालं. धनगर कुटुंबात जन्मलेले मल्हारराव हे कोणत्याही घराणेशाहीचा आधार न घेता आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठेशाहीचे आधारस्तंभ बनले. तो काळच पराक्रमाचा होता. त्याकाळी तुमच्यातलं शौर्य तुमची ओळख बनवत असे . त्यामुळं महापराक्रमी योद्धा म्हणूनच त्यांची ओळख करून दिली पाहिजे , पण काही इतिहासकारांनी त्यांच्याशी संबंधित नसलेल्या गोष्टी त्यांच्याशी जोडून त्यांच्या पराक्रमास गालबोट लावण्याचा प्रयत्न केला . तथापि , आता काही काही इतिसकारांनी मल्हारराव होळकर यांना न्याय दिला .दाभाड्यांचा सरदार कंठाजी कदमबांडे याच्या पेंढारी टोळीत मल्हाररावांनी शिपाई म्हणून काम केलं. याच काळात बाजीराव पेशवे आणि मल्हारराव यांची मैत्री झाली. यानंतर मल्हाररावांनी कधीच मागे वळून बघितलं नाही. त्यांनी शिपाई ते थेट सरदार असा प्रवास केला. त्यांच्या पराक्रमाच्या जोरावर त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी मिळाली.
निजामाबरोबर १७२८ मध्ये झालेली महत्वाची लढाई असो किंवा १७३७ मध्ये झालेली दिल्लीची लढाई असो, तसेच १७३८ मध्ये झालेली भोपाळची लढाई असो मल्हाररावांची समशेर कायम तळपत राहिली. त्यांचा दबदबा सातत्यानं वाढतच गेला आणि त्यानंतर त्यांना ‘किंग मेकर’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. याच काळात इंदूरची जहागिरी होळकर घराण्याकडे आली.
‘अटके पार झेंडा’
मराठा साम्राज्यातील एक सोनेरी पान म्हणजे ‘अटके पार झेंडा’. पाकिस्तानातील अटक पर्यंत भगवा झेंडा घेऊन जाण्यात राघोबादादांबरोबर मल्हारराव होळकर यांचा मोलाचा वाटा होता . राघोबादादा यांच्या खांद्याला खांदा लावून मल्हारराव कायम आघाडीवर होते. अटक काबीज करण्या आधी १७५८ मध्ये सरहिंद आणि लाहौर देखील काबीज करण्यात आलं होतं. या नंतर एक म्हण मराठीत कायमची रुजली, " अटके पार झेंडा रोवणे. "
पानिपतची १६ जानेवारी १७६१ रोजी झालेली लढाई . त्या दिवशी खऱ्या अर्थाने मराठ्यांच्या सौन्यावर संक्रांत कोसळली. या महत्वाच्या लढाईत मल्हारराव पळून गेल्याचा आरोप त्यांच्यावर अनेकांनी केला आहे. पण काही इतिहासकारांच्या मते जेव्हा पानिपत मध्ये पराभव स्पष्ट दिसत होता तेव्हा सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी त्यांच्या पार्वती बाईंना यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याची विनंती मल्हाररावांकडे केली. त्यानुसार ते पार्वती बाईंना घेऊन निघून गेले. पण यानंतर सदाशिवराव भाऊ यांना मृत्यूने गाठले. मल्हारराव होळकर तेथे असते तर सदाशिवराव भाऊ यांचेही प्राण मल्हारराव होळकर यांनी नक्कीच वाचवला असता .गोपाळराव देशमुख यांनी मल्हारराव होळकर यांच्या चरित्राची नेमकी आणि न्याय स्वरूपात मांडणी करून त्यांना न्याय दिला आहे .
अठराव्या शतकात जवळपास पन्नास वर्षे विलक्षण पराक्रमाने, अनोख्या मुत्सद्दीगिरीने संपूर्ण देशाच्या इतिहासात तळपणारे मल्हारराव होळकर यांच्यावर झालेले संशोधनपर लेखन अपुरे आहे. पानिपतच्या युद्धातून मल्हाररावांनी पळ काढला, हा काही इतिहास संशोधकांनी केलेली त्यावेळच्या इतिहासाची मांडणी चुकीचीच होती . आपणच आपल्या पराक्रमी पुरुषांनी मिळवलेल्या यशाला काळिमा फासणारे हे लेखन म्हणता येईल . पण काही इतिहासकार इतिहास पुरुषांनाहींजात आणि धर्माच्या फुलपट्टीनं मोजतात .त्यातून हा प्रमाद घडला असावा . खरेतर मल्हारराव होळकर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा राजस्थान आणि पंजाबसारख्या वीरांच्या भूमीतही उमटविला होता. संपूर्ण देशाला एकत्र बांधून ठेवण्याची किमयाही मल्हारराव होळकरांनी साधली होती. पंढरपूरचे ज्येष्ठ इतिहास संशोधक गोपाळराव देशमुख यांनी या संदर्भात केलेल्या संशोधनातून मल्हारराव होळकरांच्या या अद्भुत पराक्रमावर प्रकाश पडला आहे.
गोपाळराव देशमुख यांनी वयाच्या ८२ व्या वर्षी मल्हारराव होळकरांच्या कार्यकर्तृत्वावर अभ्यासपूर्ण आणि परिश्रमपूर्वक संशोधन करीत ‘सुभेदार मल्हारराव होळकर-एक राष्ट्रपुरूष’ हा ग्रंथ लिहिला आहे. कौसल्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या या संशोधन ग्रंथाचे प्रकाशन अलीकडेच तत्कालीन जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते सोलापुरात झाले आहे.
अठराव्या शतकात उत्तरेतील मोगलांची सत्ता खिळखिळी झाल्याचे पाहून पेशव्यांनी मराठय़ांच्या पराक्रमाला उत्तरेकडे भरपूर वाव असल्याचे ओळखले आणि मल्हारराव होळकरांसह राणोजी शिंदे यासारख्या पराक्रमी सहकाऱ्यांना पाठविले. त्यातूनच मराठय़ांनी माळवा प्रांत व्यापून टाकत दिल्लीच्या मोगल बादशाहाचे सुभेदार दयाबहाद्दूर आणि बंगश तसेच जयपूर नरेश सवाई जयसिंग यांना नामोहरम केले. पेशव्यांनी मल्हाररावांच्या पराक्रमावर प्रभावित होऊन त्यांना इंदूरची जहागिरी दिली. मल्हाररावांचा पराक्रम पाहून राजस्थानातील राजेरजवाडे त्यांचे आपापसातील हेवेदावे, राजकीय वारसदारांचे तंटे आणि वैमनस्य सोडविण्यासाठी मल्हारराव होळकरांची मदत घेऊ लागले. मल्हाररावांनीही जयपूर, बुंदी यांसारख्या मोठय़ा राजघराण्यातील वादात न्यायदानाचे काम केले.
बुंदीच्या राजघराण्यात ज्याचा हक्क होता, त्या उम्मेदसिंहास पुन्हा बुंदीची गादी मिळवून दिली. त्यासाठी मल्हाररावांना बुंदीवर हल्ला करावा लागला. उम्मेदसिंहास गादी मिळाल्यानंतर तेथील राणीने मल्हाररावांना राखी बांधून भावासमान मान दिला. जयपूरच्या गादीचा तंटा निर्माण झाला तेव्हा तेथील खरा वारसदार माधोसिंग असूनही त्यास परागंदा होऊन आजोळी उदयपूरच्या मामाकडे आश्रय घ्यावा लागला होता. मल्हाररावांनी पेशव्यांकडे लेखी हमी देऊन ईश्वरसिंगाऐवजची माधोसिंगाची बाजू घेण्यास प्रवृत्त केले आणि त्यानुसार माधोसिंगाला जयपूरची गादी मिळवून दिली. म्हणून राजस्थानच्या इतिहासकारांनी मल्हारावांना ‘राज्य संस्थापक’ म्हटले आहे. मराठय़ांच्या इतिहासातील हा दुर्मीळ प्रसंग होय. वसईच्या मोहिमेत चिमाजी आप्पासोबत मल्हारराव होळकर होते. मल्हाररावानी ‘मातब्बर’ सुरूंग लावल्यामुळेच वसई किल्ल्याचा ‘सॅबॅशियन’ बुरूज ढासळला आणि मराठा सैन्याला किल्ल्यात शिरकाव करता आला. पोर्तिगिजांच्या ताब्यातून वसई मराठय़ांकडे आल्यामुळे इंग्रजही धास्तावले होते.
पानिपतिच्या १७६१ मध्ये झालेल्या युद्धातून मल्हारराव होळकरांनी पळ काढल्याचा आक्षेप काही इतिहास संशोधक घेतात. हा आक्षेप देशमुख यांनी साधार खोडून काढला आहे, उलट, पानिपत युद्धानंतर नानासाहेब पेशव्यांनी संपूर्ण हिंदुस्थानाचा ‘एख्तियार’ मल्हाररावांकडे दिला होता. त्यांनी अहमदशाह अब्दालीस मदत करणारे सुजाऊद्दौला, जयपूर नरेश माधोसिंग आणि नजीबखान रोहिल्यासह उत्तरेकडील सर्वानाच निष्प्रभ करूरन सोडले. त्यामुळेच अब्दाली हिंदुस्थानच्या वाटेवर मल्हाररावांच्या हयातीत पुन्हा पाऊल टाकण्यास तयार झाला नाही. अब्दाली पंजाबपासूनच माघारी फिरला. ‘मराठे मेले नाहीत’ अशी सर्व हिंदुस्थानची खात्री पटली ती मल्हाररावांच्या पराक्रमामुळेच , हे इतिहासकारांनी लक्षात घेतले असते तर महापराक्रमी मल्हारराव होळकर यांच्यावरील आक्षेप टाळता आले असते . हिरा हा हिराच असतो तो संधी मिळाली की चांकतोच ... मल्हारराव होळकर हे कोहिनुर हिरा होते त्यामुळे आपल्या कर्तृत्वामुळे त्यांच्या काळात देशभर चमकले पण काही इतिहास लेखकांना या हिऱ्याचे मोल कळलं नाही ... आजच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन ...!!!
यशवंत भंडारे,
लातूर ,
दि .16 मार्च 2020
Comments
Post a Comment