हिरा बनसोडे : प्रगल्भ जाणिवेची कवयित्री


हिरा बनसोडे या मराठी कवयित्री आहेत. त्यांचे ‘पौर्णिमा’, ‘फिर्याद’, ‘फिनिक्स’ हे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. बौद्ध स्त्री साहित्यिकांमध्ये त्यांचा विशेष उल्लेख होतो. 'अस्मितादर्श' या नियतकालिकात कविता लिहिणार्‍यांमध्ये हिरा बनसोडे सुप्रसिद्ध आहेत.
‘पौर्णिमा’मधील कविता म्हणजे तारुण्यसुलभ हळव्या भावभावनांचा कल्लोळ. कधी प्रेमाची नजाकत, विरहाची अवीट हुरहूर, तर कधी जीव गुदमरून टाकणा-या प्राणांतिक वेदना. भावविभोर अशा या उत्कट भावना मृगजळाचा भाववेल्हाळपणा घेऊन त्यात वाचायला मिळतात; पण केवळ सौंदर्यनिर्मिती आणि रंजकत्व निर्माण करणे हे साहित्याचे उद्दिष्ट नसते; तर समाजाच्या वास्तवाचे भान ठेवून मानवी मनाचे, वृत्ती-प्रवृत्तीचे, न्याय-अन्यायाचे विविधांगी दर्शन घडवणे ही साहित्यनिर्मितीची भूमिका असते. रूढ चौकटीत राहून हे करता येत नाही. तेव्हा त्याची मोडतोड होते, दृढ ठोकताळे बाजूला सरकवावे लागतात. तेव्हाच कुठे ख-या अर्थाने स्वतंत्र शैली निर्माण होते. पुढे समज-उमज वाढल्यावर प्रगल्भ जाणिवांची परिपक्व कविता हिराताईंनी लिहिली आणि त्यांची स्वतंत्र शैली त्यांना निर्माण करता आली.
कुणीच नसलेली मी कोण?
लोक हो! तुमच्या न्यायालयात
मी फिर्याद आणली आहे
तुम्ही तरी मला न्याय द्याल का?
स्वत:च्याच घरात निर्वासित असलेली मी
उपेक्षेची जन्मठेप भोगतेय जन्मोजन्मी
माझा पिता, भाऊ, पती
या गोंडस, भारदस्त नात्यांच्या भाराखाली
माझं अस्तित्व दबलं जातंय
दाबलं जातंय पावलापावलांवर
माझं स्वातंत्र्य, हक्क, मत
सारं सारं कसं परतंत्र झालंय
माझ्याच घरात, समाजात नि देशात
कुणीच नसलेली मी कोण? ,
आणि
येशोधरे ,तू एक
जन्मव्याकुल दुःख स्वप्न
तुझ्याकडे पाहायचं
निर्लज्य धाडस होत नाही .
तुझं केवळ रुपडं दडलं आहे
सिद्धर्थाच्या दोन्ही बंद डोळ्यात ....!!!
*** हिरा बनसोड
मराठी भाषा पंधरवडा निमित्त

Comments

Popular posts from this blog

बाबासाहेबांचा मराठवाड्याशी असलेला स्नेहबंध

संवेदनशील मनाचे गझल सम्राट सुरेश भट

प्रबुद्ध भारत हे नाव का स्वीकारले ?