ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन : भावपूर्ण श्रद्धांजली




स्त्री हक्क चळवळीतील लेखिका, महिलांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. आज दुपारी त्यांचे पार्थिव प्रभात रोडवरील नचिकेत या त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर आजच संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत . महिल्यांच्या चळवळीला विशेष योगदान देणाऱ्या विद्या बाळ या लेखिका आणि संपादक म्हणूनही प्रसिद्ध होत्या. सुरुवातीच्या काळात त्यांनी पुणे आकाशवाणीवर दोन वर्षे कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून नोकरी केली. पुढे १९६४ ते १९८३ या दरम्यान त्यांनी स्त्री या मासिकाच्या साहाय्यक संपादक म्हणूनही काम पाहिले.
विद्या बाळ यांनी १९८९ मध्ये मिळून साऱ्याजणी हे मासिक सुरू केले. हे मासिक अल्पावधीत लोकप्रिय ठरले. या मासिकाद्वारे स्त्रियांचे विश्व उलगडत त्यांनी महिल्याच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडत समाज प्रबोधन केले.
स्त्रियांच्या समस्या सोडवता याव्यात यासाठी विद्या बाळ यांनी ’नारी समता मंच’ ही संघटना स्थापन केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी गावोगावी जाऊन वाहत्या रस्त्यांवर ‘मी एक मंजुश्री’ नावाचं प्रदर्शन भरवले होतं. या प्रदर्शनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात स्रियांच्या समस्यांवर चर्चा झाली. या बरोबरच स्त्रियांना बोलण्यासाठी हक्काची जागा हवी या उद्देशाने विद्या बाळ यांनी ‘बोलते व्हा’ नावाचे केंद्र सुरू केले. या कार्याला पुरुषांची साथ मिळावी यासाठई त्यांनी २००८ साली ‘पुरुष संवाद केंद्र’ही सुरू केले.

Comments

Popular posts from this blog

बाबासाहेबांचा मराठवाड्याशी असलेला स्नेहबंध

संवेदनशील मनाचे गझल सम्राट सुरेश भट

प्रबुद्ध भारत हे नाव का स्वीकारले ?