अनुराधा पाटील यांची मानवतेच्या कळकळीची कविता - यशवंत भंडारे


औरंगाबादच्या अनुराधा पाटील यांच्या कदाचित अजूनही या काव्यसंग्राहाची साहित्य अकादमीनं पुरस्कारासाठी निवड केली आहे. अनुराधा पाटील यांच्या कविता चिंतनात्मक आहेत. स्त्रियांच्या भावना अन् जाणीवा त्या हळुवारपणे मांडतात. त्यांच्या कविता स्वत:ची वाट शोधताना दिसतात. त्यांची कविता स्त्रियांच्या जीवनातील दु:खाला, एकाकीपणाला, सोशिकतेला पर्याय शोधताना दिसते.अनुराधा पाटील यांचे 1981 ते 2005 या 24 वर्षांत चार कविता संग्रह प्रसिध्द झाले. त्या कविता संग्रहात 224 कवितांचा समावेश आहे.तर कदाचित अजूनही काव्यसंग्रहात 51 कविता आहेत. कवितांच्या क्षेत्रात त्यांनी स्वत:ची स्वतंत्र वाट शोधलीच त्याचबरोबर समकालीन मराठी कवितेच्या क्षेत्रात स्वतंत्र प्रभाव  निर्णय केला. त्यांची प्रतिभा संपन्नता त्यांच्या कवितेतून व्यक्त झाली आहे. त्याच प्रतिभेचा साहित्य अकादमीनं  2019 चा पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
या वर्षीच्या साहित्य अकादमी पुरस्कारासाठी 1 जानेवारी 2013 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत प्रकाशित करण्यात आलेल्या साहित्यकृतींचा विचार करण्यात आला. ताम्र पत्र, शाल आणि एक लाख रुपयांचा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरुप असतं. 25 जानेवारी 2020 रोजी हा पुरस्कार प्रदान  समारंभ नवी दिल्ली येथे होणार आहे. डॉ. आसाराम लोमटे, लक्ष्मण माने, आणि वासुदेव सावंत यांनी मराठी भाषा विभागासाठी परीक्षक  म्हणून काम पाहिलं आहे.
गेल्या वर्षीचा साहित्य अकादमी पुरस्कार म.सु.पाटील यांना  सर्जन प्रेरणा आणि कवित्वशोध या समीक्षा ग्रंथासाठी देण्यात आला होता. त्याआधी  एकूण 64 मराठी साहित्यिकांना राष्ट्रीय साहित्य अकादमी पुरसकारानं गौरवण्यात आलं आहे. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवणाऱ्या अनुराधा पाटील या 65 व्या मराठी साहित्यिक ठरल्या आहेत. त्यांची कविता मूल्यभानाची कविता आहे. असं म्हणाता येईल, की मानवी जीवनातून हरवत चाललेल्या प्रेम, विश्वास आणि करुणा या मूल्यांची प्रतिष्ठापणा करण्याचा ध्यास लागलेली त्यांची कविता आहे. उद्याची मूल्यभान व्यवस्था कदाचित  स्त्रीच निर्माण करु शकेल, असा विश्वास त्या कवितांतून देताहेत.
नकाशावर न सापडणाऱ्या
गावांच्या वाटा तुडवत
चालीन म्हणत होते
तिथं हरवलेली असते
कुणाची शाळा
कुणाची भाषा
तर कुठं मुलंच हरवलेली
ज्यांची  पाटी
फुटलेलीच असते अटळ
ही हरणारी लढाई
लढताना ….
सध्यातरी कवितेमध्ये –दहशतवादाविषयी लिहिताना त्या म्हणतात-
आजकाल ओळखीच्या डोळयांमध्येही दिसते
मला अनोळखी अन्
एक दबलेली हिंस्त्र चेतावणी ….
समस्त मानवी संवेदनेला हाकारताना-त्या लिहतात-
मला माहिती आहे
काहीच उगवून येणार नाही आतल्या
या कणखर ओलाव्यातून पण मला निदान
पसरु द्या हात या अनंत आभळाकडे
पाझरु द्या मनात सुईच्या अग्रावर मावेल
एवढी तरी करुणा….
  जागतिकीरणाच्या सध्याच्या जगात मानवी जीवन यंत्रवत झालं आहे. त्याला व्यापारीकरणांनं वेढलं आहे. अशा परिस्थितीत माणूस माणूस राहिला नाही तर तो एक तर विक्रेता किंवा खरेदीदार झाला आहे. कामगार झाला आहे. त्याच बरोबर यंत्रांमध्ये काम करताना तो यंत्रही झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर त्याचं माणूस असणं मात्र या नव्या जगानं नाकारलं आहे. याबाबत अनुराधा पाटील लिहितात.
माणूस नावाचा शब्द
निषिध्द ठरवला गेलाय
नव्या शब्द कोशात….!!!
स्त्रिंया आणि घरांचा अनुबंध फार जुना आहे.अनुराधा पाटील यांच्या कवितातूनही  हा अनुबंध प्रकर्षानं प्रगटताना दिसतो. पण याबाबत लिहितांना शब्दांचा उगीचच आडपडदा त्या घेत नाहीत. त्या थेट विषयालाच हात घालतात. आपण उभे असतो या कवितेत त्या म्हणतात -
आपण उभे असतो तेवढीही जागा उरत नाही/
मधी कधी पायांखाली घर म्हणून …
अनुराधा पाटील स्त्री जीवनाचं वास्तव चित्रण थेट मांडतात. स्त्रियांचा होणारा कोंडमारा आणि पुरुषी संस्कृतीचा वरचढपणा याबाबत त्यांची कविता आक्रासताळेपणा न करताही अशा परिस्थिवर  नेमकेंपणानं भाष्य करतें. स्त्रियांच्या अलिप्त, समांतर, निष्प्रेम, उपेक्षित किंवा दुर्लक्षित जगण्याला आणि स्त्रियांच्या हेाणाऱ्या घालमेलीस त्या सहजपणे व्यक्त करतात. त्यांच्या भुकेला लाज नसते या कवितेत स्त्रियांच्या अशा घालमेलीच चित्रण असं व्यक्त झालय-
भयमुक्त जगण्याची स्वप्नं
पडतात बाई माझ्या  दारं खिडक्यांना
पण इथल्या साळसूद
कडी कोयंडयांची बेमालूम बतावणी
व्यापून टाकते दाही दिशांचा अख्खा पडदा….
त्यांच्या दिगंत  दिवसें दिवस  तरीही  वाळूच्या पात्रात  मांडलेला खेळ आणि कदाचित अजूनही या पाचही कविता  संग्रहांतून त्या माणसातील चांगूलपणाची अपेक्षा धरत परिवर्तनाची, बदलाची आशा धरतात. अंजली कुलकर्णी यांनी अनुराधा पाटील यांच्या कवितांचं अतिशय मार्मिक विवेचन केलय- त्या म्हणतात, त्यांच्या कविता वाचताना एका क्षणी असं जाणवंते,की ज्या एका मानवतेच्या कळवळयाची समाजाला आज नितांत गरज आहे. त्या माणसाच्या ठायी असलेल्या कळवळयाला त्या साद घालत आहेत.अत्यंत संयत, विवेकशील सुरात त्या माणसातल्या चांगुलपणाची परिभाषाच हरवून बसलेल्या  समाजाला त्या ती  परिभाषाही बहाल करत आहोत. त्या सगळया कविता मिळून एक प्रार्थना आहे. ज्या सगळया मानवजातीसाठी त्या म्हणतात. स्वत: जवळ असलेल्या सगळया करुणेचा स्त्रोत त्यांनी या संग्रहातील  कविते-कवितेतून वाहू दिलाय आणि असे वाटते,  की त्या आस बाळगून पुढे बघतात, की हा स्त्रोत माणसांच्या काळजांपर्यंत पोहचला तर कदाचित अजूनही जग बदलेल. जग करुणामय ,   प्रेममय होईल .  
दु:ख हे कधी सारखं नसतं ते व्यक्ती निहाय बदलत जातं. जाती-धर्म, वर्ग, प्रदेशानुसार स्त्रियांच्याही दु:खाचे स्वरुप बदलत जातं. या पलीकडंही दु:ख हे सतत प्रवाही असतं. हेच दु:ख प्रदेश,वर्ग,जाती-धर्माच्या भिंती ओलांडून एकच होतं. अशी जाणीव करुन देणाऱ्या कवितातून त्या जगभरातील स्त्रियांच्या दु:खाला समानतेची जाणीव करुन देत वास्तवाला भिडण्याचं बळ देतात.
 जळगाव जिल्हयातील जामनेर तालुक्यातील पहुर हे अनुराधा पाटील यांचं माहेर.येथेच त्यांचं दहावी पर्यंतच शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर त्याचं मराठीचे प्राध्यापक असलेल्या  कौतिकराव ठाले-पाटील यांच्याशी विवाह झाला. त्यामुळं कविता करण्याची प्रेरणा आणि प्रोत्साहन त्यांना पतीपासूनच मिळाली. तशा त्या विवाहापूर्वीही कविता करत होत्या. शालेय जीवनातच त्या कविता करत होत्या.कविता, निबंध आणि वर्क्तृत्व  स्पर्धेत भाग घेत होत्या.त्यांची कविता स्वत:ची नवी वाट निर्माण करणारी आहेच त्याच बरोबर समकालीन मराठी कवितेच्या क्षेत्रात त्यांना प्रतिभा संपन्न कवयित्री  म्हणून ओळख करुन देणारीही आहे. हे राष्ट्रीय साहित्य अकादमीच्या पुरस्कारानं पुन्हा एकदा सिध्द झालं आहे.
जगभरात कोणत्या ना कोणत्या करणानं माणसाला माणसापासून  दूर ठेवण्याचं षंडयंत्र रचलं जात आलं आहे . कुठं ते वांशिक स्वरुपात, कुठं काळया - गोऱ्याच्या भेदातून ,कुठं वर्णवाद, जातीयवाद , पथभेदावरुन तर कुठं धार्मिक, आर्थिक, - सामाजिक परिस्थितीवरुन. परंतु जगभरात या भेदाच्या भींतींना आव्हाण देतं माणुसकीचा, मानवतेचा, स्नेहाचा, प्रेमाचा, मैत्रीचा जागरही जागवला जात असताना दिसतो आहे.
तुम्ही आमच्यांत कितीही भेदाच्या भींती बांधा पण आम्ही त्या उद्ध्वस्त करुन माणुसकीचे गीत गाऊ म्हणत-माणसाच्या माणुसकीला आवाहनही केलं जातय. अनुराधा पाटील याही यातील दुसऱ्या पंथातील आहेत. भेदाभेदाला नाकारुन माणसाचं गीत गाण्याला, माणसाला जवळ करण्याला अन् मानवतेला प्राधान्य देण्याला त्या महत्व देताना दिसतात.
त्यांच्या पुढील कवितेतून त्यांची ही भावना प्रामुख्यानं पुढं येते-
हजारो  वर्षांपासून
आपण मागत आहोत
 सुईच्या अग्रावर मावेल
एवढी तरी भूमी
पाय टेकण्यापूरती
 पाय हरणारांच्या
बाबतीत तर इतिहासही
निर्दय असतो कायम
म्हणून
मी  कतिता लिहिते
तेंव्हा कृतीच करत असते
माणूसपणाच्या
अधिकाधिक जवळ जाणारी…
अनुराधा पाटील यांच्या कविता 1972 पासून प्रकाशित होत आहेत. परंतु त्यांचा पहिला कविता संग्रह  दिगंत मात्र 1981 मध्ये प्रसिध्द झाला. त्यानंतर 1985 मध्ये  तरीही   1992 मध्ये    दिवसें दिवस   2005 मध्ये  वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ  तर 2017 मध्ये  अकादमी पुरस्कार प्राप्त  कदाचित अजूनही हा कविता संग्रह प्रसिध्द झाला. अनुराधा पाटील यांच्या काव्य लेखनात सातत्य आहे.  दिगंत नंतर केवळ चार वर्षात त्याचा दुसरा काव्यसंग्रह    तरीही  प्रसिध्द झाला तर  तिसरा काव्यसंग्रह   दिवसें दिवस  सात वर्षानी म्हणजे 1992 मध्ये प्रसिध्द झाला. चौथा काव्य संग्रह तेरा वर्षांनी तर पाचवा बारा वर्षांनी प्रसिध्द झाला. त्यांच्या काव्य लेखनातं सातत्य आहे, म्हणून भराभरा काव्यसंग्रह त्यांनी प्रसिध्द केलेले दिसत नाहीत. त्यांच्या  कदाचित अजूनही  या काव्यसंग्रहात एकूण 51 कविता आहेत. या त्यांच्या काव्यसंग्रहात स्त्री मनाच्या भावभावनांचं तरल चित्रण आहे. कवितांतून व्यक्त होतांना सौंदर्य, ग्रामीणजीवण, मानवी संबंध, समाजातील उलथा पालथी, स्त्री म्हणून  स्वत:चं भाव विश्व उलगडून दाखवताना त्याला संबंध स्त्रियांच्या जीवनाचं व्यापकत्व  मिळतं. मानवी मूल्यांबाबत सामाजिक व्यवहारात असलेली दुटप्पीपणाची भूमिका घेणाऱ्या माणसांचं त्या समर्थपणे चित्रण करतात. हे सत्य  माडतांना त्यांची भाषा कुठेही अक्रस्ताळी होताना दिसत नाही. जे  मुलायम, सहजतेनं आणि नेमकेपणानं सांगता येतं त्यासाठी संतापी, अक्रस्ताळेपणा स्वीकारण्याची गरज त्यांना दिसत नाही. म्हणून  स्त्रीच्या जगण्यातील अर्तता त्या अगदी सहजपणे मांडतात.
भुकेला  लाज नसते
अन बाईच्या चामडयाला
जात म्हणत
तू वावरलीस मुकाट
गायीच्या करुण डोळयांनी
हयातभर ….
अनुराधा पाटील यांच्या कवितांतून स्त्रीच्या भावभावनांची स्पदनं  ठळकपणानं व्यक्त होतात परंतु हे व्यक्त होणं आजच्या  परिस्थिचं, आजच्या समाजाचं  वास्तववादी खरखुरं चित्रण असतं. तसं पाहिलं तर भारतीय स्त्री मूळातच सोशिक आणि उदार हृदयाची असते. भारतीय संस्कृतीत स्त्रिंया कायम  हिंसाविरोधी  भूमिका घेताना दिसतात. कारण स्त्रीनं प्रेम, स्नेह आणि बंधुभावच शिकवलेला असतो, ती सहसा हिंसक होत नाही.  म्हणूनच ती सहृदयी, सहिष्णू असते.
याच पार्श्वभूमीवर अनुराधा पाटील म्हणतात-
कदाचित उसळत होतं
रक्त कुणाकुणाचं
कोण्या एके काळी
हातातल्या शस्त्राची धार
आजमावण्यासाठी
पण पात्याच्या धारेवर
सर्रकन बोट फिरवणं
आपलं किंवा दुसऱ्याचं
जमलं नाही कधीच
प्रयत्न करुनही….
अनेकवेळा प्रत्येकालाच एखाद्या विषयावर भूमिका घेण्यास जमेलच असं नाही. प्रत्येक समूहाला,  विचार प्रवाहाला आपलं कुणाशी तरी नातं आहे, हे सांगणं शक्य असतानाही सांगता येत नाही. कारण त्यासाठी  तितकीच सर्वांगीन तयारी असावी लागते. प्रसंगी ते जोडू पाहणारं नातं झेपेलचं असं नाही. म्हणून अनुराधा पाटील यांनी बुध्दाशी नातं जोडू पाहणाऱ्यांना सावध केलेय. कारण सर्वांनाच बौधिसत्वाशी नातं जोडणं झेपेलच असं नाही, असचं काहींसं त्यांना सांगावयाचं आहे. म्हणून त्या लिहितात-
प्रत्येक हिरव्या पानाला
सांगता येत नाही
नेहमीच /एखाद्या बोधिसत्वाशी नातं/
  मराठवाडयातील नरहर कुरुंदकर, सुधीर रसाळ, रा.रं.बोराडे, चंद्रकात पाटील यांच्यासारख्या अनेकांनी साहित्यक्षेत्रात खूप मोठे काम केले आहे. त्यांना पूर्वीच हा पुरस्कार मिळायला हवा होता, मराठवाडया बाहेरही विंदा करंदीकर, नारायण सुर्वे असे कित्येक कवी, लेखक यातून सुटले याची खंत आहे. मला मिळालेला पुरस्कार केवळ माझा नाही, त्या सर्वांचा आहे, अशी प्रतिक्रीया अनुराधा पाटील यांनी दिली तेंव्हांच त्यांच्यातील कवयित्री म्हणून असलेल्या विचारांची खोली लक्षात आली.
प्रत्येक पुरुषाच्या यशामध्ये त्यांच्या अर्धागिनीचा मोठा वाटा असतो, असं आपण नेहमीच म्हणत असतो. तसाच तो आर्धागिनीच्याही यशात असतोच असं नाही पण काही पुरुष आपल्या आर्धागिनीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, तिच्या यशाचे वाटेकरी होतात.
अशीच काहीशी कहाणी अनुराधा पाटील आणि कौतिकराव ठाले-पाटील यांची  आहे.पुरस्कार मिळाल्यानंतर एका वृत्तमानपत्रास दिलेल्या मुलाखतीत अनुराधा पाटील यांनी कौतिकराव ठाले-पाटील यांना त्यांच्या कविता लेखनाचं तर श्रेय  दिलच त्या बरोबरच पुरस्कार मिळाल्याचा माझ्या पेक्षा त्यांना अधिक आनंद  झाल्याचे त्यांनी सांगितले.एवढेच नव्हे तर त्यांची कविता पुढे जाण्यास, त्यांची  कविता उभी राहण्यास ठाले-पाटील यांचे मोठे योगदान असल्याचंही सांगितले. यातच त्याच्यातील कवयित्रीच मन किती संवेदनाक्षम आहे, हे स्पष्ट होतं.
                                                                                  यशवंत भंडारे, औरंगाबाद
                                                    मो.9860612328


Comments

Popular posts from this blog

बाबासाहेबांचा मराठवाड्याशी असलेला स्नेहबंध

संवेदनशील मनाचे गझल सम्राट सुरेश भट

प्रबुद्ध भारत हे नाव का स्वीकारले ?