तत्वज्ञ अभिनेता : डॉ.श्रीराम लागू
अभिनेता श्रीराम लागू यांचं आज (दिनांक 17 डिसेंबर, 2019) वृध्दापकाळानं निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.त्यांचं पार्थिव दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उद्या (दि.18 डिसेंबर) ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी (दि.19 डिसेंबर) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ही बातमी आज धडकली अन् एका खऱ्या नटसम्राटाला श्वासोश्वासाच्या जंजाळ्यातून निसर्गानं मुक्त केलं. विज्ञानावर नितांत निष्ठा ठेवून त्या बरहुकुम जगलेल्या आणि अंधश्रध्देवर प्रहार करत विवेकनिष्ठ समाज घडावा म्हणून प्रयत्न करणारा माणूस आपल्यातून आज गेला आहे….. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली…..!!!
पुण्यातील बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना डॉ. लागू यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर भालबा केळकर यांच्यासारख्या समविचारी वरिष्ठ स्नेही समवेत पुरोगामी नाट्य संस्था सुरु केली. 1950 च्या दशकात त्यांनी कान, नाक, घसा यांच्या शस्त्रक्रियेचं प्रशिक्षण घेतलं आणि पुण्यात पाच वर्षे कामही केलं. त्यानंतर कॅनडा आणि इंगलंड येथे पुढील प्रशिक्षण घेतलं. 1960 च्या दशकात डॉ.लागू यांचा पुणे, टाबोरा आणि टांझानिया येथे वैद्यकीय व्यवसाय सुरु होता.
भारतात असतांना पुण्यातील पुरोगामी नाट्य संस्था आणि मुंबईतील ‘रंगायन’संस्थेच्या माध्यमातून रंगमंचावरील कामही त्यांनी सुरु केलं. त्यानंतर 1969 मध्ये त्यांनी वसंत कानेटकर यांच्या ‘इंथे ओशाळला मृत्यू’ या नाटकाच्या माध्यमातून पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून कामास सुरुवात केली. ते अलीकडेपर्यंत अभिनयाचं काम करत होते.-
डॉ.लागू यांचा 16 नोव्हेंबर 1927 रोजी सातारा येथे जन्म झाला. वडिलांचे नाव बाळकृष्ण लागू असे होतं. नटसम्राट, पिंजर असे शब्द उच्चारले की, अभिनयाचा सम्राट म्हणून श्रीराम लागूंची प्रतिमा ठळकपणे पुढे येते. त्यांची अभिनय कारकिर्द म्हणजे अभिनयाच ‘तेजस्वी पर्व’ च म्हणावं लागतं.अभिनय जिवंत करणं अथवा एखादया पात्रात एकरुप होणं म्हणजे काय, हे त्यांच्या अभिनयातून दिसे. भूमिकेतील पात्राच्या तोंडची वाक्य प्रेक्षकांच्या मनाच्या गाभाऱ्यात अलगद पोहचवण्याचं त्यांच कसब एकमेवद्वितीय म्हणावं लागेल असं होतं.
त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील भावे हायस्कूलमध्ये झालं तर महाविद्यालयीन शिक्षण फर्गुसनमध्ये. शालेय जीवनापासून नाटकाची आवड असलेल्या डॉ.लागूंनी पुण्यातील पी.डी.ए या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून नाटकात काम करण्यास सुरुवात केली. बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असतांनाही त्यांचं नाट्य वेड थांबलेलं नव्हतं. तेथेही त्यांनी नाटकात कामं केली. वैद्यकीय क्षेत्रात उत्तम प्रकारे सेवा देत असतांना, चांगल्या प्रकारे नावलौकीक झाली असतांना अर्थात जम बसला असतानांही नाट्य अभिनयातही लिलया संचार करण्याचं यश संपादन केलेल्या डॉ. लागू यांचं अभिनय क्षेत्रातील काम ‘डॉक्टरेट’ पदवीस पात्र आसचं होतं.
अभिनयाशिवाय त्यांनी काही नाटकांचं दिग्दर्शनही दर्जेदारपणे केलं. यात गुरु महाराज गुरु, गिधाडे, हिमालयाची सावली, गार्बो, उद्ध्वस्त धर्मशाळा, कस्तुरीमृग, एकच प्याला, शतखंडे, चाणक्य विष्णुगुप्त, किरवंत आदी नाटकांचा समावेश होता, विशेष म्हणजे ‘क्रांती मीडिया’ या अनुवादीत गुजराती नाटकाचेही त्यांनी दिग्दर्शन केलं होतं. याशिवाय ‘एक होती राणी’ आणि ‘ॲन्टीगनी’ ही दोन नाटकंही त्यांनी लिहिली. नाशिकमधील वि.वा.शिरवाडकर (तात्या) आणि वसंत कानेटकर या दोन्ही दिगंज नाटककारांवर डॉ.लागू यांचं नितांत प्रेम होतं. जिव्हाळ्याचे संबंध होते. या दोन्ही नाशिककर नाटककारांच्या नाटकातील आव्हाणदायक चरित्र भूमिकांना डॉ.लागू यांनी केवळ न्याय दिला नाही तर त्यांना जिवंत करत परमोच्च शिखरावर काही भूमिका नेऊन ठेवल्या. जुन्या आणि नव्या पिढीतील नाटककारांना आपलसं करत त्यांच्या नाट्यकृतींना प्रेक्षकांसमोर घेऊन जाण्याचंही फार मोठं काम डॉ.लागू यांनी केलं. यात गो.नी.दांडेकर, श्री.ना.पेंडसे यांच्यापासून प्र.ल.मत्रेकर, प्रेमानंद गज्वी आणि श्याम मनोहर यांच्यासारख्यांच्या प्रायोजिक नाट्यकृतींही त्यांनी अत्यंत उत्साहानं सादर केल्या. पी.डी.ए, रगायन, थियटर युनिट, कलावैभव, गोवा हिंदु, रुपवेध अविष्कार, आयएनटी या प्रसिध्द नाट्यसंस्थांच्या नाटकांतून विविध भूमिका साकारतांना अभिनयाचा अमिट ठसा त्यांनी उमटवला.
‘नाट्यसम्राटनं’ विश्वमान्यता मिळवून दिलेल्या त्यांच्या अभिनयाला मराठी नाट्य प्रेक्षक, नाट्यप्रेमी कधीच विसरणार नाहीत. पण ‘पिंजरा’ तल्या अभिनयानंही चित्रपट इतिहासात सुवर्ण अक्षराणं नोंद करावी असा इतिहासही घडवला. शांताराम बापू यांचं दिग्दर्शन आणि
निर्मिती कौशल्य, ‘पिंजरा’ ची अव्दिय अशी पटकथा यामुळं माझ्या सारख्या अनेकांच्या मनावर पिंजरातील मास्तराचं गारुड आजही राज्य करीत आहे. एकाच चित्रपटात दोन प्रकारच्या भूमिका साकारण्याचं आव्हाण डॉ. लागूंनी पिंजरामध्ये लिलया पेललं होतं. या चित्रपटाच्या पहिल्या भागातील आदर्श शिक्षकाची तर चित्रपटाच्या उत्तरार्धात सर्व आदर्श संस्कार विसरुन एका स्त्रीच्या प्रेमापाई गलीत गात्र अस्तीत्वहिन झालेल्या पण ‘आदर्श शिक्षका’ची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून केविलवाणी धडपड करणाऱ्या व्यक्तीची भूमिका कायम स्मरणात राहते.
राजकीय चित्रपटांची मराठीतील संख्या तशी कमीच पण स्मरणात राहतील अशा काही चित्रपटांमध्ये ‘सामना’ , सिंहासण आणि मुक्ता कधीच विसरता येणार नाही. या चित्रपटांमुळेच डॉ.लागू यांना मोठया प्रमाणात राजकीय चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. निळू फुले आणि डॉ.श्रीराम लागू यांच्या अभिनयाची चांगलीच मेजवाणी ‘सामना’मध्ये पाहावयास मिळाली. त्यानंतर ‘सिंहासन’लाही मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सुगंधी कट्टा, देवकीनंदन गोपाळा, चंद्र आहे साक्षीला यासारख्या चित्रपटांची जणू मालीकाच सुरु झाली.
डॉ.श्रीराम लागू यांनी लोकशाही समर्थक सामाजिक प्रश्नांवर आधारित घटनात्मक अशा विविध चळवळींमध्ये हिरिरीने सहभाग घेतला. विचार स्वातंत्र्याची गळचेपी त्यांना मान्य नव्हती. त्यामुळे त्यांनी विचार स्वातंत्र्याची चळवळ आणि अंधश्रध्दा निर्मूलन या चळवळीत सक्रीय सहभाग दिला. ते कृत्तीशील आणि तत्वज्ञ कलावंत अभिनेता होते. सामाजिक कृतज्ञता निधीला केवळ मदत करुन थांबले नाहीत तर या निधीच्या कामाचे स्वत: नेतृत्वही त्यांनी केलं. त्यांना एखादी गोष्ट आवडली नाही तर त्यावर परखडपणे प्रतिक्रिया नोंदवून प्रसंगी रस्त्यावरच्या लढयात सहभागी होत असतं. म्हणून त्यांनी अनेक सामाजिक आणि राजकीय विषयावर आपली मतं निर्भिडपणे, रोख ठोकपणे मांडली. अर्थातच सातत्यानं सार्वजनिक महत्वाच्या कामामध्ये ते आघाडीवर राहत असतं. साहित्य विषयक आणि सांस्कृतिक व्यासपीठावरुनही ते स्पष्टपणे चौफेर विषयांवर बोलत असतं. त्या विषयांवर त्यांचा गाढा अभ्यास असे. त्यांच्या विचारांमध्ये सुक्ष्म निरीक्षण आणि व्यापक विश्लेषण यांचा उत्तम प्रतीचा संयोग पाहवयास मिळे.
त्यांच्या सर्वांगिन व्यक्तिमत्वाचा सातत्यांनं विचार करुन, त्यांचा अभ्यास करुन आणि त्यांचा अभिनय कर्तृत्वाचा सन्मान करण्याच्या हेतूने अतिशय प्रतिष्ठेचा संगीन नाटक आकादमीचा पुरस्कार 2010 मध्ये देऊन त्यांना पुरस्कृत करण्यात आलं होतं. डॉ.श्रीराम लागू यांना अनेक सन्मान देऊन गौरवण्यात आलं आहे. त्यात दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठाणतर्फे 2006 मध्ये जीवन गौरव पुरस्कार दिला होता. भारत सरकारने पद्मश्री हा किताब देऊन सन्मानित केलं होतं. 1997 मध्ये कालिदास सन्मान, 2018 मध्ये राजश्री शाहु कला गौरव पुरस्कार. मराठी नाटक-चित्रपटाबरोबरच डॉ.लागू यांनी हिंदी चित्रपटातही आपल्या अभिनयानं मौलीक अशी भर घातली होती. त्यांच्या अभिनयाची भव्य उंची अनेक हिंदी चित्रपटातून पाहवयास मिळते. डॉ.लागू यांनी हिंदी चित्रपटात प्रामुख्याने चरित्रात्मक भूमिका प्रचंड ताकदीने साकारल्या. शंभर पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांमध्ये तर 40 पेक्षा अधिक मराठी चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या. डॉ.लागू यांनी मराठी - हिंदी भाषेतील दूरचित्रवाणीवरील मालींकामधूनही अभिनय केला. मराठी ,हिंदी आणि गुजराती भाषेतील 50 पेक्षा अधिक नाटकांमधून त्यांनी अभिनय केला. तसेच सामाजिक राजकीय वास्तव ठाम पणे मांडण्याचा सातत्यानं प्रयत्न केला.
डॉ. श्रीराम लागू यांनी दिलेल्या मुलाखती,निवडक लेख आणि भाषणे यांचा ‘रुपवेध’ नावानं ग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे. डॉ. पुष्पा भावे यांची या ग्रंथास प्रदीर्घ प्रस्तावना आहे. ‘झाकोळ’ हा पटकथा विषयक ग्रंथ, आणि ‘लमाण’ हे त्यांचे आत्मचरित्र 2004 मध्ये पॉप्युलर प्रकाशनने प्रसिध्द केलं आहे. डॉ.लागू यांचा ‘तन्वीर’ हा मुलगा मुंबईतील लोकलने प्रवास करतांना लोकल रेल्वे गाडीवर झोपडपट्टीतल्या मुलानं मारलेल्या दगडामुळे जखमी झाला होता. त्यातच त्याचे निधनही झाले. डॉ. लागू यांनी आपल्या मुलाच्या नावानं 2004 पासून ‘तन्वीर सन्मान’ पुरस्काराची सुरुवात केली आहे. नाटक - चित्रपट क्षेत्रात प्रदीर्घ काळ सेवा केलेल्या लेखक- कलावंतांना हा पुरस्कार दिला जातो. तन्वीर च्या स्मरणार्थ डॉ. लागू यांनी स्थापन केलेल्या ‘रुपवेध’ प्रतिष्ठाण तर्फे हा पुरस्कार दिला जातो.
आपल्या निसर्गदत्त बावनकशी अभिनयानं प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि बुध्दिप्रामाण्यवादाची कायम कास धरणाऱ्या अन् समाज जागृती करणाऱ्यांमध्ये डॉ. लागू यांचं नाव सन्मानानं घेतल जातं. त्यांच्या निधनानं भारतीय रंगभूमी बरोबरच चित्रपट, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. डॉ. लागू म्हणजे चित्रपट सृष्टीतलं लखलखतं, कसदार नाणं होतं. त्यांच्या अभिनय आणि कर्तृत्वानं पन्नास वर्षाहून अधिककाळ त्यांनी भारतीय प्रेक्षकांना समृध्द केलं आहे. 1977 मध्ये चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी चित्रपटात पदार्पन केलेल्या डॉ.लागू यांना दुसऱ्याच वर्षी 1978 मध्ये ‘घरोंदा’ या चित्रपटातील मुख्य सहाय्यक अभिनयासाठी फिल्मफिअर पुरस्कार देण्यात आला होता. चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात आपल्या कसदार अभिनयानं मोहीत करणाऱ्या डॉ.लागू यांनी आपल्या स्पष्ट विचारांची वेगळी ओळख निर्माण केली होती. ‘‘देवाला रिटायर करा’’ असं त्यांनी ठामपणे सांगितलं. ‘‘देव हीच या जगातील आद्य अंधश्रध्दा आहे. आणि जोपर्यंत या अंधश्रध्देला तुम्ही नकार देत नाहीत तोपर्यंत तुमच्या हातून अंधश्रध्दा निर्मूलन होणं शक्य नाही.’ असंही त्यांनी स्पष्टपणांनं सांगितलं. यांच्या रोखठोक नि स्पष्ट मतांमुळं अनेक वेळा अनेक वादळं आणि आव्हाणं अंगावर घ्यावी लागली. ज्या ताकदीनं त्यांनी भूमिका साकारल्या त्याच ताकदीनं त्यांनी ही आव्हाणेही लिलया झेलली. त्या आव्हाणांनां समर्थपणानं सोमोरे गेले.
मोहन तोडवळकर, मोहन वाघ, सुधीर भट यांच्यापासून ते गोवा हिंदू आसोसिएशन तसेच इंडियन नॅशनल थियटर सारख्या संस्थांमध्ये त्यांनी निष्ठेनं काम केलं. सत्यदेव दुबे यांच्या ‘प्रागतिक’ संस्थेसाठी डॉ.लागू यांनी विजय तेंडुलकर यांचे ‘गिधाडे’ हे खळबळजनक नाटक दिग्दर्शित केलं. एवढेच नव्हे या नाटकात त्यांनी स्वत: एक मध्यवर्ती भूमिकाही केली. पत्नी दीपा श्रीराम यांनी निर्मिती केलेल्या ‘झाकोळ’ या चित्रपटाचं दिग्दर्शनही डॉ. लागू यांनी केलं होतं. रंगभूमीवरच्या डॉ.लागू यांच्या एकाहून एक सरस भूमिका गाजल्या, त्यातही नटसम्राटमधील गणपतराव बेलवलकरांच्या भूमिकेनं अभिनय कारकिर्दीला हिमालयाची उंची गाठून दिली.
डॉ. लागू हे विज्ञानवादी आणि जनवादी होते. सुशिक्षित लोक सुध्दा नवस वगैरे करतात हे पाहून त्यांना वाईट वाटत असे. भगवान बुध्दाने ‘अत्त दीप भव’ असं जीवनाच सूत्र सांगितलं होतं, तसेच डॉ. लागू यांचंही म्हणनं होतं, ते म्हणत असतं, ‘आपल्या जीवनाचे आपणच शिल्पकार असतो आणि आपले ध्येय साध्य करावयचे असते.’ आपल्या देशातील अंधश्रध्दा, गरीबी आणि अज्ञानपणामुळे लवकर नाहीशी होणार नाही, याची त्यांना चिंता वाटत असं. देशात बुवाबाजीमुळे परमेश्वराचे बाजारीकरण झालेले आहे, हे थांबले पाहिजे, असेही त्याना वाटत असे. देवाच्या नावानं व्यापार करणारे धूर्त लोक हे समाजाचे शत्रू आहेत, असेही ते सांगत असतं. त्यांचे हे सर्वस्पर्शी काम कायम स्मरणात राहील.
यशवंत भंडारे, औरंगाबाद,
मो. 9860612328
**
Comments
Post a Comment