डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे निर्माते

सोलापूर दि. 20 : - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते नव्हे तर आधुनिक भारताचे निर्माते, मानवतेचे उद्गाते तसेच विश्वभूषण असे नेते होते, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुणे विभागाचे उपसंचालक यशवंत भंडारे यांनी केले.
येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये ‘राष्ट्र निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर आयोजित व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सहायक कोषागार अधिकारी सूर्यकांत खटके होते.
श्री.भंडारे पुढे म्हणाले की, देशात सुमारे 85 टक्के इतका वर्ग उपेक्षित असून या सर्वांचे आत्मभान जागृत करण्याचे महान काम डॉ.बाबासाहेबांनी केले आहे. सध्या महान व्यक्तींच्या विचारांना हळुवारपणे संपविण्याचे कार्य चालू आहे की काय अशी शंका येण्याइतपत देशात परिस्थिती निर्माण झाली आहे. थोरांच्या विचारांना संपविणे म्हणजेच पर्यायाने अंधार युगाकडे वाटचाल असल्याचे सांगून ते म्हणाले की, आज देशाला तथागत गौतम बुध्द, महात्मा बसवेश्वर, महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज , आगरकर यांच्या विचारांची गरज आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ घटना लिहिण्याचेच काम केले नसून देशातील कामगार, कृषि,शेतकरी, जल, खनिज,अर्थ, शैक्षणिक तसेच बाबासाहेबांनी देशाला जलधोरण, विजधोरण दिले. देशाची अर्थव्यवस्था उभारणीचे मूलभूत काम केले. त्याचबरोबर महिलांविषयक धोरण ठरविण्याचे प्रचंड मोठे कार्य केले असल्याचेही त्यांनी प्रतिपादन केले.
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज बिराजदार म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ होते, यात शंकाच नाही. मात्र त्यांच्या कृषि विषयक धोरणांचा अभ्यास केला असता ते जागतिक दर्जाचे कृषितज्ज्ञ असल्याचे सिध्द होते. तर अध्यक्षीय भाषणात श्री.खटके म्हणाले की, डॉ.बाबासाहेबांना एका विशिष्ट जाती-जमातीपुरते सिमीत न करता त्यांचे कार्य संपूर्ण विश्वभर पोहोचविण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील मनुस्मृती दहन, काळाराम मंदिर सत्याग्रह तसेच चवदार तळे सत्याग्रह आदी घटनांचा आढावा घेवून समाजातील जाती व्यवस्थेच्या श्रृंखला तोडण्यासाठी प्रत्येकाने कार्यरत रहावे, असे आवाहन केले.
तत्पूवी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ बनसोडे तर आभार प्रदर्शन भिमराव लोखंडे यांनी केले. याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी गोविंद अहंकारी, कवी देवेंद्र औटी, मनोहर मुंडे, नाना वाघमारे,राजा सोनकांबळे,व्ही.डी.जाधव,वाय.सी.कांबळे, शंतनु गायकवाड यांच्यासह संबंधित अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
0 0 0 0



Comments

Popular posts from this blog

बाबासाहेबांचा मराठवाड्याशी असलेला स्नेहबंध

संवेदनशील मनाचे गझल सम्राट सुरेश भट

प्रबुद्ध भारत हे नाव का स्वीकारले ?