साहित्य संमेलनात लोकराज्यनेही मारली बाजी...!



 
 
 

साहित्य संमेलनात लोकराज्यनेही मारली बाजी...!
                                                        - यशवंत भंडारे

पिंपरी चिंचवड येथील ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अनेकार्थाने गाजले. भव्यता, रसिकांची लाखोंच्या संख्येने उपस्थिती आणि विक्रमी पुस्तक विक्री. ‘न भूतो न भविष्यति’ या अर्थाने पिंपरी-चिंचवड येथील या साहित्य संमेलनास लोकांनी प्रतिसाद दिला. या संमेलनातील पुस्तक प्रदर्शन दालनात महाराष्ट्र शासनाच्या लोकराज्य या मासिकासही प्रचंड प्रमाणात वाचकांनी पसंतीची पोच दिल्याचे या संमेलनातून स्पष्ट जाणवले आहे.
            संमेलनातील पुस्तकाच्या दालनामध्ये लोकांची जशी मराठी वाड:मय, इतिहास, वैचारिक ग्रंथांना पसंती होती, तशीच ती करिअर, माहिती आणि संदर्भासाठी लोकराज्यालाही पसंती होती. चार दिवस चाललेल्या या साहित्य सोहळ्यात लोकराज्य दालनाचे उद्घाटन लोकप्रिय कवी आणि माजी संमेलन अध्यक्ष फ.मु. शिंदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पुणे विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक यशवंत भंडारे, सहायक संचालक आकाश जगधने, माहिती सहायक संग्राम इंगळे आणि अन्य कर्मचारी उपस्थित होते. फ. मु. शिंदे यांनी लोकराज्य चाळताना जो अभिप्राय दिला तो अत्यंत मौलिक होता. लोकराज्य अंकाचे मुखपृष्ठ, फोटोग्राफी, शासनाचे विविध उपक्रम, छपाई, संपादकीय, भाषा आणि विविध विषयांची रेलचेलने भरलेल्या अंकांचे त्यांनी कौतुक केले. दिवसेंदिवस लोकराज्य जनमानसात लोकप्रिय का होत आहे, हे अंक पाहिल्यावर कळले असेही ते म्हणाले.
खऱ्या अर्थाने लोकराज्यचा अंक हा शासन आणि सामान्य माणूस यांच्यातील दुवा आहे. याची प्रचीती या संमेलनादरम्यान विविध स्तरावरील वाचकांनी लोकराज्यच्या दालनास भेट दिल्यावरून, त्यांनी नोंदविलेल्या अभिप्रायावरून आली. अगदी उच्च शिक्षित तरुणांपासून वयोवृद्ध साहित्यिक, लेखक, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थ्यांपासून, ग्रामीण भागातून आलेल्या सुशिक्षित शेतकरी आणि शासकीय, इतर नोकरदारांनीही या स्टॉलला भेट दिली. नुसती भेट देऊनही ही मंडळी थांबली नाहीत तर त्यांनी लोकराज्यचा अंक चाळला, काहींनी जुने अंक विकत घेतले. दरमहा हा अंक  कोठे मिळेल, इंटरनेटवर ऑनलाईन अंक आहेत का? इथपासून आमचे लेख लोकराज्यमध्ये प्रसिद्ध केले जातील का? असे एक ना अनेक प्रश्नांची सरबराई केली जात होती.
लोकराज्यच्या दालनास भेट देणाऱ्या वाचक, रसिकांच्या प्रश्नांची येथोचित उत्तरे कर्मचारी श्रीमती सुरेखा जाधव, सुहास सत्वधर देत होते. स्टॉलला भेट देणारा प्रत्येकजण किमान एखादा अंक घेऊनच पुढे जात होता. नव्याने लोकराज्यचा अंक पाहणारा वाचक शासनाचे मासिकही इतके दर्जेदार आणि उत्तम मजकुराचे असते हे पहिल्यांदा पाहत असल्याची प्रतिमाही देत होते.
            चार दिवस चाललेल्या साहित्य संमेलनात शंभर रुपये भरून ३६२ वाचक वर्गणीदार झाले, तर मोठ्या प्रमाणावर अंकांची विक्री झाली. महाराष्ट्र अहेड आणि उर्दू लोकराज्य अंकाचीही विचारणा होत होती. या संमेलनात मराठी भाषिकांची संख्या मोठी असल्याने मराठी अंकांनाच मागणी अधिक होती. शासकीय प्रकाशनाची विक्री खऱ्या अर्थाने दिलासा देणारी ठरली. लोकराज्यच्या विशेषांकांना मागणी अधिक होती. यात प्रामुख्याने नवीन सरकारचा वर्षपूर्ती विशेषांक, संकल्प २०१६ महाउद्योग राष्ट्र, जलयुक्त शिवार, महामानव हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील अंकांना अधिक मागणी होती. त्यातही तरुण वर्गाचा प्रतिसाद अधिक होता. स्पर्धा परीक्षांसाठी लोकराज्य हा संदर्भ म्हणून वाचला जातो. त्यातील प्रेरणा हे सदर युवक-युवतींना अधिक आकर्षक वाटते. खरे तर लोकराज्यच्या प्रत्येक अंकात स्पर्धा परीक्षेचे एक तरी सदर असावे, असे अनेकांनी सांगितले. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी चालू घडामोडी असाव्यात, अशीही वाचकांची मागणी होती. त्याचबरोबर वर्षभराचा गोषवारा असणारा अंक असावा, असेही काहींनी सांगितले.
            शासनाकडून जनतेच्या कल्याणासाठी राबविले जाणारे उपक्रम, निर्णय हे अधिकृतरित्या मिळण्याचे एकमेव साधन हे लोकराज्य आहे. काही वाचकांनी सांगितले की आम्ही आमचा ईमेल आयडी नोंदविला तर आम्हाला लोकराज्य प्रत्येक महिन्यात मेलवर मिळेल का? तर हे अंक डाऊनलोड करून वाचता येतील का? अशी सोय असल्याचे त्यांना सांगण्यात आले. विशेष म्हणजे लोकराज्यच्या दालनात लहान मुलांचीही लक्षणीय गर्दी होती आणि ते आवडीने अंक चाळत होते. पाठिवर दप्तर सांभाळत विद्यार्थी लोकराज्यचा अंक चाळून खाऊच्या पैशातून अंकही विकत घेत होते. लोकराज्यच्या वर्गणीदार आणि अंक विकत घेणाऱ्यांना ‘पहिले पाऊल वचनपूर्तीचे’ १५ वर्ष आधीची..... एकाच वर्ष आत्ताचे आणि माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ मार्गदर्शिका मोफत दिली जात होती. वाचक या पुस्तिकाही मोठ्या उत्सुकतेने वाचत होते, पाहत होते.
            लोकराज्यची लोकप्रियता आणि शासनाची वचनपूर्ती पाहणे हे वाचकांना आकर्षित करणारे होते. त्यातून शासनाच्या लोककल्याणाची तळमळ लोकांपर्यंत पोहचत होती. लोकांनाही जाणून घेण्याची तेवढीच उत्सुकता होती. महाराष्ट्राच्या परिवर्तनाचे प्रतिबिंब पाहताना लोकांना शासनाच्या लोककल्याणकारी आरसा दाखविण्याच्या लोकराज्यच्या अंक अतिशय आवडला. हे पाहताना आम्हाला अतिशय अभिमान आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या प्रयत्नांचे फळ याची देही याची डोळा पाहताना अभिमान वाटत होता.
            काही लेखक/वाचक आमच्या कविता/लेख लोकराज्यात छापणार काय अशीही विचारणा करीत होते. विशेष म्हणजे अनेक वाचनालयाच्या किमान २० वाचनालयांनीही पुन्हा लोकराज्यच्या वर्गणीसाठी नोंदणी केली. संमेलनादरम्यान अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. त्यात प्रामुख्याने संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनिस, या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, त्यांच्या सौभाग्यवती श्रीमती भाग्यश्री पाटील,
त्यांच्या कन्या, चिरंजीव, अंदमान येथे झालेल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. प्रा. शेषराव मोरे, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक वीरा राठोड, गुजराथी लेखक-विचारवंत कानजी पटेल, ज्येष्ठ संपादक-लेखक-पत्रकार महावीर जोंधळे, ज्येष्ठ विचारवंत, प्रकाशक प्रा. विलास वाघ, स्वयंसिद्ध फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. बेबीताई गायकवाड, कवी गणेश मरकड, पत्रकार जितेंद्र अष्टेकर, अशा कितीतरी जणांची नावे नोंदविता येतील. याबरोबरच लोकराज्यचे प्रबंध संपादक व संचालक (माहिती)(प्रशासन) देवेंद्र भुजबळ यांनी संमेलनादरम्यान या दालनास भेट देऊन वाचकांशी संवाद साधला. लोकराज्यचे संपादक सुरेश वांदिले यांनी या दालनास भेट देऊन कर्मचार्यांना प्रोत्साहन दिले.
            दिवसेंदिवस वाचकांनी संख्या वाढत आहे, तसेतसे लोकराज्याच्या गुणात्मक लेखनाची, संपादनाची पावती मिळत असल्याची या अंक वर्गणीदारांच्या प्रतिसादाने, पसंतीने दिली आहे. ५ कोटींच्या ग्रंथ विक्रीत शासनाच्या मासिकाने वर्गणीचा उच्चांक गाठला हा नक्कीच माणसाच्या जागरूकतेचे उदाहरण आहे, असे म्हणणे वावगे ठरू नये.
यशवंत भंडारे
उपसंचालक (माहिती)
विभागीय माहिती कार्यालय, पुणे
मो.नं.: ९८६०६१२३२८
००००


Comments

Popular posts from this blog

बाबासाहेबांचा मराठवाड्याशी असलेला स्नेहबंध

संवेदनशील मनाचे गझल सम्राट सुरेश भट

प्रबुद्ध भारत हे नाव का स्वीकारले ?