डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मराठवाड्याच्या शिक्षणातील योगदान
डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांना भारतातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना
शिक्षण आणि ज्ञान मिळवण्यापासून कोसो दूर ठेवण्यात आल्याची जाणीव होती. त्यामुळे
त्यांनी या समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करता यावा. त्यांची संस्कृतिक प्रगती करता
यावी म्हणून बहिष्कृतहित कारणी सभेची स्थापना जुलै 1924 मध्ये केली होती, या
सभेच्या माध्यमातून माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यासाठी प्रथम त्यांनी जानेवारी
1925 मध्ये सोलापूर येथे वसतीगृहाची सुरुवात केली. या सभेतर्फे मुंबईत मोफत वाचन
कक्ष सुरु करण्यात आले. या शिवाय महार हॉकी क्लबची स्थापना करुन या समाजातील
तरुणांना खेळामध्ये नैपुण्य मिळवण्याची संधी उपलब्ध करुन दिली.डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांनी 1928 मध्ये बहिष्कृत समाज शिक्षण संस्थेची स्थापना केली. डॉ.
बाबासाहेबांनी 1928 मध्ये दोन वसतीगृह काढून शिक्षणाच्या कार्यास सुरुवात केली
हेाती. त्यांनी प्रत्येक जिल्हयातील कार्यकर्त्यांनी जिल्हयाच्या ठिकाणी वसतीगृह
स्थापन करुन अस्पृश्य मुलांच्या
हायस्कूलच्या शिक्षणाची मोफत राहण्याची व जेवणाची सेाय करावी. त्यामुळे गरीब व
होतकरु अस्पृश्य विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येईल, असे आवाहन करताच अनेक जिल्हयात
अशी वसतीगृह सुरु झाली.त्यामुळे आज दलित समाजाचा जो शैक्षणिक विकास झाला त्याचे मूळ
या वसतीगृहांत दिसून येते.
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर यांनी मुंबईमध्ये 8 जुलै 1945 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना
केली. कनिष्ठ मध्यम वर्ग आणि अनुसूचित जाती- अनुसूचित जमाती (एससी-एसटी) साठी उच्च शिक्षणाची उत्तम सोय
निर्माण करण्याबरोबरच आदर्श शिक्षण संस्था त्यांना निर्माण करावयाची होती. पीपल्स
एज्युकेशन सोसायटीने 19 जून 1946 रोजी आपल्या पहिल्या महाविद्यालयाचा प्रारंभ
केला. मुंबईतील मरीन लाईन मधील लष्कराच्या जुन्या बॅरेक्समध्ये कला व विज्ञान महाविद्यालय सुरु करण्यात आले. या बॅरेक्स
केंद्रीय सरकारकडून लिजवर घेण्यात आल्या होत्या. या महाविद्यालयास सिध्दार्थ कॉलेज
ऑफ ऑर्ट ॲण्ड सायन्स असे नाव देण्यात आले. डॉ. बाबासाहेबांचा जन्म आताच्या
मध्यप्रदेशातील महू येथील लष्करी छावणीत झाला होता. तसाच सिध्दार्थ आणि मिलिंद
महाविद्यालयाचा जन्मही छावणीच्या बॅरेक्समध्ये झाला, हा मोठा योगा योग होता.
डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रामुख्यानं औरंगाबाद आणि मराठवाडयाशी संबंध 1934 मध्ये
आला. बाबासाहेब आणि त्यांच्या काही मित्रांनी 1934 मध्ये दौलताबादच्या देवगिरी
किल्ल्यास भेट दिली हेाती. त्यावेळी त्यांच्या मित्रांनी आणि त्यांना किल्ल्यातील
हौदावर ताजे तवाणे व्हावे म्हणून हात पाय धुतल्याने हौद बाटविला म्हणून
मुस्लिमांनी ‘धेड फार माजलेत, स्वत:ची पयरी विसरलेत’ म्हणून गोंधळ घालून, शिव्या
देऊन अपमानीत केले होते. त्यावेळी हैदराबाद संस्थानात सवर्ण हिंदु
बरोबरच मुस्लिमांचाही जातीय त्रास अस्पृशांना सहन करावा लागतो., हे बाबासाहेबांनी
ओळखले होते. हैदराबाद संस्थानातील अस्पृश्यता संपावयाची असेल तर नव्या विचारांची
जन जागृती, प्रबोधना बरोबरच उच्च शिक्षण तेही अस्पृश्यांमध्ये स्वाभीमान आणि
अस्मिता जागृत करणारे असावे असा विचार केला. त्यासाठी त्यांनी वेळ मिळेल तसे
औरंगाबादला भेटी देऊन अस्पृश्यांच्या बैठका, सभा घेऊन त्यांना जागृत करण्याचा
प्रयत्न केला. तसेच दौलताबादच्या किल्ल्यास भेट देण्यापूर्वी 10 ऑक्टोबर 1933 रोजी
औरंगाबाद येथे भेट दिली होती. त्यावेळी त्यांचा मुक्काम औरंगाबाद येथील
उस्मानपुऱ्यातील ‘मन्सुर यार जंग देवडीत’ होता
तेथे त्यांनी दलित समाजातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला
होता.
बाबासाहेबांची औरंगाबाद-मराठवाडयातील
जनतेची दुसरी भेट 1938 मध्ये झाली. यावेळी
मराठवाडयात सभा घेण्यास निझामाच्या पोलीसांनी मनाई केल्याने तेव्हा चाळीसगावंच्या
हद्दित असलेल्या मकरणपूरयेथे अस्पृयश्यांची परिषद 30 डिसेंबर 1938 रोजी झाली. या
परिषदेस खान्देश, मराठवाडयातून मोठया संख्येने दलित उपस्थित होते. ‘‘या निझाम
संस्थानात अस्पृश्यांसाठी शाळा नसाव्यात ही नवलाचीच गोष्ट आहे. मी लंडनमध्ये
असताना पुष्कळ विद्यार्थी निजामाची शिष्यवृत्ती घेउुन शिक्षण घेण्यास आले होते.
परंतु त्यात एकही महार, मांग किंवा चांभार नव्हता. बडोदे –कोल्हापूर संस्थान
प्रमाणे हे स्थानिकही वागतील अशी माझी अपेक्षा होती ; परंतु ती फोल ठरली…. …
तुम्ही आमच्या रक्ताचे आहात. मी तुमची दु:खे नाहीशी करण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही
काही गोष्टी जरुर करा. मेलेल्या जनावरांचे मांस खाणे सोडा. गलिच्छ कामे सोडा. तुम्ही म्हणाल, हा पोटा-पाण्याचा प्रश्न आहे.
हा प्रश्न काही पोटा-पाण्याचा नाही. अब्रूचा आहे. सर्व जातींची अब्रु, जाईल असे
तुम्ही काही करु नका. लोक तुम्हाला ‘धेड’ म्हणतात याची लाज वाटू द्या.’’ असा संदेश
बाबासाहेबांनी दिला. त्यामुळे मराठवाडयातील अस्पृश्यांमध्ये परिवर्तनाची नवी चेतना
निर्माण झाली.
मराठवाडयातील मराठी भाषिकांनी
स्वभाषा,स्वधर्म आणि राष्ट्रभावना जागृत व्हावी म्हणून शैक्षणिक परिषदां घेण्यास
सुरुवात केली होती. पहिली शैक्षणिक परिषद हैदराबादमध्ये 1915 मध्ये झाली. दुसरी
शैक्षणिक परिषद 1916 मध्ये औरंगाबाद येथे घेण्यात आली. तर 1917 व 1918 मध्ये तिसरी
व चौथी शैक्षणिक परिषद हैदराबाद येथे घेण्यात आली. पाचवी शैक्षणिक परिषद 1919
मध्ये लातूर मध्ये घेण्यात आली.
मराठवाडयात 1915 ते 1946 या कालावधीत
शिक्षणाचा बराचसा प्रसार झाला होता. निजामसरकारने जिल्हास्तरावर प्राथमिक व
माध्यमिक शाळा स्थापन केल्या होत्या. काही मोजक्याच दाट लोकवस्तींच्या गावीही
प्राथमिक व माध्यमिक शाळा स्थापन केल्या होत्या. या शिवाय काही खाजगी शैक्षणिक
संस्थांनी काही शाळा सुरु केल्या हेात्या
त्यात काही उल्लेखणीय शाळा अशा-परभणी येथील नूतन प्राथमिक शाळा (1916),
औरगाबादची सरस्वती भुवन शाळा (1917), औरंगाबादची शारदा मंदिर मुलींची प्राथमिक
शाळा (1918),उस्मानाबाद जिल्हयातील हिप्परगा येथील निवासी माध्यमिक शाळा (1921),
गुंजोटी येथील श्रीकृष्ण विद्यालय (1927), उदगीर येथील पंडित शामलाल स्मारक
विद्यालय (1937), लातूर येथील ज्युबिली आणि राजस्थान हायस्कूल (1938), सेलू येथील
नूतन विद्यालय (1944), नांदेड येथील प्रतिभा निकेतन आणि औरंगाबद येथील मराठा
हायस्कूल (1946), यांचा प्राधान्याने नोंदवाव्या लागतील. पण मराठवाडयात उच्च
शिक्षणाची सोय कुठेच नव्हती.
औरगाबादच्या शासकीय ज्ञान विज्ञान
महाविद्यालयाची स्थापना 1923 मध्ये झाली. हे औरंगाबादचे पहिले महाविद्यालय होते.
पण येथे फक्त इंटर पर्यंतचे शिक्षण दिले जात असे.पदवी शिक्षणासाठी हैदराबादला जावे
लागत होते. 1938 मध्ये या महाविद्यालयाची विद्यार्थी संख्या केवळ 375 होती. 1954
पर्यंत येथे इंटर पर्यंतचे शिक्षण दिले जात होते. हैदराबाद संस्थानात 1930 मध्ये
मुलींच्या शिक्षणाची सोय जिल्हयाच्या ठिकाणी करण्यात आली. पण तेही प्राथमिक आणि
माध्यमिक वर्गापूर्तेच. 1940 पर्यंत औरंगाबादच्या ज्ञान- विज्ञान महाविद्यालयात
मुलींना प्रवेश नव्हता. या महाविद्यालयात उर्दूची सक्ती असल्यामुळे या प्रांतातील
लोकांच्या शिक्षणावर अधिक वाईट परिणाम झाला. साकल्यानं विचार केल्यास मराठवाडयातील
शैक्षणिक मागासलेपणाची कारणे राजकीय, भाषिक, आर्थिक आणि सामाजिक स्वरुपाची होती.
त्यातूनच उच्च शिक्षणाची स्थिती अधिक वाईट
होती. अनूसुचित जातीच्या मुलांना शिक्षण तर दुरापास्त होते. त्यामुळे
बाबासाहेबांनी मराठवाडयातील तमाम जनतेच्या उच्च शिक्षणाचा कृतीयुक्त विचार केला.
हैदराबाद संस्थानातील उच्च
शिक्षणाबाबात खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली माहिती अत्यंत बोलकी आहे. मिलिंद
महाविद्यालयाच्या भूमिपूजन समारंभातील भाषणात ते म्हणतात,‘‘ हे कॉलेज उघडण्यासाठी
हैदराबाद संस्थानाचीच का निवड करण्यात आली, असे कदाचीत विचारण्यात येईल. याचे कारण
सेापे आहे. शिक्षणाच्या बाबतीत हैदराबाद संस्थान बरेच मागासेलेले आहे. उच्च
शिक्षणाच्या बाबतीत तर अगदीच मागासलेले आहे. हैदराबाद संस्थानचे क्षेत्रफळ 84 हजार
चौरस मैल असून 1 कोटी 60 लक्ष लोकसंख्या आहे. मार्च 1949 पर्यंत या संस्थानात एकूण
17 कॉलेज होती. या कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्यांची संख्या 7615 होती. … हैदराबाद संस्थानचा शैक्षणिक
मागासलेपण वगळला तरी खोलवर पाहिल्यास दुसरी एक खेदकारक घटना दिसून येते. ती म्हणजे
शैक्षणिक सवलतींची असमाधानकारक आणि असमर्थनीय विभागनी ! जे काही थोडे उच्च शिक्षण
हैदराबाद संस्थानात दिसते ते फक्त हैदराबाद शहरातच आहे.एकदर 17 कॉलेज पैकी फक्त
इंटर पर्यंत शिक्षण देणारी तीन कॉलेज सोडली तर बाकीची सर्व कॉलेज संस्थानची
राजधानी असलेल्या हैदराबाद शहरातच आहेत. आणि इंटर पर्यंत असलेल्या या तीन कॉलेज
पैकी एैंशी लक्ष लोकवस्तीच्या तेलंगणा भागासाठी ‘वरंगल’ येथे एक आहे. 45 लक्ष
लोकवस्ती असलेल्या मराठी (मराठवाडा ) भागासाठी औरगाबाद येथे दुसरे आणि 35 लक्ष
लोकवस्ती असलेल्या भागासाठी कर्नाटकातील गुलबर्गा येथे तिसरे आहे. ही उणीव भरुन काढण्यासाठी
पीईएस ने हैदराबाद संस्थानची निवड केली.’’ यावरुन तत्कालीन हैदराबाद संस्थान आणि
त्यातही मराठवाडयातील उच्च शिक्षणाची किती दयनीय अवस्था होती., यांचे चित्रच
डोळयासमोर उभे राहते. ज्या संस्थानात केवळ 7615 विद्यार्थी उच्च शिक्षण घेत होते.
तेथे अस्पृश्य, आदिवासी आणि गरीब मध्यम वर्गीयांची स्थिती तर खुपच वाईट होती.
डॉ. बाबासाहेबांनी आपल्या संस्थेचे महाविद्यालय औरंगाबादमध्ये सुरु
करण्या मागील ही जशी कारणे होती, तशीच इतरही कारणे होती त्याचाही उवापोह त्यांनी
केला आहे. याबाबतीत ते म्हणाले होते
‘‘औरंगाबाद ऐवजी हैदराबाद संस्थानच्या तेलंगण किंवा कर्नाटक भागात
सोसायटीला हे कॉलेज काढता आले असते, असे कदाचित म्हटले जाईल.जातीय किंवा भाषिक
भावनाची आमच्या सोसायटीला काही कर्तव्य नाही. सोसायटीचा मुख्य उद्देश जेथे जेथे
संधी मिळेल तिथे तिथे सेवा करणे हा आहे. मुंबईचे सिध्दार्थ कॉलेज चालविण्यात जशे
यश मिळाले तशाच प्रकारचे यश या नवीन प्रयत्नांनाही मिळण्याची सोसायटीची पहिल्या
पासून इच्छा होती. मुंबईच्या निष्णात आध्यापकांपैकी काहींना इकडे आणण्यासाठी
सोसायटी उत्सुक होती. पण असे आढळून आलेकी केवळ मराठी बोलणारे प्राध्यापकच
स्वच्छेने येथे येण्यास तयार झाले. आणि याच कारणास्तव सोसायटीचे औरंगाबादला कॉलेज
सुरु आहे.’’हैद्राबाद संस्थानातील उच्च शिक्षणाची स्थिती पाहता निष्णात अध्यापक
मिळणे शक्य नव्हते. याची जाणीवही बाबासाहेबांना होती. त्याशिवाय मराठवाडयाचे
मागासलेपणही त्यांना अस्वस्थ करीत होते.
मराठवाडयाच्या मागासलेपणाबाबत त्यांनी
वेळोवेळी खेद व्यक्त केला आहे. ‘भाषावार राज्य मीमांसा’ग्रंथात त्यांनी यावर
प्रकाश झोत टाकला आहे. बाबासाहेबांच्या मते निझामाच्या कारकीर्दीत मराठवाडा अगदीच
उपेक्षिला गेला आहे. ही उपेक्षितता बोचणारी आहे. ‘‘मला काळजी वाटू लागली आहे ती
मराठवाडयाची. गेल्या दोनशे वर्षांपासून हा भाग निजामाच्या ताब्यात होता. निजामाने
अमानुषरीत्या या विभागाची उपेक्षा केली. त्याने मराठवाडयाबाबत कधी अत्मियता
दाखवलेली नाही. मराठवाडयात एक मैल जाणारा कालवा नाही. ही मराठवाडयात तालुक्याच्या
ठिकाणीही क्वचितच हायस्कूल सापडते. निजामाच्या सरकारी दप्तरात मराठवाडयातून
नोकरीला असलेला सापडणारा तरुण विरळाच ! तेथील लोकांची अक्षम्य हेळसांड झाली. ते
निरक्षर आहेत. हे मी माझ्या स्वानुभावातून आणि मराठवाडयातील माझ्या माहिती प्रमाणे
बोलतो आहे. या भागातील लोक दोन्हीकडून विकसित लोकांच्यामध्ये पिचल्या गेले आहेत.
त्यांची नोकरीचे दार आज बंद करण्यात आली तर त्यांची फार हवालदिल स्थिती होईल. ’’बाबासाहेबांच्या
या चिंतनातून त्यांची मराठवाडयाबाबतची तळमळ दिसून येते.
मराठवाडयाला स्वातंत्र विद्यापीठाची
गरज आहे, हे ठासून सांगणारेही बाबासाहेब आंबेडकर होते. मराठवाडयाचा समावेश पुणे
विद्यापीठात केला तर काय होईल याचीही मिमांसा बाबासाहेबांनी अतिशय मार्मिक शब्दात
केली आहे. ते म्हणतात ‘‘जेव्हा मराठवाडयाला पुणे विद्यापीठात सामिल केले. तर त्यांचे
काय होईल, या कल्पनेने माझे मन थरारते! पुणे विद्यापीठातील शाळा-कॉलेजांचा दर्जा
इतका उंचावला आहे की, मराठवाडयाचा एक तरी मुलगा उत्तीर्ण होईल किंवा नाही याची
शंकाच आहे. तशी आशा करणेही बरे नव्हे !
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर लगेच नोकऱ्या मिळविण्यासाठी
पुण्या-नागपुरातील ब्राम्हणांची धाड मराठवाडयात पडेल’’ संयुक्त महाराष्ट्र
निर्मितीनंतर मराठवाडयाचे काय होईल ही चिंता बाबासाहेबांना होतीच. त्याचबरोबर येथील शिक्षणाची दैयनीय स्थिती
पहाता येथील लोकांचे हक्क अबाधित राहतील असाही संशय त्यांच्या मनात होता. म्हणून मराठवाड्यात गुणवत्तापूर्ण उच्चशिक्षण
उपलब्ध करुन देण्याबरोबरच मराठवाड्याचा आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक
विकास झाला पाहिजे. यासाठी ते प्रयत्न
करीत होते.
औरंगाबाद येथे त्यांनी विशेष लक्ष
घालून, प्रकृती ठीक नसताना वारंवार औरंगाबादला भेटी देऊन, येथे महाविद्यालय सुरु
करण्याचे प्रयत्न कृतीत उतरविले. पीपल्स
एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून औरंगाबाद येथे 19 जून 1950 रोजी पीईएस कॉलेजची
स्थापना करण्यात आली. औरंगाबाद येथेच हे
कॉलेज का सुरु करण्यात आले याची माहिती 1 सप्टेंबर 1951 रोजी तत्कालिन राष्ट्रपती
डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पीईएस महाविद्यालयाच्या इमारतीच्या भूमीपूजन
समारंभावेळी प्रकाशित केलेल्या स्मरणिकेत दिली होती. त्या स्मरणिकेत म्हटले होते. ‘‘ सोसायटीने
(पीईएस) विशेष उद्देशाने आपल्या कार्यासाठी औरंगाबाद निवड केली आहे. या संस्थानात उच्च शिक्षणाच्या सोयी
प्रामुख्याने हैदराबाद शहरातच आहेत. तर
ग्रामीण भागातील जनतेला उच्च शिक्षणाचा हक्कच त्यामुळे नाकारण्यात आला आहे. त्यामुळे सोसायटीने औरंगाबादची निवड कॉलेज सुरु
करण्यासाठी केली आहे. दुसरे आणि
महत्त्वाचे कारण म्हणजे या शहराला सांस्कृतिक आणि ऐतिहासदृष्ट्या असलेला वारसा.
भारतीय कला आणि संस्कृतिचा वारसा असलेल्या अजोड अशा वेरुळ आणि अजिंठा लेण्या. या
शहराच्या जवळ आहेत. याच प्रदेशातील संत कवींनी
धार्मिक समतेचा शिकवण दिली. म्हणून
सोसायटीने जुन्या गोष्टीतून प्रेरणा घेऊन आणि सद्यस्थितीतील या प्रदेशाची गरज
ओळखून हे कॉलेज सुरु केले आहे.’’ डॉ. बाबासाहेबांनी ‘नागविदर्भ व मराठवाडा’ या
भागाला मध्यवर्ती ठिकाण म्हणूनही औरंगाबादची निवड मिलिंद महाविद्यालयासाठी केली
होती.
हे कॉलेज सुरुवातीला छावणीतील बंगला
नंबर सहा, सात, आठ आणि नऊ यामध्ये सुरु झाले होते. बाबासाहेबांनी मुंबई येथून प्रा. म.भी. चिटणीस
यांना या कॉलेजचे पहिले प्राचार्य म्हणून आणले होते. छावणीच्या बंगलानंबर आठ च्या
दर्शनी भागात ग्रंथालय होते. मागच्या भागात प्राचार्य चिटणीस आणि ग्रंथपाल
के.द.वडजीकर हे राहत. बंगला नंबर नऊ मध्ये कॉलेजचे कार्यालय हेाते. इथेच कला
शाखेचे वर्ग ही भरत असत. बंगला नंबर सात मध्ये विज्ञानशाखेचे वर्ग चालत असत. बंगला
नंबर सहा मध्ये मुलांचे वसतीगृह होते. बंगला नंबर सहा व सात मध्ये प्राध्यापकही
राहत असत. मराठवाडयासारख्या दुर्गम ठिकाणी सर्व प्रथम महाविद्यालय काढणारे
बाबासाहेब आंबेडकर होते.
या कॉलेजसाठी बाबासाहेबांना सरकारी जमिन
मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांनी तेव्हा आताच्या नागसेनवन परिसराची 150 एकर जमीन
विकत घेतली. या जमीन खरेदीशी निजाम सरकारचा काहीही संबंध नव्हता. निजामाने एक
गुंठाही जमीन पीईएस संस्थेस मोफत दिली नव्हती. मिलिंद महाविद्यालयाची इमारत औरंगाबाद
शहराच्या सौदर्यात भर घालणारी असावी . असा बाबासाहेबांचा मानस होता., ‘‘विद्यार्थ्यांच्या
दृष्टीने ही इमारत भव्य आणि शोभिवंत अशीच होणार आहे. शिल्प कलेच्या दृष्टीने तर
औरंगाबाद शहराच्या ती अलंकार ठरणार आहे’’, असाही त्यांना विश्वास होता. कारण या
इमारतीचे शिल्पशास्त्रीय काम (इमारत प्लॅन) स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच
तयार केले होते. याजचे मिलिंद सायन्स, कॉलेजचे हास्टेल, आर्टस कॉलेजचे हॉस्टेल,
मिलिंद हायस्कूल या इमारतीचे प्लॅन खुद्द बाबासाहेबांनी तयार केले होते. हे ऐकूण कोणालाही आर्श्चय
वाटेल, असे डॉ. आंबेडकरांच्या सहवासात या
ग्रंथात बाबासाहेबांच्या पत्नी डॉ. सविता आंबेडकर यांनी लिहिले आहे. आज या
इमारती पाहून बाबासाहेब शिल्प शास्त्रातही किती तरबेज होते. याची खात्री पटेल.
बाबासाहेब व्हाईसरॉयच्या एक्झिकेटीव्ह कौन्सिल मध्ये मजूर मंत्री असताना त्यांनी शिल्प
शास्त्रात प्राविण्य मिळविले होते. मजूर मंत्री असताना बाबासाहेबांनी एकदा इंजिनिअरच्या
परिषदेत इंजिनिअर समोर शिल्प शास्त्रावर उत्कृष्ट भाषण करुन सर्वांना चकीत केले
होते.
विविध मार्गानी मिलिंद
महाविद्यालयासाठी निधीची उभारणी करीत असताना हैदराबाद सरकार आणि उस्मानिया
विद्यापीठ काही मदत करील, अशी आपेक्षा बाबासाहेबांना होती. परंतु हैदराबाद
संस्थानातील कॉलेज शिक्षण म्हणजे उस्मानिया विद्यापीठाची मक्तेदारी झाली होती.
उच्च शिक्षणाची सर्व जबाबदारी उस्मानिया विद्यापीठावर सोपवून हैदराबाद सरकार नामानिराळे
झाले. विद्यापीठाला वार्षिक ग्रॅंट देणे एवढेच आपले काम आहे, असे सरकारला वाटे तर
सरकारने विद्यापीठास देलेल्या ग्रँटवर इतर कुणाही विद्यापीठाशी सलग्न संस्थेचा
हक्क नाही असे विद्यापीठ सांगे. अर्थात या परिस्थीत उस्मानिया विद्याठाने मिलिंद
महाविद्यालयास ग्रँट नाकारली. त्यातच अल्प फी च्या उत्पादनातून महाविद्यालयाचा
खर्च भागवणे सोसायटीला कठिण जाऊ लागले.
दरम्यान, हैदराबाद संस्थानातील
अस्पृश्यांच्या उन्नीतीसाठी निजाम सरकारने उभारलेल्या एक कोटी रूपयाच्या ‘शडयुल्ड
कास्ट ट्रस्ट’फंडातून 12 लाख रुपयाचे कर्ज घेऊन पीईएस सोसायटीने हे कॉलेज सुरु ठेवली.
हे कर्ज बिनव्याजी हेाते आणि त्याची परत फेड 1956 पासून वर्षाला 50 हजार रुपाच्या
हप्त्याने करावयाची होती. या 12 लाख रुपयाच्या कर्जातून कॉलेजसाठी इमारत
बांधण्याबरोबरच इतर सामानांची खरेदीही करावयाची होती. 1 सप्टेंबर 1951 पर्यंत
प्रयोग शाळेतील उपकरणे आणि फर्निचरवर तीन लाख रुपयांचा खर्च झाला हेाता. आता
सोसायटीकडे नऊ लाख रुपये शिल्लक राहिले होते. आणि कॉलेजच्या इमारतीचा खर्च 20 लाख
रुपये लागणार होता. सोसायटीच्या बजेटमध्ये पुन्हा 11 लाख रुपयांची तूट निर्माण झाली
होती. ही तूट भरुन काढण्यासाठी सोसायटीला लोकांच्या देणग्यावरवर अवलंबून राहावे
लागणार होते. हे काम बिगर राजकीय स्वरुपाचे होते. हे कार्य सर्वस्वी शैक्षणिक आणि
सांस्कृतिक स्वरुपाचे असल्याने या कार्यास ज्यांची इच्छा आणि शक्ती आहे. अशा
कोणत्याही राजकीय पक्षाच्या माणसास या कार्यास मदत करता येईल. तसेच हैदराबाद
संस्थानमधील आणि बाहेरच्या जनतेसही उदार हस्ते देणगी देऊन या शैक्षणिक कार्यास
उत्तेज देण्याचे आवाहन बाबासाहेब यांनी केले होते. त्यास जनतेने मोठा प्रतिसाद
दिला. काही ठिकाणी बोलावून त्याचा जाहिर सत्कार करु बाबासाहेबांना इमारत फंडासाठी
थैल्या भेट देऊ लागले. त्या निधीचा फार मोठा उपयोग मिलिंद महाविद्यालयाची इमारत
बांधण्यासाठी झाला.
मराठवाडयातील पहिल्या पदवी
महाविद्यालयात उत्तमातील उत्तम शिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून बाबासाहेबांनी
अहोरात्र मेहनत घेतली. कॉलेजच्या प्राध्यापंकामध्ये सर्व जातीचे आणि धर्माचे प्राध्यापक
होते. मागासवर्गीय मुलाबरोबरच इतरतही मुलांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांच्यावर
चांगले संस्कार व्हावेत म्हणून प्राचार्य म.भी.चिटणीस, प्रा. नारतकर, प्रा.
मे.पु.रेगे, प्रा.रमेश गुप्ते, आदी प्राध्यापक मुंबईहून आणले होते. तसेच गोवा,
केरळ, उत्तर प्रदेश , विदर्भ, मध्यप्रदेश आणि कर्नाटक आदी प्रदेशातूनही
प्राध्यापकांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या. बाबासाहेबानी प्राध्यापकांची निवड
करताना विशिष्ट जाती-पातीचा विचार कधी केला नाही. विद्वता हाच निकष त्यांच्याकडे
होता. ज्याच्याकडे बुध्दी आहे तज्ज्ञ आहेत, ते मला हवे आहेत.असे ते नेमहमी म्हणत
असत.
औरंगाबादमध्ये 1949 मध्ये अनूसुचित
जातीचे केवळ दोन विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण घेत होते., तर 1950 मध्ये
पीईएसच्या महाविद्यालयातील 140 पैकी 26 विद्यार्थी अनुसूचित जातीचे होते. विशेष
म्हणजे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यापेक्षा इतर विविध जातींच्या विद्यार्थांची
संख्या सर्वाधिक म्हणजे 114 होती. या 26 अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांमध्ये
मुलींचाही समावेश हेाता. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या 1951 मध्ये
332 पर्यंत पोहचली होती. तर 1974, 75
मध्ये ही विद्यार्थी संख्या 3201 पर्यंत पोहचली होती. सुरुवातीच्या काळात बिगर
मागासवर्गीय विद्यार्थांचे प्रमाण एकूण विद्यार्थ्यांच्या तीन चतुर्थांश होते. जस
जशी इतर महाविद्यालय सुरु झाली तस तशी मिलिंद मधील बिगर मागासवर्गीय
विद्यार्थ्यांची संख्या मिलिंदमधील संख्या कमी होत गेली. मराठवाडयात प्रामुख्याने
1960 नंतर इतर संस्थाची महाविद्यालय सुरु झाली. तथापि, नागसेनवन परिसरातील विविध
महाविद्यालयात विदर्भ, मराठवाडयातील सर्व जिल्हे, खान्देश आणि लगतच्या नगर
जिल्हयातून मोठया संख्येने विविध जाती धर्माचे विद्यार्थी या परिसरातील
महाविद्यालयात प्रवेश घेत होते. आणि सध्याही घेत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांनी उभारलेल्या शैक्षणिक संस्थांबांबतचा आदर, येथे असलेले शैक्षणिक वातावरण,
विद्यार्थ्यांना मिळणारी प्रेमाची वागणूक, दिला जाणारा विश्वास, प्राध्यापकांकडून मिळणारी
साहनुभूती, सुसज्ज ग्रंथालय, वसतीगृह आणि शिष्य कृतीची सुविधा यामुळे विद्यार्थी
आजही नागसेनवन परिसरातील महाविद्यालयात प्रवेश घेणे पसंद करतात.
मराठवाडयातील शिक्षण विषयक धोरणाला एक
व्यापक अधिष्ठाण देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. औरंगाबाद येथील
त्यांनी स्थापन केलेल्या कॉलेजचे आधीचे नाव पी.ई.एस.कॉलेज (पीपल्स एज्युकेशन
सोसायटीचे कॉलेज) असे होते. परतु 1954 मध्ये बाबासाहेबांनी या कॉलेजचे नामकरण एका
सभेत केले. आणि कॉलेजचे नाव मिलिंद असे ठेवले. ज्या परिसरात हे कॉलेज वसलेले आहे
त्याला ‘नागसेनवन’ असे नाव दिले. त्या थोर गुरु शिष्यांची ज्ञानाची बौध्दीक
प्रामाणिकपणाची परंपरा या महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी
पुढे चालवावी असा संदेश दिला.
या मिलिंद महाविद्यालयात मुलांच्या
बरोबरच मुलीही शिक्षण घेत असत.मागासअसलेल्या समाजातील तसेच बिगर मागास समाजातील
मुलींना सहशिक्षणाचा गंधही नव्हता. मराठवाडयात मुलांच्या बरोबरीने मुलींनाही उच्च
शिक्षणाची संधी उपलब्ध करुन बाबासाहेबांनी नवीन पायंडा सुरु केला. कारण निजाम
संस्थानातील बहुतेक शाळा –महाविद्यालयात सहशिक्षणाची सोय नव्हती. एक तर मुलींसाठी
शिक्षणाची सोय मोजक्या जिल्हयाच्या ठिकाणी प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षणापर्यंत
होती. त्यातही मुलींच्या वेगळया शाळा हेात्या. या मिलिंद कॉलेज मध्ये
बाबासाहेबांनी सर्व जातीच्या आणि धर्माच्या शिक्षणाची सोय केली. मुलींच्या
शिक्षणाला उत्तेजन मिळावे मुलींनी मोठया संख्येने कॉलेजमध्ये यावे म्हणून
शहरापासून कॉलेज पर्यंत ने-आण करण्यासाठी एक बसही ठेवली होती. या कॉलेजचे द्वार
सर्व धर्मियांसाठी मोकळे आहे. येथे कोठल्याच प्रकारची जातीयता नाही, असे खुद्द
बाबासाहेबांनी स्पष्ट केले होते.
औरंगाबादचे हे मिलिद महाविद्यालय
म्हणजे बाबासाहेबांचे अत्यंत लाडके अपत्य होते. या ठिकाणी मुलांना गुणत्तेचे
शिक्षण मिळावे म्हणून सर्व साधनांनी समृध्द करण्यासाठी बाबासाहेबांनी एकही संधी
दवडली नाही. सोसायटीने त्या वेळी एक लाख 26 हजार रुयपे खर्च करुन सायन्स लॅब मध्ये
सर्व प्रकारची उपकरणे आणि साधने विकत घेवून लॅबरेटरी सुसज्य केली होती. त्यामुळे
तज्ज्ञ डेमॉन्स्ट्रेटरच्या देखरेखीखाली सायन्सच्या प्रत्येक विद्यार्थ्याला
स्वत:प्रयोग करण्यास संधी मिळत असे.
एका वर्षात पी.ई.एस.संस्थेने मिलिंद
कॉलेज मध्ये एक सुंदर ग्रंथालय उभारले होते. त्या ग्रंथालयात आवश्यक ती सर्व
प्रकारची पुस्तकं होती. त्या वेळी संस्थेने 40 हजार रुपये खर्च करुन एका वर्षात चार
हजार मौलिक ग्रंथांचा संग्रह केला होता.
बाबासाहबांचे ग्रंथावर अतीशय प्रेम होते. ग्रंथवाचनाने माणसाचे आयुष्य समृध्द होते;
यावर त्यांचा दृढ विश्वास होता. म्हणून त्यांनी गंथालय समृध्द करण्याला प्राधान्य
दिले. या ग्रंथालयात वाड;मयीन आणि चौसष्ट विषयावरील मासिके येत असतं. हे सर्व
ग्रंथ, मासिकं आणि नियत कालीकं निद्यार्थी आणि संशोधिन करणारे प्राध्यापक यांना
उपयुक्त ठरत असतं. या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी खेळ आणि
व्यायाम याकडे खास लक्ष पुरविले जाई. विद्यार्थ्यांच्या शास्त्रीय आणि बौध्दिक
विकासाकडेही लक्ष दिले जाई. विद्यार्थ्यात शास्त्रीय (विज्ञान) विषयाची आवड
निर्माण करण्यासाठी तांत्रिक, औद्योगिक आणि संशोधन स्थळांच्या सहलींचे आयोजन
करण्यात येत असे. वादविवाद, वाड;मय आणि सायन्स अशी मंडळं स्थापन करण्यात आली होती.
या सर्वांचा फायदा बहुतेक विद्यार्थी घेत असतं. हे कॉलेज हैदराबाद संस्थानात आणि
औरंगबाद शहरासह मराठवाडयासाठी ललामभूत करण्याचा सोसायटीचा मानस बाबासाहेबांनी
व्यक्त केला होता. हे काम पुढील काळात नक्कीच झाले. मिलिंद तेव्हा मराठवाडयाचे
केब्रीज होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना
औरंगाबादमध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन द्यावयाचे होतेच त्याशिवाय येथील
विद्यार्थी बहुश्रुत असला पाहिजे., या वरही त्यांचा भर असे. विद्यार्थ्यानी
निटनिटके कपडे घालावेत. प्राध्यापकांनी कोट-टाय अर्थात सुटा-बुटातच कॉलेजमध्ये आले
पाहिजे. कपडयांपासून दिसण्यापर्यंत नीटनिटकेपणावर बाबासाहेबांचा भर होता.
बाबासाहेबांना नव्या पिढीत आंतरबाह्य बद्ल घडवून आणावयाचा होता. म्हणून बाबासाहेब
जेव्हा-जेव्हा औंरंगाबाद येथे येत असतं तेव्हा प्राध्यापकांचे अध्यापन वर्गावर
जाऊन पाहत असतं, त्यांना मार्गदर्शन करीत असतं. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांनाही
ते मार्गदर्शन करीत असतं. प्राध्यापक-विद्यार्थी काय आणि किती वाचतात यावर लक्ष
ठेवण्यास प्राचार्यांना सांगत असतं. त्यामुळेच बाबासाहेबांबात-प्राध्यापक
विद्यार्थ्यांच्या मनात आदरयुक्त भीती
होती. गरजेनुसार, काळानुसार वेगवेगळया विषयांचा स्वीकार या महाविद्यालयाने केला
होता. उच्च शिक्षित, विद्वान प्राध्यापक निष्ठेने अध्यापनाचे कार्य करीत होते.
त्यामुळं विद्यापीठ परीक्षांचा निकाल
उत्तम प्रकारे लागत होता. अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीतही येत हेाते. अनेक
विद्यार्थी बहुतेक विषयात प्राविण्यासह उत्तीर्ण होत होते. विद्यार्थ्याने केवळ
उत्तीर्ण होऊ नये तर गुणवत्ता राखली पाहिजे असा बाबासाहेबांचा अग्रह असे.
या मिलिंद महाविद्यालयाने हजारो
प्राध्यापक, शिक्षक तर दिलेच. त्या शिवाय डॉक्टर, इंजिनिअर, प्रशासनातील उच्च
पदस्थ अधिकारी, अर्थ तज्ज्ञ, शिक्षण तज्ज्ञ, समाज शास्त्रज्ञ, तत्ववेत्ते,
साहित्यिक, विचारवंत, राजकारणी, मंत्री, समाजसुधारक, सामाजिक चळवळीतील, किती तरी
कार्यकर्ते, कला,क्रीडा, सांस्कृती अशा जीवनाच्या सर्वच क्षेत्राला व्यापून
टाकणारे किती तरी गुणीजन या नागसेनवनाने देशाला आणि महाराष्ट्राला दिली. त्याची
यादी किती तरी मोठी होईल. एवढेच नव्हे तर दलित साहित्य, दलित रंगभूमी आणि अनेक
वैचारिक-सामाजिक चळवळीचा उगमही याच नागसेनवन परिसरात झाला आहे.
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र
प्रसाद यांच्या हस्ते मिलिंद महाविद्यालयाच्या भूमीपूजनाचा कोणशिला समारंभ 1 सप्टेंबर 1951 रोजी झाला.
डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी बाबासाहेबांच्या विद्वत्तेचा, राजेघटनेच्या निर्मीतीत
बाबासाहेबांनी दिलेल्या योगदानाचा आणि दलितांच्या शिक्षणासाठी घेत असलेल्या
कष्टाचा गौरव केला. यावेळी बाबासाहेबांनी अतिशय भावना निवेषपणे म्हटले होते, ‘‘शिक्षण
प्रसाराच्या कार्यासाठी काही तरी करावे हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते. माझे
ते स्वप्न मी सत्यसृष्टीत आणू शकलो याचा माला आनंद होत आहे. ’’ त्यांच्या शैक्षणिक
प्रसाराच्या कार्यातील आनंदामुळे भारतातील लाखो दलितांच्या जीवनात निर्माण झालेला
आंनद. त्यांच्या जीवनात पडलेला ज्ञानाचा प्रकाश, म्हणजे निष्णात डॉक्टराने
भारताच्या सामाजिक दुखण्यावर केलेला उपाय होय.
औरंगाबाद बाबत बाबासाहेबांना विषेश
आकर्षण वाटत असे.मिलिंदच्या नागसेन वनाचा परिसर अत्यंत सुशोभित करण्यासाठी त्यांची
धडपड लाचलेली असे. बाबासाहेबांनी भेटीस येणाऱ्या लोकांना एक झाड लावण्याची सक्ती
केली होती. तसेच स्वत:च्या देखरेखीखाली
त्यांनी विविध प्रकारची शेकडो झाडे लावली होती.मिलिंद कॉलेजच्या परिसरात
बुध्दविहार, स्टॉफ क्वार्टर्स, गेस्ट होऊस, समृध्द वाचनालय, क्रीडांगण तसेच मिलिंद कॉलेच्या इमारतीसमोर उंच आणि भव्य
टॉवर बांधून त्यावर मोठे घडयाळ बसवावे अशी त्यांची कल्पना हेाती. यापैकी काही
कल्पनांना मूर्त स्वरुप आले. तर काहींना येऊ शकले नाही.
औरंगाबादच्या नागसेनवन परिसराला लागून
बाबासाहेबांना बंगला बांधावयाचा होता. आणि उर्वरीत आयुष्य औरंगाबाद येथे व्यतीत
करावयाची मनिषा होती. त्यांना त्या बंगल्या शेजारी अनाथ आश्रम उघडावयाचा हेाता.
कारण अनाथी सेवा करण्यात त्यांना वेगळाच आनंद मिळत असे. ते नेहमी म्हणत ‘‘अनाथ,
गरीब निराधार,कुमारी माताने टाकलेले मुलं आश्रमात ठेवून त्यांची देखभाल करण्याची
माझी तीव्र मनिषा आहे. ’’
मराठवाडा अत्यंत मागसलेला असल्याने
त्यातील अस्पृश्यांचे हाल विचारायला नको. म्हणून जोपर्यंत त्या या भागाचा विकास
होत नाही तोपर्यंत अस्पृश्यांचाही विकास होणार नाही. त्यामुळे मराठवाडयाचा विकास
झाला पाहिजे. म्हणून त्यांनी मराठवाडयांचया विकासाच्या अनेक योजना आखल्या हेात्या
. त्यासाठी ते प्रयत्नशीलही होते. मराठवाडयासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे,
औरंगाबाद-पुणे रहदारीने जोडण्यासाठी कायगाव टोक येथे गोदावरी नदीवर पुल बांधावा ,
व्यापारवृध्दी आणि प्रवासासाठी मनमाड-औरंगाबाद रेल्वे लाईनचे ब्रॉडगेज करावे, औरंगाबादला
विमानतळ करावे, मुंबईला जाण्यासाठी मनमाड-नाशिक हा लांब वळसा असलेला रस्ता आहे.
त्यापेक्षा संगमनेर मार्गे जवळचा रस्ता (short cut Road) करण्यात यावा,
औरंगाबादशहराचे ‘पुष्पनगर’ असे नामकरण करावे, तसेच देशातील मजुरांच्या सहभागाने
सहकारी कापड गिरणी काढावी, औरंगाबाद येथे नभोवाणी केंद्र सुरु करण्यात यावे,
आरोग्यविषयक सोईं असाव्यात या आणि इतर अनेक विकास कामांचा बाबासाहेबांनी सविस्तर
आराखडा त्यांनी तयार केला होता. या निरनिराळया योजनांच्या सिध्दीसाठी राज्याच्या
आणि केंद्राच्या अधिकाऱ्यांच्या , मंत्र्यांच्यापातळीवर अनेक पत्रे पाठवून, भेटी
घेवून, पाठपुरावा केला होता. त्यांच्या काळात या योजना साकार झाल्या नाहीत. पण
त्यांच्या पश्चात मात्र या सर्व गोष्टी घडल्या . आता मराठवाडयाला एक नवे रूप, नवा
चेहरा, नवी ओळख मिळाली आहे. मराठवाडयाच्या सर्वांगिन विकासाची दार खुली होत आहेत.
मराठवाडयाची अस्मिता, मराठवाडयाचे सामर्थ्य, राष्ट्र उभारणीतील बाबासाहेबांचे
कार्य हे देशाच्या नकाशावर प्रथमत: च उमटले. त्यातही मराठवाडयात सामाजिक आणि
शैक्षणिक प्रगतीची मूहर्त मेढ रोवण्याचे सर्व श्रेय महामानव भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांनाच द्यावे लागेल, यात तीळमात्र शंका नसावी.
****
Comments
Post a Comment