अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांतील नायक



अण्णाभाऊ साठे यांची आज ९५ वी जयंती आहे. अण्णाभाऊंनी आपल्या साहित्य आणि शाहिरीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं मोठ काम केलं आहे. अण्णाभाऊ यांनी तीसपेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या. अण्णाभाऊ साठे यांनी १९४२ मध्ये ‘वारणेच्या खोऱ्यात’ ही पहिली कादंबरी लिहून आपल्या कादंबरी लेखनाची जोरकस सुरवात केली. पुढे ते सातत्याने लिहित राहिले. अण्णाभाऊ जातीय, वर्गीय, हितसंबंधाच्या पूर्णतः विरोधात होते. त्यांनी बुद्धिवाद, समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुता या विचारधारेवर आधारित आपला वाड़मयीन दृष्टीकोन विकसित केला. समाजातील अन्याय, शोषण, विषमता, उच-निचता, उपेक्षितांची पिळवणूक, स्त्रियांची केली जाणारी पिळवणूक या आणि समक्ष विषयांचा आपल्या लेखनातून सातत्याने विरोध केला. एकीकडे समाजवादी, कम्युनिस्ट विचारांची कास धरत दुसऱ्या बाजूने महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना समोर ठेऊन दलित शोषितांची प्रश्न जगाच्या समोर आपल्या साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्यांच्या कादंबऱ्यांचा विचार करताना त्या मनोरंजनाबरोबरच समाजचं वास्तवही प्रखरपणे मांडतातच त्याचबरोबर माणसातील चांगल्या वाईट गोष्टींचे, विकारांचे दर्शनही घडवतात.
अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांचा विचार करताना प्रामुख्याने त्यांच्या कादंबऱ्यांचे चार प्रकारात वर्गीकरण करता येईल. त्यात प्रामुख्याने पराक्रमावर आधारित, स्त्री प्रश्नांशी संबंधित, प्रेम किंवा शृंगाराशी संबंधित आणि ग्रामीण जीवन व्यवहाराशी संबंधित असे प्रकार करता येतील. पराक्रमाशी संबंधित त्यांच्या कादंबऱ्यामध्ये ‘वारणेच्या खोऱ्यात’ नंतर तीच कादंबरी ‘मंगला’ या नावानेही प्रसिद्ध झाली. फकीरा, वारणेचा वाघ, मास्तर आणि अग्निदिव्य या कादंबऱ्यांचा समावेश करता येईल. अण्णाभाऊंच्या पराक्रमाशी संबंधित कादंबऱ्यांतून उपेक्षितांच्या मनगटातील बळाचे दर्शन घडते. देशासाठी प्रसंगी वाट्टेल ती किंमत देण्याची तयारी दर्शविणारे आणि बदल्याच्या धगधगत्या वाटेवर चालत व्यवस्थेला नामोहरण करणारे नायक त्यांच्या या कादंबऱ्यातून दिसून येतात.
वारणेच्या खोऱ्यात ही कादंबरी म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत काम करताना स्वातंत्र्य वीरांना कोणकोणत्या अग्नीदिव्यातून जावे लागत असे, याचे मर्मग्राही चित्रण करणारी ही कादंबरी होय. तर फकिरा मध्ये अण्णाभाऊंनी उपेक्षितांच्या अंतरंगातील लढाऊपणा, बंडखोरी, क्रांतिकारकता, प्रसंगी जीवाला जीव देण्याची हिंमत, त्यांचा जोश, त्यांची हट्टवादी वृत्ती, पिळदार, अहंकारी मने, करारी वृत्ती याचे जीवनाच्या सर्व अंगांना व्यापून टाकणारे चित्रण फकिरा कादंबरीतून मांडले आहे, तर वारणेच्या वाघ या कादंबरीतून ब्रिटीशांच्या अरेरावी, गुलामगिरी, दडपशाही विरुद्ध बंद पुकारणाऱ्या एका क्रांतिकारकाची शौर्य गाथा जगासमोर आणली आहे. ही कादंबरी म्हणजे नितीसंपन्न धैर्याची, स्वाभिमान, इमान, कर्तृत्वाची, आत्मविश्वासाची, महाराष्ट्रातील जिद्दीची, अस्मिता आणि स्वातंत्र्यपूजक वृत्तीची गौरवगाथा होयं. एवढेचं नव्हे तर ब्रिटिशांनी गुन्हेगार ठरविलेल्या भटक्या समाजातील लोकनायकाची ही चित्रकथाही म्हणता येईल. तर अग्निदिव्य ही कादंबरी शिवकालातील नायक प्रधान कादंबरी आहे.
अण्णाभाऊंनी सामान्य जनतेतील पराक्रमी पुरुषांच्या वीरकथा अतिशय विलोभनीय पद्धतीने आपल्या पहिल्या पाच कादंबऱ्यांमधून मांडल्या आहेत. खर पाहिलं तर बंडखोरी आणि क्रांतिपूजा हे अण्णाभाऊंच्या विचारांची मुलभूत बैठक आहे. म्हणून त्यांचा नायक बंडखोर, क्रांतिकारक, अन्यायाला समोरं जाणारा, प्रसंगी अन्याय करणाऱ्यांना जाब विचारून त्याचा न्याय निवाडाही स्वतःच करणारा असा आहे. त्यांच्या या कादंबऱ्यांतून संघर्षचे दर्शन तर होतेच त्याचबरोबर वाचकांची उत्कंठा वाढवत जात अप्रतिम अशा भाषेचं, फटकेबाज संवादाच, इरसाल पात्रांच आणि श्वास रोखायला लावणाऱ्या प्रसंगाचही दर्शन घडतं. त्यांच्या या कादंबऱ्या जशा नायक प्रधान आहेत. तशाच त्या चरित्र प्रधान आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांचं अधिक विश्लेषण करावयाच झालं तर या कादंबऱ्या घटनाप्रधान, नेतृत्वप्रधान, समाजप्रधान, न्यायाच्या पाठीराख्याचे चित्रण, नितीचं रक्षण करणाऱ्यांचे चित्रण तर आहेच त्याचबरोबर त्यांच्या कादंबऱ्यातील नायक प्रसंगी हिंसक होत असले तरी अकारण हिंसा त्यांच्या हातून होत नाही. त्यांच्या हिंसे मागेही कारणांचा धांडोळा असतो. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या भावनाप्रधान तर आहेतच त्याचबरोबर त्यांच्या कादंबऱ्यातील नायक युद्ध कुशलही आहेत. त्यांचे नायक प्रचंड धाडशी तर आहेतच पण स्वतःची अस्मिता टिकविण्यासाठी प्रसंगी अपमान करणाऱ्याचा नायनाट करणारेही आहेत. अण्णाभाऊंचे नायक सामान्य माणसं असले तरी असामान्य असं कर्तृत्व त्यांच्या अंगी आहे. या सामान्य नायकांना विश्वासघात आवडत नाही. संघर्ष हा त्यांच्या दररोजच्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे. एवढंच काय संघर्षाचं जणू त्यांना वेडच लागलंय असंही वाटायला लागतं. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यातील नायकांमध्ये प्रचंड आत्मविश्वास तर आहेच त्याचबरोबर अचल, तत्वनिष्ठाही आहे. त्यांचे नायक न्यायप्रिय तर आहेतच त्याचबरोबर त्यांच्या नायकांच्या मनात नवा मुक्त समाज निर्माण करण्याची जिद्दही आहे. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यातील नायकांच्या धाडसामागे सामाजिक भल्याचे सूत्र तर आहेच त्याचबरोबर समाजातील उच्च-निचता, जातीयवाद, ब्रिटीशांची दडपशाही, सावकारांची शोषक सावकारी आणि जाती धर्माच्या नावावर समाजाला छळणाऱ्या विशिष्ट वर्गाविरुद्ध दंड थोपटून उभं राहण्याची जिगरही आहे.
अण्णाभाऊंच्या स्त्रीप्रधान कादंबऱ्यांमध्ये प्रामुख्याने चित्रा, वैजयंता, चंदन, चिखलातील कमळ, फुलपाखरू, टिळा लावते मी रक्ताचा, आवडी, रत्ना या आठ कादंबऱ्यांचा समावेश करता येईल. अण्णाभाऊंच्या स्त्रीप्रधान कादंबऱ्यांचा विषय प्रामुख्याने स्त्रियांच्या शीलांचे पावित्र्य, त्यावर खिळणाऱ्या वासनामयी नजरा, त्यांचे चारित्र्यावर पडणारे डाके, शीलाच्या रक्षणासाठी चालणारी स्त्रियांची धडपड, प्रसंगी वाघिणीचे रूप धारण करून चालून येणाऱ्यांच्या नरडीचा घोट घेणाऱ्या वाघिणी, स्त्रियांना त्यांच्या कुटुंबातील नातेवाईकांकडून मिळणारी वागणूक, त्यांचा केला जाणारा विश्वासघात, कधी प्रेमाच्या तर कधी वासनेच्या हेतूसाठी नादी लावून त्यांच्या आयुष्याचे मातेरे करणाऱ्या समाजातील विविध घटकांच मर्मग्राही दर्शन घडतं.
अण्णाभाऊंच्या प्रेम किंवा शृंगार कथाप्रधान कादंबऱ्यांमध्ये त्यांच्यातील कादंबरीकारांच अगदी वेगळच दर्शन घडतं. असं म्हंटल जातं प्रेम ही मानवी जीवनाचं अविभाज्य अंग असतं, तर साहित्य हे सामाजिक जीवनाचा आरसा असतो. या अर्थानं कादंबरी या साहित्य प्रकारचा विचार करता कादंबरी हे जीवन कथेच ललित प्रांगण आहे, असं म्हणावं लागेल. त्यामुळचं की काय जगातील कुठल्याही भाषेत प्रेमकथा नाहीत असं म्हणता येत नाही. भारतीय भाषांमध्ये पद्यापासून गद्यापर्यंत सगळ्याच साहित्य प्रकारात प्रेमकथा ओसंडून वाहत आल्या आहेत. त्यात अण्णाभाऊंच्या प्रेमकथांच वैशिष्ट्य अगदी खास म्हणावं लागेल.
अण्णाभाऊंनी लिहिलेल्या अलगुज, रानगंगा, संघर्ष, अहंकार, रूप, आघात, गुलाम, मयुरा आणि मूर्ती या कादंबऱ्यांचा प्रामुख्याने प्रेम शृंगार कथांमध्ये समावेश करता येईल.त्यांच्या या कादंबऱ्या कधी वास्तवदर्शी कधी जीवनदर्शी कधी लढाऊ तर कधी स्वच्छंदशील अशा विविध पातळ्यावर घेऊन जातात. त्यांची अलगुज ही कादंबरी १९६६ मध्ये प्रसिद्ध झाली. तिच्या तीन आवृत्त्या निघाल्या. अण्णाभाऊंची ही क्रमाने पाचवी कादंबरी आणि पहिली प्रेमकथा म्हणता येईल. घरंदाज शेतकरी गणू मोहिते, त्यांची एकुलती एक लाडकी मुलगी रंगी आणि त्याचा घरगडी बापू खारवते यांची ही प्रेमकथा आहे. रानगंगा कादंबरी म्हणजे वैराच्या अग्नी शिखेवर उमललेलं प्रेमफुल होयं. या कादंबरीत चंदर आणि प्रभा यांच्या प्रेमाची कथा आहे. संघर्ष ही कादंबरी सुलभा व आनंदाची दुर्देवी प्रेमकथा आहे तर संघर्ष कादंबरीत अण्णाभाऊंच्या कल्पना विश्वातील एक भयंकर संघर्ष त्यांनी चितारला आहे. अहंकार कादंबरीत अतिरिक्त अहंकारामध्ये स्त्रीच्या जीवनात कशा प्रकारे दयनीय येते, त्यातून त्या स्त्रीचे जीवनपुष्प कसे कोमेजून जाते, याचे दर्शन घडविले आहे. अण्णाभाऊंच्या रूपा, आग या कादंबऱ्या मनाचा फारसा ठाव घेत नसल्या तरी त्यांच्या लेखनातील ग्रामीण शैलीतील मांडणीची सुलभता व्यक्त करणाऱ्या या कादंबऱ्या आहेत. आघात या कादंबरीचे वाचन करताना अण्णाभाऊंच्या कादंबरी लेखनाचा वेगळाच पैलू दृष्टीस पडतो. अण्णाभाऊंचे बहुतांश जीवन मुंबईत गेल्याने त्यांनी कामगारांचे जीवन जवळून पहिले होते एवढेचं नव्हे तर ते अनुभवलेसुद्धा होते. त्यामुळे ‘आघात’ कादंबरीमध्ये त्यांनी सर्वसाधारण कामगारांच्या वस्तीतील माणसांची कथा मनाचा ठाव घेणाऱ्या पद्धतीने मांडली आहे.
ग्रामीण जीवन व्यवहार दर्शन घडविणाऱ्या अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यामध्ये माकडीचा माळ, वैर, डोळे मोडीत राधा चाले, रानबोका, कुरूप, पाझर, केवड्याचं कणीस या कादंबऱ्यांचा समावेश होतो. अण्णाभाऊंच्या ग्रामीण जीवनाशी संबंधित कादंबऱ्या म्हणजे ग्रामीण भागातील जिवंत रसरसलेल्या अनुभवाची शिदोरी होय. त्यांचे हे अनुभव अतिशय समृद्ध आणि अव्वल दर्जाचे आहेत. ग्रामीण अनुभवाला प्रतिभेची जोड मिळाली तर त्यातून अतिशय उत्तम असं साहित्य कशा प्रकारे निर्माण होऊ शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अण्णाभाऊंच्या या कादंबऱ्या होतं. मराठी साहित्य सृष्टीला संपूर्णपणे नवीन असे विषय, विषयानुरूप सखोल आशय, मांडणीचा आशयानुरूप साक्षेपी सहज सुलभ गतिमान अविष्कार, जिवंत व्यक्तीचित्रांचे हृदयस्पर्शी दर्शन, व्यक्तींच्या आणि समूहांच्या भावभावनांच्या आंदोलनाचा रंगतदार मेळा, समाजजीवनातील वृत्ती, प्रवृत्ती, कृतींचे, त्यामागील धारणांचे वास्तव, तरलपणे मांडत वाचकाला वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारे आहेत. त्यांची मांडणी वाचकाला खिळवून ठेवत त्यांच्या मनामध्ये नाद, लय, तोल, ताल आणि लोकवाड़मयाच्या गाभ्यातील चिरंजीविता व्यक्त करते. अशा प्रसंगी त्यांची भाषाशैली एका विशिष्ट गुणवैशिष्ट्यांमुळे बहरत जाते आणि त्यामळं कादंबरीचा वाचक कादंबरीच्या नायक, नायिका आणि पात्रांमध्ये एकरूप होऊन जातो. अण्णाभाऊंच्या कादंबरी लेखनाचा विशेष पैलू म्हणजे त्यांच्या कादंबऱ्या वाचताना त्यांच्या कादंबरी मांडणीमध्ये  नैसर्गिक सहज भाव असल्याचे जाणवते. एकाच विषयांमध्ये अनेक विषयांची संदर्भ बहुलता त्यांच्या कादंबऱ्यांत आढळते.
अण्णाभाऊंच्या कादंबरी लेखनाचा सगळा प्रवास आंतरिक तळमळीतून, त्यांनी स्वीकारलेल्या तत्वज्ञानातून, अनुभवलेल्या, पाहिलेल्या समाज आणि निसर्गाच्या अवलोकनातून व्यक्त झाला आहे. त्यांच्या कादंबरी लेखनाला कला मुल्यांचा जसा वेध आहे, तसाच माणसाच्या माणूसपणाचा शोध घेत त्याला माणूस म्हणून कसं जगता येईल, उभं कसं करता येईल यासाठी त्याच्या बाजुणे उभं राहून त्याला साथ संगत करण्याचा विचारही आहे. त्यांचे कादंबरी लेखन रंजन मूल्यांच्या बाजूने अधिक झुकले असले तरी त्यातून त्या काळातील समाजव्यवस्थेचं कटुसत्य सहजपणे ते व्यक्त करतात. त्यांनी आपल्या कादंबरीतून समाज रचना बदलू पाहणाऱ्या नायकांना व्यक्त होताना दाखविले. अण्णाभाऊंनी आपल्या साहित्य कृतीतून दिन-दुबळ्या समाजाच्या शब्दाला मोल मिळवून दिले आहे. म्हणून त्यांच्या साहित्यातील शब्द अंगार होऊन फुलतात, हुंकार देतात त्यामुळ त्यांचे नायक सामन्य वाचकांचे नायक असतात.
०००००
यशवंत  भंडारे,
उपसंचालक (माहिती),

पुणे विभाग, पुणे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

बाबासाहेबांचा मराठवाड्याशी असलेला स्नेहबंध

संवेदनशील मनाचे गझल सम्राट सुरेश भट

प्रबुद्ध भारत हे नाव का स्वीकारले ?