कलामांचा संवाद विद्यार्थ्यांशी....!
ही आठवण २००२ मधील. डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे १७ जुलै २००२ रोजी भारताचे अकरावे राष्ट्रपती झाल्यानंतर प्रथमच मुंबई भेटीस आले होते. या भेटीत आपणास शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधावयाचा आहे, असा संदेशही त्यांनी राज्य शासनाला कळवला होता. त्यानुसार मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात त्यांचा शालेय विद्यार्थ्यांशी संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मी मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क विभागात काम करीत असे. माझ्याकडे शालेय शिक्षण विभागाचं प्रसिद्धीचं काम होतं. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या या संवाद कार्यक्रमास उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्यामुळं मी षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच तासभर अगोदर पोहचलो होतो.
अतिमहत्वाच्या व्यक्ती कार्यक्रमस्थळी जात असताना त्यांच्यासाठी वेगळ्या रस्त्याची व्यवस्था करण्यात आलेली असते. त्यामुळं कलाम व्यासपीठावर सभागृहातून न जाता वेगळ्या रस्त्याने उपस्थित राहतील असं सगळ्यांना वाटत होतं. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचा किलबिलाट नेहमी प्रमाणे सुरु होता. इतक्यात महामहीम राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचं सभागृहात आगमन होतेय, अशी उद् घोषणा झाली. सगळ्यांच्या नजरा सभागृहातील व्यासपीठाकडं केंद्रीत झाल्या असताना डॉ. कलाम यांचं सभागृहात सर्वसामन्यांसाठीच्या आम प्रवेशद्वारातून आगमन झालं आणि सगळ्यांच्या नजरा त्या दिशेने वळल्या. विद्यार्थ्यांसह सगळे उपस्थित उभे राहुन त्यांच्याकडं कुतूहलानं पाहत असताना सभागृहात येताच त्यांनी दोन्ही बाजुंनी उभे असलेल्या विद्यार्थ्यांशी हस्तांदोलन करत संवाद साधण्यास सुरुवात केली. त्याच सभागृहात मी ही उभा होतो. त्यांनी स्वत:हून माझा हात हातात घेतला आणि माझे नाव, काय काम करता याबद्दल विचारणा केली. माझा परिचय आणि इतर माहिती देताच पाठीवरून हात फिरवत ते म्हणाले, 'व्हेरी गुड, गो अहेड' आणि पुन्हा हात हातात घेऊन हस्तांदोलन करून ते समोरच्या विद्यार्थ्याकडे वळले. तो दिवस माझ्या कायम स्मरणात राहीला. त्यांचे ते शब्द, त्यांच्या त्या हाताचा स्पर्श, त्यांनी पाठीवरून फिरवलेल्या हाताचा मायेचा स्पर्श आणि त्या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद, हे सगळं सगळं अनेक दिवस माझ्या स्मृती पटलावर तरळत होतं.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं कर्तुत्त्व, त्यांनी केलेली कामं, त्यांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांनी भुषविलेली पदं यामुळं त्यांच्याबाबत प्रचंड आदर आणि आदरयुक्त भिती अशा संमिश्र स्वरूपाचे विलक्षण भाव मनात निर्माण झाले होते. त्याचं वागणं, बोलणं घरातील वडिलधाऱ्या माणसासारख, एखाद्या प्रसंगी घरातील आजोबानं प्रेमाणं चार युक्तीच्या गोष्टी सांगाव्यात अशा स्वरूपाच्या वाटून गेल्या. हल्ली अनेक घरातून आजी-आजोबा दिसत नसल्यानं त्यांचा सहवास आणि त्यांच्या अनुभवाची शिदोरीही अनेक मुलांच्या वाट्याला येत नाही, अशांसाठी त्यांचा संवाद म्हणजे एक मोठी पर्वणीच होती.
कुठल्याही प्रकारचा अहमपणा, पदाची प्रतिष्ठा, स्वतः बदल दुराभिमान याबाबत कुठलाही लवलेश संबंध कार्यक्रमात, आणि त्यांच्या एकाही शब्दातून किंवा शारिरीक भावभावनातून व्यक्त होताना दिसत नव्हता. एवढेच नव्हे तर विद्यार्थी हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा आणि आत्मीयतेचा विषय असावा, असंही वाटत होतं. एवढंच नव्हे तर विद्यार्थी म्हणजे त्यांचा विक पॉइंट असावा, असंही जाणवत होतं.
कोणतीही व्यक्ती जेंव्हा आपल्या कार्य कर्तृत्ववानं मोठी होते तेंव्हा ती आपल्यासारख्याच कर्तृत्ववान, ज्ञानी किंवा आपल्या वयातील समकक्ष लोकांसोबत जास्तीत जास्त वेळ जावा यासाठी प्रयत्न करताना दिसते. परंतु डॉ.एपीजे अब्दुल कलाम मात्र त्याला अपवादच होते. दिग्गजांपेक्षा, मोठ्या व्यक्तींपेक्षा विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यावर त्यांनी कायमच भर दिला. त्यातही विज्ञान, तंत्रज्ञान आणि भारताचा सर्वकष विकास याबाबत लोकांशी अधिक संवाद साधण्यात त्यांचा जास्त रस असे. याही कार्यक्रमात त्यांनी भारताच्या सर्वांगीण विकासाचं, भारताला महासत्ता बनवण्यासाठी करावयाच्या कामांचं आणि भारताला महासत्ता बनविण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांचाही कसा वाटा असू शकेल, याचा आराखडाच जणू त्यांनी या संवाद कार्यक्रमातून स्पष्ट केला. त्याशिवाय विद्यार्थ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची अतिशय नेमकी उत्तरं देऊन त्यांना प्रोत्साहितही केलं.
डॉ. कलाम यांना संवादाच शास्त्र चांगलाच अवगत होतं असं वाटायला लागतं. विद्यार्थ्यांचं भावविश्व लक्षात घेऊन त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांच्या पातळीवर जाऊन त्यांनी दिलेली उत्तरं नंतरच्या त्यांच्या अनेक विद्यार्थी संवादाच्या कार्यक्रमातून व्यक्त झालेली दिसून येतात. प्रेरणा देणं, प्रोत्साहन देणं, दिशा दाखवणं, उभारी देणं, स्वप्न पाहण्यास सांगून ती स्वप्न पूर्ण करण्याचा गुरुमंत्र देणं, विद्यार्थ्यांच्या इवल्याश्या पंखांना बळ देऊन त्यांना आकाशात उंचच उंच भरारी घेण्याची उर्मी देणं, अशी एक न अनेक स्पंदनं विद्यार्थ्यांच्या मनामनात निर्माण करण्याचं काम त्यांनी त्यांच्या या संवाद कार्यक्रमात केल्याचं अजूनही आठवतं.
एका विद्यार्थ्यानं त्यांना विचारलं, भारतात आदर्श घ्यावी अशी माणसं सध्या राहिलेली नाहीत, राजकारण गढुळ झालय, भ्रष्टाचार वाढलाय या परिस्थितीत आम्ही काय करावं? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर भारताच्या सध्याच्या स्थितीत प्रत्येकाला मार्गदर्शक ठरावं असचं होतं. ते म्हणाले होते, 'देशात सध्या आठ ते दहा टक्के लोक प्रत्यक्ष काम करतात, तेच लोक देशही चालवतात. परंतु या देशात खूप मोठी क्षमता (पोटेंशीयल) आहे. देशातील विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण, योग्य सुविधा, योग्य मार्गदर्शन, योग्य वातावरण, योग्य संस्कार मिळाल्यास त्यांच्यामध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण होऊन या देशाला या परिस्थितीतून ते बाहेर काढू शकतील. ही नवी पिढी आपल्या योग्य संस्कारक्षम संवादातून भ्रष्टाचाराला घालवू शकेल. यात माता, पिता आणि शिक्षक यांनी महत्वाची भूमिका बजवावी. आपापल्या जबाबदाऱ्या ओळखून प्रत्येकानं काम केलं पाहिजे. एखाद्या राष्ट्रास भ्रष्टाचार मुक्त करावायचे असल्यास त्या राष्ट्रातील सर्व नागरिकांची मनं शुद्ध व्हावीत अशी इच्छा असेल तर हे काम करण्याची भूमिका या तीन लोकांनी पार पाडली पाहिजेत, असंही ते म्हणाले.
एका विद्यार्थ्यानं त्यांना विचारलं, मला शास्त्रज्ञ व्हावयाच आहे, मी काय करू? त्यावर ते म्हणाले, 'आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत कारण प्रश्न पडले तरच आपण त्या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न करतो. आपली दृष्टी शोधक असली पाहिजे. आपण सातत्यानं इतरांपेक्षा वेगळा विचार केला पाहिजे. केवळ विचार करून न थांबता तो विचार कृतीत उतरविण्याचं धाडसही बाळगलं पाहिजे. शोध लावण्याचं, वेगळ्या वाटेनं जाण्याचं, अशक्याला कवेत घेण्याचं, अडचणीवर मात करण्याचं आणि विजयी होण्याचं साहस बाळगलं पाहिजे. आपण या अत्युच्च गुणांना आत्मसात करून मार्गक्रमण केल्यास आपण नक्कीच संशोधक, वैज्ञानिक किंवा शास्त्रज्ञ होऊ शकतो.'
यशस्वी होण्यासाठी काय करावं असा प्रश्न एका विद्यार्थ्यांनं विचारला असता ते म्हणाले, 'तुमचे उद्दिष्ट तुम्ही ठरवायला हवे आणि ते उद्दिष्ट किंवा ते ध्येय प्राप्त करण्यासाठी तुम्ही तुमच्या ध्येयावर एकाग्र चित्तानं आणि सातत्यानं काम केलं पाहिजे, तर यश आपल्या पायाशी लोटांगण घालेल. आपण आज मेहनत घेतली, प्रयत्न केले, काही गोष्टींचा त्याग केला तरच भविष्यात आपल्या यशाला धुमारे फुटू शकतात आणि यश मिळण्यास अडचणी उरत नाहीत. यश म्हणजे आपण बाळगलेली स्वप्नं पूर्ण करणं होय. त्यामुळं मोठी स्वप्नं पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. स्वप्नं छोटी नसावीत तर स्वप्नं आकाशाएवढी असावीत. ज्यांच्या आयुष्यात कठीण प्रसंग येतात आणि जी त्या प्रसंगावर मात करतात त्यांनाच यशाचं माधुर्य चाखता येतं. आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगी डगमगून जाऊ नका. अवतीभवती पहा, आकाशाकडे पहा, आपण एकटे नाहीत साऱ्या विश्वात आपले मित्रच आहेत आणि जी स्वप्नं आपण पाहिली आहेत, जी कामं आपण करीत आहोत, त्या कामांसाठी आणि त्या स्वप्नांसाठी सर्वोत्कृष्ट जे असेल ते करण्याची जिद्द ठेवा.
आपली आणि आपल्या देशाची प्रगती व्हावी असं वाटत असेल तर सातत्यानं काम करा. चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा, नाउमेद होऊ नका, असाही संदेश त्यांनी आपल्या संवादातून दिला. राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या २००५ मध्ये औरंगाबाद येथील होली क्रॉस इंग्लिश स्कूलमध्ये झालेल्या विद्यार्थी संवाद कार्यक्रमासही उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी त्यांनी देश, देशाची प्रगती, विद्यार्थी आणि संस्कार या गोष्टींना दिलेलं महत्व त्यांच्या संवादातून व्यक्त होताना दिसलं. विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण, धर्म, अध्यात्म, आरोग्य, श्रद्धा अशा विविध विषयांवर ते संवाद साधताना श्रोत्यांच्या मनामध्ये विश्वासचं बीजारोपण करीत असतं. त्यांच्या बोलण्या, वागण्यातून देशाची प्रगती आणि देशाबाबतची चिंता व्यक्त होत असे. म्हणून डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे केवळ शास्त्रज्ञ, राष्ट्रपतीच होते असं नाहीतर त्यांनी देशाला विकासाचं आणि प्रगतीचं संवाद शास्त्र देऊन देशाला महासत्ता बनविण्याचं स्वप्न बाळणारं ते एक चालत बोलत व्यासपीठ होतं. त्यांचा संवाद म्हणजे विकासाचं संवादशास्त्र होतं. जनसंवादातून जनविकासाचा मंत्र सांगणारं ते एक लोकसंवादकही होते.
०००००
Comments
Post a Comment