भेटी लागे जीवा...!
बाळाला आईची
ओढ, पाडसाला गाईची ओढ, जशी असते तशीच ओढ वारकऱ्यांना पांडुरंगाच्या भेटीची लागली
असते. २०-२५ दिवस वारीतून चालत येऊन विठ्ठुरायाचं दर्शन घेण्यास असुसूल मन पंढरपूर
जसं जसं जवळ येऊ लागतं तेवढी पांडुरंगाच्या भेटीची तीव्रता वाढू लागते. संतापासून सामान्य
वारकऱ्यांनी विठ्ठलाला वेगवेगळया रूपात पाहिलं आहे. तो कधी त्यांचा जीवाभावाचा सखा
होतो, कधी श्रांतांची साऊली होतो, कधी दीनांची माऊली होतो, त्यामुळंच की काय
महाराष्ट्रातील कोट्यावधी जनतेचं विठ्ठलाशी अतूट नातं जडलं आहे. दु:खी मनातील
भावनांना वाट मोकळी करून देणारा तो वारकऱ्यांचा सखा, सोबती आहे. म्हणून वारकरी
अतिशय विश्वासानं विठ्ठलाशी संवाद साधत स्वतःच दुःख त्याला सांगून मनावरील भार कमी
करत असतात. त्याच्याशी हितगूज करत असतात.
पंढरीची वारी
आणि वारकऱ्यांचा समाज-व्यवहार हा अनेकांच्या जिज्ञासेचा, संशोधनाचा, अपार श्रद्धेचा
संशोधनाचा विषय होत आला आहे. म्हणून काहींना विठ्ठल ही ज्ञानमूर्ती वाटते. तर
काहींना ते ज्ञानरूप, तत्वरूप आणि भावरुपीही असल्याचं जाणवत. म्हणून तो अनेकांना
आपल्या प्रेमात पडताना दिसून येतो. त्याच्यावरील भक्तीत श्रद्धा असते पण
अंधश्रद्धा नसते. विठ्ठलानं माणसात देव पाहावयास सांगितलं, समानतेच्या धाग्यांची
विन अशा प्रकारे गुंफली की त्याच्या सानिध्यात येणारा गरीब-श्रीमत असा भेद करत
नाही, वारीत जाती पातीचा भेद मानत नाही. उच-निचतेचा लवलेशही मनात न ठेवता वारकरी
विठ्ठलमय होतो. म्हणूनच संतांनी म्हटलंय-
“पंढरीसी लोका
नाही अभिमान | पाया पडे जन एकमेका ||”
एवढच नव्हे तर त्यापुढंही जाऊन-
“विष्णुमय
जग वैष्णवांचा धर्म |
भेदाभेद
भ्रम अमंगल ||”
वारकऱ्यांच्या
भेटीतून त्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या भावभावनाचं स्वरूप अतिशय विलोभनीय असतं, याबाबत
संत तुकाराम यांनी म्हटलंय-
“निर्मळ चित्ते झाली नवनीते |
पाषाणा पाझर फुटती रे ||
वर्ण-अभिमान विसरली याती |
एक एका लागतील पायी रे ||
सद् विचार
आणि सद्आचाराच्या समचरणावर विश्वकल्याणासाठी पांडुरंग विटेवर उभा राहिला आहे. साने
गुरुजींनी त्यांच्या ‘चंद्रभागेच्या वाळवंटी’ या पुस्तकात विठोबाचं मर्मग्राही
वर्णन केलं आहे. ते म्हणतात, “पंढरपूरचा
विठोबा म्हणजे महाराष्ट्रीय जनसंघटनेचा मुका अध्यक्ष. हा बोलत नाही, चालत नाही पण
महाराष्ट्रीय जनविश्वात केवढा आत्मविश्वास निर्माण करतो. तेव्हा तो एकीकडे देव
असतो तर दुसरीकडे सखाही. संसारी पांडुरंगाच्या पायावर घालून सुखरूप होऊन परम कर्तव्य
धर्माच्या प्रपंचात जावं. यात जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याची केवढी मोठी भूमिका
साठवलेली आहे.” म्हणूनच संत तुकारामांनी
याबाबत खूप छान म्हटलंय-
जाऊ देवाचिया गावा |
देव देईल विसावा ||
देवा सांगो सुख दु:ख |
देव निवारील भूक ||
वारीत सहभागी
होणाऱ्या आणि पंढरपूरमध्ये पांडुरंग दर्शनास येणाऱ्या वारकऱ्यांकडे पाहिलं की
निरागसतेची प्रकर्षानं जाणीव होते. तसं पाहिलं तर प्रत्येकाचं जीवन आनंदानं
ओतप्रोत भरलेलं असतेच असं नाही. प्रत्येकाला केंव्हा न केव्हा प्रतिकूल परिस्थितीला,
अप्रिय प्रसंगांना सामोरे जावे लागतेच. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून जे
समर्थपणे उभे राहतात तेच आयुष्यात किमान यशस्वी होतात. प्रत्येकानं प्रतिकूल
परिस्थितीला अनुकूल समजून आणि प्रतिकूलतेला परिवर्तीत करून जीवन जगण्याची कला
आत्मसात केली पाहिजे. मला वाटतं वारकरी पांडुरंगाच्या दर्शनातून हाच संदेश घेऊन
जात असावेत. अस म्हंटल जात की, पंढरपूरचा पांडुरंग हे तत्वचितकांच, प्रज्ञावंतांच प्रेरणास्थान
आहे. काहीच असही म्हणनं आहे पांडुरंग हे मुळात भगवान बुद्ध आहेत. कोणी काहीही
म्हणो पण पांडुरंग कोट्यावधी भक्तांच्या प्रेमाचं अमोल श्रद्धास्थान आहे.
मी रविवारी
सकाळी पुण्याहून पंढरपूरकडे प्रस्थान केलं तेव्हा बालपणापासून पंढरपूर, चंद्रभागा,
संत, वारी, वारकरी यांच्या कुतूहलाची शिदोरी कशी असेल असं वाटत होतं. या सगळ्याचं
उत्तर पंढरपूरमध्ये प्रवेश करतानाच मिळू लागली. आळंदी, देहू येथून निघालेल्या ज्ञानेश्वर,
तुकाराम यांच्या दिंड्यांच स्वरूप डोळ्यात भरण्याची संधी पुण्यात मिळाली होती. पण या
दिंड्यांच पंढरपुरात प्रवेशताच स्वरूप पाहण्याची संधी मिळणं ही सुद्धा एक पर्वणी
असते, याची अनुभुतीही आली. रविवारी वारकऱ्यांचा भक्तीप्रवाह वारीच्या पुढं
पंढरपूरचा दिशेनं वाहू लागला होता. दुपारी एकच्या सुमारास श्री. संत नामदेव महराज
हे पांडुरंगाचे निमंत्रण घेऊन वाखरीत आले. त्यानंतर मानाच्या पालख्या पंढरीच्या
दिशेनं मार्गस्थ झाल्या. अग्रस्थानी संत नामदेवांची पालखी होती तर त्यामागं संत
मुक्ताबाई, संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ त्यानंतर दुपारी दोन वाजता संत
तुकाराम, त्यानंतर दुपारी तीन वाजता संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा
पंढरपूरच्या दिशेनं निघाला होता. वाखरी ते पंढरपूर हा रस्ता भक्तिमय झाला होता.
टाळ-मृदुंगाच्या गजरात अन् हरिनामाच्या जयघोषानं सारा परिसर दुमदुमून गेला होता.
पोलीसांनी या रस्त्यावर उजव्या बाजूनी पालख्या तर डाव्या बाजूनं वाहतुकीची
व्यवस्था केली होती. त्याच वाहतुकीतून माझं शासकीय वाहन हळूहळू पुढं सरकत होतं.
दुपारी
साडेचार वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबियांच
हेलिकॉप्टरनं पंढरपुरात आगमन झालं. शासकीय विश्रामगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांनी
पत्रकारांशी संवाद साधला. पंढरपूर शहरासह चंद्रभागेच्या विकासासाठी ९२ कोटी
रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. त्यातून शहरातील ड्रेनेज सिस्टीम विकसित
करून चंद्रभागा स्वच्छ ठेवण्यात येईल. शहरही कायमस्वरूपी स्वच्छ राहण्यास मदत
होईल. पंढरपूर शहर विकास आराखड्यास गती देऊन वारकऱ्यांच्या सोयीसाठी विविध कामं
केली जातील. त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. या कामासाठी केंद्र
सरकारकडे निधी मागण्याची गरज नाही. राज्य शासन त्यासाठी सक्षम आहे, असं त्यांनी
सांगितलं.
वारीसाठी पंढरपुरात
येणाऱ्या वारकऱ्यांच्या थांबण्याची व्यवस्था व्हावी यासाठी ६५ एकर जमिनीवर पालखी
तळ उभे केले आहेत. वारकऱ्यांच्या सोईसाठी यापुढेही असे अनेक तळ विकसित करण्यात
येतील. सध्या ३५ एकर जमीन अधिगृहित करण्याची तयारी सुरु आहे. त्यासाठी नगर पालिकेस
निधी कमी पडत असेल तर राज्य शासन तो निधी देईल. वारीसाठी किती लोक येतात यावरून
निधी न ठरवता त्याच्यासाठी कोणत्या सोई करता येतील याचा विचार करून हवा तेवढा निधी
देण्यात येईल. चंद्रभागेत वारकऱ्यांना स्नान करता यावे म्हणून केवळ तीन महिन्यात
बंधारा बांधून पाणी अडवल्याबाबत जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे आणि संबंधित
अधिकाऱ्यांचे कौतुकही त्यांनी केले. महाराष्ट्रातील नद्यांचे कारखान्यांमुळे १०
टक्के तर ८० टक्के प्रदुषण नागरी स्वरूपाचे म्हणजे शहरातील दुषित पाणी, कचरा
नद्यात टाकला जात असल्याने होत आहे. त्यामुळे नद्या प्रदुषण मुक्त करण्यासाठी
विशेष आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार चंद्रभागेसह इतर नद्या प्रदुषणमुक्त
करण्यात येतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पर्यावरण दिंडीचा समारोप करण्यात आला. त्याच्या
हस्ते वारीतील वारकऱ्यांचा, संयोजकांचा आणि ही वारी यशस्वी करणाऱ्यांचा सत्कार
करण्यात आला. वारीतील पर्यावरण विषयक जागृती करणाऱ्या कलावंतांच सादरीकरणही यावेळी
झालं. त्यानंतर मुख्यमंत्री टाळ गळ्यात अडकवून मृदुंगाच्या तालावर भक्तिमय झाले
होते. त्यांनतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पंचायत समितीच्या आवारात स्वच्छता
दिंडीचा समारोप झाला. राज्यातून स्वच्छता दिंडीत सहभागी झालेल्या कलावंतांनी विविध
कला प्रकारातून स्वच्छता संदेश कसा दिला याचं सादरीकरण यावेळी झालं. मुख्यमंत्री
फडणवीस यांनी सर्व कलावंतांच कौतुक करतानाच या कलावंतांनी स्वतःबरोबरच आपले गाव
स्वच्छ रहावे यासाठी प्रयत्न करावेत, असं
आवाहन केलं. गाव निर्मल झाल्यावर माणूस निर्मल होईल आणि एकदा माणूस निर्मल झाला तर
राज्य आणि देशही स्वच्छ होईल. गावात मी स्वतः बाहेर शौचास जाणार नाही, इतरानाही
जाऊ देणार नाही, असा प्रत्येकानं संकल्प केला पाहिजे.
पांडुरंगाच्या
शासकीय सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी रात्री एक वाजता आम्ही मंदिराच्या उत्तर
महाद्वाराजवळ पोहोचलो. अत्यंत चोख बंदोबस्त असल्यानं प्रवेश घेताना सर्व सोपस्कार
करून मंदिरात प्रवेश घेतला. रात्री १.३० ते १.४५ या कालवधीत मंदिराची स्वच्छता
करण्यात कर्मचारी मग्न होते. त्यातच दर्शन झालेल्या भक्तांना बाहेर काढण्यात येतं
होते. त्यांनतर रात्री १.४५ ते १.५५ यावेळेत एकाच वेळी पांडुरंग आणि रुक्मिणीची
पाद्य पूजा करण्यात आली. तर रात्री १.५५ ते २.२० यावेळेत मंदिर समितीचे सभापती तथा
जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सपत्नीक विठ्ठलाची पूजा केली. त्यांनतर मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी २.२० ते २.४० यावेळेत विठ्ठलाची मानाचे वारकरी यांच्यासह सपत्नीक
शासकीय महापूजा केली. रात्री २.४० ते ३ यावेळी मुख्यमंत्र्यांनी रुक्मिणीची महापूजा
केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता, महसूल मंत्री एकनाथ खडसे,
पालकमंत्री विजय देशमुख, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आणि मानाचे वारकरी
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रघोजी धांडे आणि त्यांच्या पत्नी संगीता
धांडे यांचा तुकाराम भवनात यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी
जिल्हाधिकारी मुंढे यांनी मान्यवरांचा सत्कार केला तर मुख्यमंत्र्यांनी मानाच्या
वारकऱ्यांचा सत्कार केला. त्यांना एसटीच्या मोफत प्रवासाचे प्रमाणपत्र दिले.
शेतकरी सुखी व्हावा हेच विठ्ठलास साकडे घातल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
पावसाने ओढ दिल्यानं राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. गेल्या आठवड्यात काही
ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे पण राज्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत
आहे. एका सच्चा सेवकाला विठ्ठलाने महापूजा करण्याची संधी दिल्याची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केली.
पूर्वापार
चालत आलेली वारीची परंपरा काहींही झालं तरी थांबणार नाही किंवा खंडीतही होणार
नाही. करण येथे कोणी कोणाला बोलवत नाही, निमंत्रण पाठवत नाही. मान दिला जात नाही
तर मान अपसूक दिला-घेतला जातो. त्यामुळं वारकऱ्यांच्या, पंढरपूरवासीयांच्या
दृष्टिनं वारी सुखावह कशी होईल याचा विचारही शासनासह वारकरी स्वतःही करत आहोत.
त्यामुळं ही वारी आणखी आनंददायी आणि भक्तिमय होईल असं वाटतयं.
०००००
Comments
Post a Comment